सिंधुदुर्ग : युवा रक्तदाता संघटनेने चेतावणी देताच सावंतवाडी रक्तपेढीसाठी तंत्रज्ञाची नियुक्ती
सावंतवाडी – येथील उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीसाठी तातडीने एका तंत्रज्ञाची नियुक्ती जिल्हा शल्यचिकित्सकांनी केल्याने तंत्रज्ञाच्या मागणीसाठी करण्यात येणारे ‘आत्मदहन’ आंदोलन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी रहित केले आहे.
येथील रक्तपेढीतील अनेक पदे रिक्त आहेत. सध्या एकच महिला तंत्रज्ञ येथील कामकाज पहात आहे. त्यामुळे रिक्त पदे भरेपर्यंत किमान आणखी एका तंत्रज्ञाची येथे नियुक्ती करावी, या मागणीसाठी युवा रक्तदाता संघटनेने २६ जून या दिवशी शहरात काळ्या फिती बांधून आंदोलन केले होते. या वेळी त्वरित एक तंत्रज्ञ न दिल्यास जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयाच्या बाहेर ‘आत्मदहन’ करण्याची चेतावणी दिली होती. याची नोंद घेत जिल्हा शल्यचिकित्सक बी.एस्. नागरगोजे यांनी तात्काळ एका तंत्रज्ञाची नियुक्ती येथील रक्तपेढीसाठी केली.
संपादकीय भूमिकाआंदोलनाची चेतावणी दिल्यानंतर तंत्रज्ञाची नियुक्ती प्रशासन कशी करू शकले ? याचा अर्थ प्रशासनाला अर्ज, विनंत्या यांची भाषा न समजता जनतेच्या टोकाच्या आंदोलनाचीच भाषा समजते, असे समजायचे का ? |