‘सनातन सेन्सॉर मंडळ’ हवेच !
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाला संमती देण्यावरून अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठात सुनावणी चालू आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रभु श्रीराम, भगवान हनुमान यांसह धार्मिक पात्रे आणि त्यातील संवाद आक्षेपार्ह पद्धतीने सादर केले आहेत. २७ आणि २८ जून या दिवशी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ‘आदिपुरुष’ या चित्रपटाला संमती देणे ही सेन्सॉर मंडळाची घोडचूक होती’, असे सांगत केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला (सेन्सॉर मंडळाला) नुसते खडेबोल सुनावले नाहीत, तर मंडळाची चांगली खरडपट्टी काढली आहे. न्यायालयाने त्यांच्या सुनावणीत म्हटले, ‘‘ज्या पात्रांची पूजा केली जाते, असे रामायण विनोदासारखे का दाखवण्यात आले ? सेन्सॉर मंडळाने चित्रपट असा कसा संमत केला ? चित्रपट निर्मात्यांना केवळ पैसे कमवायचे असतात; कारण त्यांना चित्रपट ‘हिट’ करायचा असतो. तुम्ही कुराणावर एक छोटासा लघुपट (डॉक्युमेंट्री) सिद्ध करून त्यात काही चुकीचे दाखवा, मग काय होऊ शकते ? हे तुम्हाला कळेल. कुराण आणि बायबललाही हात लावायला नको. कोणत्याही धर्माला स्पर्श करू नका. कोणत्याही धर्माचे चुकीचे वर्णन करू नका. ‘आदिपुरुष’ चित्रपटातील हनुमानाच्या संवादावरून बराच वाद झाला होता. सेन्सॉर मंडळाने दिलेले प्रमाणपत्र रहित करता येणार नाही का ? चित्रपट पाहून लोक पुष्कळ दुखावले गेले. आज आपण गप्प राहिलो, तर काय होईल, हे माहिती आहे का ? हे सर्व वाढत आहे.’’ न्यायालयाने आमीर खान याच्या ‘पीके’ हिंदी चित्रपटाचे नाव न घेता त्याचा उल्लेख केला. ‘‘आम्ही एका चित्रपटात पाहिले की, भगवान शंकर त्रिशूळ घेऊन पळत होते. मजेशीरपणे पळत होते… आता हेच सर्व होईल ? प्रत्येक वेळी हिंदूंच्या सहिष्णुतेची परीक्षा का घेतली जाते ? सुदैवाने त्यांनी (हिंदूंनी) कायदा मोडला नाही’’, असेही खंडपिठाने म्हटले आहे.
सेन्सॉर मंडळाचे कटू सत्य
आतापर्यंत न्यायालयाने अशा भाषेत विडंबनात्मक चित्रपट बनवणार्या कोणत्याही निर्मात्याला असे खडेबोल सुनावले नसतील, ते ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या निर्मात्यांना सुनावले आहेत. वास्तविक चित्रपट, लघुपट किंवा नाटक असू द्या, याला अनुमती देतांना सेन्सॉर मंडळाने संवेदनशीलपणे संपूर्ण चित्रपट पाहून आणि त्यातील आक्षेपार्ह गोष्ट वगळून चित्रपटांना संमती देणे योग्य ठरते; मात्र इस्लाम आणि ख्रिस्ती या पंथांविषयी चित्रपट बनवल्यानंतर सेन्सॉर मंडळ ‘संवेदनशील’ होते. त्यानंतर लगेच त्या चित्रपटांतून आक्षेपार्ह भाग वगळला जातो किंवा इस्लाम, बायबलविषयी अवमानजनक काही असेल, तर तशा चित्रपटांना अनुमती दिलीच जात नाही, असा आजपर्यंतचा अनुभव आहे; मात्र हिंदु देवतांच्या विडंबनात्मक चित्रपटांविषयी असे होत नाही. यापूर्वी प्रदर्शित झालेले पीके, मोहल्ला अस्सी, हैदर, ओ माय गॉड आदी हिंदी चित्रपटांमध्ये हिंदु देवता, संत, साधू यांचे सर्रास विडंबन करण्यात आले आहे. याविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलने केली, तक्रार आणि निवेदने देऊनही सेन्सॉर