वारकरी भोळ्या भावाचे प्रतीक !
- ‘जेथे भाव आहे, तेथे देव प्रकट होतो’, हा भगवंताचा स्वभाव आहे.
- माझ्या प्रतिमांचे दर्शन घेण्यासाठी माझा भक्त प्रेमाने धावत येतो.
- भक्त जेथे ‘रामनामा’चा निरंतर जप करत असतो, तेथे सर्व पातके दूर होतात आणि कलि तेथे उभा रहात नाही.
(श्री एकनाथी भागवत, ओवी ११८३,११९०,१२१९ यांचा भावार्थ)
भावभक्तीची अनुभूती देणारा चालता बोलता हरिपाठ !
ऊन-पावसाची तमा न बाळगता भगवी पताका खांद्यावर घेऊन टाळ-मृदुंगाचा गजर करत चालणारे वारकरी म्हणजे भावभक्तीचेच प्रतीक ! कोणाच्याही तोंडवळ्यावर चिंता नाही कि मुक्कामाच्या ठिकाणी सोयीसुविधांची अपेक्षा नाही. कशाचेही अवडंबर न माजवता विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने चालणारे वारकरी हे भागवत धर्माचेच भोई आहेत. धर्मग्रंथांची केवळ पारायणे करण्यापेक्षा ‘एक तरी ओवी अनुभवावी’, असे संतांनी सांगितले आहे. हा पालखी सोहळा म्हणजे संतांच्या ओव्यांची आणि कृपेची अनुभूती देणारा चालता-फिरता हरिपाठच म्हणावे लागेल.