भगवंताला कोणते भक्त (वारकरी) आवडतात ?
भगवान श्रीकृष्ण भागवतात म्हणतात, ‘मला भोळ्या भक्तांची अतिशय आवड आहे. ती गोडी तुला काय सांगू ? ते नसतील, तर कुणी कितीही सुखाचे उपचार केले, तरी ते मला आवडत नाहीत. अशा भोळ्या भक्तांना मी उत्तम ‘भागवत’, म्हणजे ‘भक्त’ समजतो. मी भगवंत असूनही त्यांचे पाय धरतो. अशा भक्तांच्या भेटीसाठी मी निःसंशय अत्यंत उत्कंठित असतो. असा भक्त सावधचित्त असतो. असा हा माझा निष्कपट आणि भाव असलेला भोळा भक्त कुठेही असला, तरी मी त्याच्याकडे धाव घेतो. असा भक्त दुर्लभ असतो. उद्धवा, तुला काय सांगू ! मी अशा भोळ्या भक्ताला स्वतः विकला जातो आणि त्याला आपलासा करून टाकतो. मला माझ्याहूनही माझ्या भक्तांचे मोल अधिक आहे; म्हणून तर मी त्यांना वश राहून कधीही त्यांच्या शब्दाचे उल्लंघन करत नाही.’
संदर्भ : सार्थ श्री एकनाथी भागवत (११ वा अध्याय (ओवी ११७६ ते ११८०)