मंडळाने याकडे कानाडोळा केला आहे. हिंदु देवतांचे विडंबनात्मक दृश्य तसेच ठेवण्यात आले. यातून ‘सेन्सॉर मंडळाचा हिंदुद्वेष आणि अन्य धर्मियांविषयी प्रेम दिसून येते’, असे म्हटले, तर वावगे होणार नाही. सेन्सॉर मंडळ धर्मनिरपेक्ष तत्त्वाप्रमाणे वागत असेल, तर या मंडळाने इतर धर्मांप्रमाणे हिंदु धर्माचाही तितकाच आदर केला पाहिजे; मात्र आतापर्यंत हिंदूंनी वेळोवेळी सांगूनही तसे झालेले नाही. उलट स्वतःची बाजू सावरून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न या सेन्सॉर मंडळातील सदस्यांनी वारंवार केला आहे. एखाद्या चित्रपटात इस्लामविषयी आक्षेपार्ह संवाद अथवा काही गोष्टी चित्रित केलेले असेल, तर याला मुसलमानांचा तीव्र विरोध होतो. विडंबनात्मक चित्रपटाविषयी फतवा काढणे किंवा दिग्दर्शक, निर्माते अथवा कलाकार यांचे डोके शरिरापासून वेगळे करणार्यास लाखो रुपयांचे पारितोषिक देण्याचे घोषित करणे; चित्रपटगृहांची तोडफोड होईल, अशी सर्व धास्ती सेन्सॉर मंडळातील सदस्यांना असते. मुसलमानांचा विरोध प्रचंड प्रखर असतो, याची नोंद सेन्सॉर मंडळातील सदस्यांना घ्यावीच लागते. त्यामुळे अशा ‘परिणामांचा’ विचार करून मंडळाचे सदस्य इस्लामविषयी अवमानजनक चित्रपटांना अनुमती देत नाहीत, हे कटू सत्य आहे.
सेन्सॉर मंडळ विसर्जित करा !
न्यायालयाच्या सुनावणीतून ‘हिंदूंच्या सहिष्णुतेचा अंत पाहू नये आणि होणार्या परिणामांचा विचार करून सेन्सॉर मंडळाने चित्रपटांना अनुमती द्यावी’, असेच मंडळाला सुनावण्यात आले आहे. गेल्या वर्षी ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा ‘टिझर’ प्रदर्शित झाल्यावर याला साधू, संत आणि विविध संघटना यांनी आक्षेप घेतला होता. ‘या चित्रपटात सनातन धर्माची विटंबना केली आहे. त्यामुळे सेन्सॉर मंडळ विसर्जित करून ‘सनातन सेन्सॉर बोर्ड’ स्थापन करावा’, अशी मागणी अखिल भारतीय संत समितीने केली होती. ‘सेन्सॉर बोर्ड हे डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहे. बर्याच चित्रपटांमध्ये सनातन धर्माचे विडंबन केले जाते आणि सेन्सॉर मंडळ त्याला अगदी सहज संमती देते. ‘आदिपुरुष’ चित्रपटातही तेच दाखवले आहे. त्यामुळे सेन्सॉर मंडळ विसर्जित करून ‘सनातन सेन्सॉर बोर्ड’ची स्थापना करावी, अशी आमची सरकारकडे मागणी आहे’, असे अखिल भारतीय संत समितीचे प्रवक्ते महंत नवलकिशोर दास यांनी सांगितले होते. राज्यघटनेमध्ये सर्व धर्मांना समान हक्क आणि अधिकार दिले असतील, तर हे डावलून सेन्सॉर मंडळ इस्लाम अन् ख्रिस्ती पंथांचा उदोउदो का करते ? या मंडळाला हिंदु धर्माविषयी एवढा तिटकारा का आहे ? याचा संपूर्ण अभ्यास आणि त्या आधारे चौकशी केली पाहिजे, तसेच हिंदु धर्मातील देवतांचे विडंबन न होण्यासाठी सेन्सॉर मंडळाला ताळ्यावर आणणे आवश्यक आहे. यासाठी मंडळामध्ये हिंदु धर्मातील हिंदु धर्माविषयी जाणकार असलेले शंकराचार्य, धर्मगुरु आणि संत यांची सदस्यपदी नियुक्ती करून त्यांच्या संमतीनंतरच चित्रपटांना अनुमती देणे शहाणपणाचे ठरेल !
चित्रपटांमध्ये अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांविषयी निधर्मीपणा दाखवणारे ‘सेन्सॉर मंडळ’ हिंदूंच्या देवतांच्या विडंबनाविषयी गप्प का असते ? |