भगवद्भेटीसाठी भक्ताची धारणा कशी असावी ?
भक्तानेसुद्धा भगवंताला (पांडुरंगाला) ज्यामुळे आनंद होईल, असे वर्तन करणे आवश्यक आहे. यासाठी त्याने भावावस्थेत राहून प्रत्येक कर्म करायला हवे. भगवंतभेटीसाठी वारकरी उत्सुक असल्याने ते तसे करतात. ते पांडुरंगाचे नाम घेत पायी प्रवास करत आनंदाने त्याच्या भेटीला जात असतांना मार्गात त्यांना अनेक संकटांतून जावे लागते; परंतु पांडुरंगाच्या भेटीच्या उत्सुकतेमुळे वारकर्यांना त्यांचे (संकटांचे) काहीच वाटत नाही. भगवंतही त्यांच्यातील भाव ओळखून त्यांच्या भेटीसाठी उत्सुक असतो.
ज्याप्रमाणे कमलपत्र पाण्यावर विसावूनही पाणी त्याला स्पर्श करत नाही, त्याचप्रमाणे प्रत्येक कर्म करतांना शाश्वत अशा चैतन्याच्या सतत सान्निध्यात राहिल्यास तो जीव मायेच्या भौतिक सुखाच्या भवबंधनातून तरून जाऊन सतत आनंदात रममाण होतो. अशा प्रकारचा भक्त भगवंताला प्रिय असतो.
– परात्पर गुरु परशराम माधव पांडे
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग) (पांडुरंगाचे माहात्म्य अन् पंढरीच्या वारीची वैशिष्ट्ये यांसह)