विठ्ठला, समाजातील प्रत्येक घटकाला सुखी आणि समाधानी कर ! – मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठलचरणी साकडे

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा !

श्री विठ्ठलाच्या शासकीय पूजेच्या वेळी सपत्नीक उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मानाचे वारकरी

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २९ जून (वार्ता.) – ‘बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, त्याच्यावरील अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे. राज्य सुजलाम्, सुफलाम् होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत’, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या मुख्य शासकीय महापूजेच्या वेळी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.

श्री रुक्मिणीमातेची आरती करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मानाचे वारकरी

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, तसेच अहिल्यानगर येथील मानाचे वारकरी दांपत्य श्री. भाऊसाहेब काळे अन् त्यांच्या पत्नी सौ. मंगल भाऊसाहेब काळे यांच्यासमवेत श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली.

महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आयोजित मानाच्या वारकर्‍यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.

१. या वेळी महसूल, पशूसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉ. तानाजी सावंत, ग्रामविकास आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.

२. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘‘आषाढी वारीनिमित्त पंढरी आणि परिसर अवघा पांडुरंगमय झाला आहे. आषाढी वारीत वारकर्‍यांच्या आरोग्याला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यासाठी ३ ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातून भाविकांची आरोग्य सेवा करणे, हे श्री विठ्ठलाची पुजा करण्यासारखेच आहे.’’

सर्वांना विश्‍वासात घेऊन पंढरपूर शहर विकास आराखडा सिद्ध करण्यात येईल ! – मुख्यमंत्री

पंढरपूर नगरपरिषदेकडील कामांसाठी १०८ कोटी रुपये आणि शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी १०९ कोटी रुपयांच्या कामाला मान्यता देण्यात आली आहे. मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी ७३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पंढरपूर शहर विकास आराखडा सर्वांना विश्‍वासात घेऊन सिद्ध करण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी म्हणाले. ‘सलग दोन वर्षे मला आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मिळणे’, हे माझे भाग्य असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

मंदिर रक्षणाविषयी कार्य करणारे हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांचा सत्कार !

श्री. सुनील घनवट यांचा सत्कार करतांना ह.भ.प. अक्षय महाराज भोसले

शिवसेनेच्या धर्मवीर आध्यात्मिक आघाडीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. सध्या चालू असलेल्या मंदिर रक्षण, गडरक्षण, मंदिरांमध्ये लागू करण्यात येत असलेली वस्त्रसंहिता, अशा विविध विषयांच्या संदर्भात सक्रीयपणे कार्य केल्याविषयी श्री. घनवट यांचा व्यासपिठावर सत्कार करण्यात आला.