मी त्या ताईवर उपकार केले नसून मी माझे कर्तव्य पार पाडले !
|
पुणे – मी त्या ताईवर उपकार केले नाहीत, मी माझे कर्तव्य पार पाडले. आता सगळे सत्काराला बोलवत आहेत; पण ती घटना घडली, तेव्हा माझ्या खोलीमध्ये गेल्यावर मी एक-दीड घंटा रडत होतो. थोडा विलंब झाला असता, तर तिचा मृत्यू कसा झाला, हे मला लोकांना सांगावे लागले असते. मी फक्त माझे कर्तव्य बजावले. हात जोडतो; पण मला सत्काराला बोलावू नका, असे मत पुणे येथील श्री. लेशपाल जवळगे यांनी सामाजिक माध्यमावर एक ‘पोस्ट’ करून व्यक्त केले आहे. पुणे येथील सदाशिव पेठेत २७ जून या दिवशी एका तरुणाने तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार केला. या तरुणाला श्री. लेशपाल जवळगे आणि श्री. हर्षद पाटील या तरुणांनी मोठ्या धाडसाने अडवले. त्यामुळे संबंधित तरुणीचा जीव वाचला. या दोघांचेही विविध संघटना, राजकीय पक्ष यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येत आहेत. या सत्कार समारंभाविषयी श्री. लेशपाल यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री. लेशपाल जवळगे आणि श्री. हर्षद पाटील यांना भ्रमणभाषवरून संपर्क करून त्यांचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दोघांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे, तसेच काँग्रेस भवनात लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील यांचा युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.