गुरुस्तवन पुष्पांजली
गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष सदर !
दासबोधातील सद्गुरुस्तवन आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यातून उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
५. अथांग; परंतु अत्यंत खारट असलेला सागर आणि साधकांसाठी ‘मधुराधिपती’ असलेले सद्गुरु !
‘उपमे द्यावा सागर ।
तरी तो अत्यंतची क्षार ।
अथवा म्हणों क्षीरसागर ।
तरी तो नासेल कल्पांतीं ।। – दासबोध, दशक १, समास ४, ओवी १७
अर्थ : सद्गुरूंना सागराची उपमा द्यावी, तर तो अत्यंत खारट असतो. त्यामुळे ती उपमा योग्य नव्हे. त्यांना क्षीरसागराची उपमा द्यावी, तर कल्पांती क्षीरसागरही नष्ट होतो. त्यामुळे तीही उपमा देता येत नाही.’
५ अ. प्रत्येक जिवावर निरपेक्ष प्रीती करणारे ‘मधुराधिपती’ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव !
‘भगवान श्रीकृष्णाप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांचे रूप आणि त्यांचे हसणे-बोलणे आदी सर्वच अत्यंत मधुर आहे. साधकांसाठी ते ‘मधुराधिपती’ असून त्यांची सर्वत्रच्या साधकांवर अमर्याद प्रीती आहे. केवळ साधकच नव्हे, तर साधना करणारा प्रत्येक जीव, धर्मप्रेमी, हितचिंतक, एवढेच नव्हे, तर विरोध करणारे बुद्धीजीवी आणि अनिष्ट शक्ती यांच्याप्रतीही श्री गुरूंच्या मनात निरपेक्ष प्रीती असते. त्यांना या सर्वांच्या उद्धाराची निरंतर तळमळ असते. अशा गुरूंच्या अमर्याद आणि निरपेक्ष प्रीतीचे वर्णन करतांना ‘करुणासागर’ ही उपमाही थिटी पडते.
जीवनातील प्रत्येक घटनेत आपण ‘मधुराधिपती’ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची आपल्यावर असलेली अपार करुणा अनुभवण्याचा प्रयत्न करूया !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२८.६.२०२३)