भक्तांच्या भावापोटी धावून येणारा श्री विठ्ठल !

संत सखुबाई यांच्या विठ्ठलदर्शनाच्या तीव्र ओढीमुळे साक्षात् विठ्ठलानेच यांच्या रूपात स्वतः खांबाला बांधून घेतले आणि त्यांना पंढरपूरला पाठवले !

कराडहून पंढरपूरला जाणार्‍या वारीत सहभागी व्हावे आणि पांडुरंगाचे दर्शन घ्यावे, असे संत सखुबाई यांना वाटत होते; परंतु त्यांच्या सासूने त्यांना वारीला जाऊ दिले नाही आणि घरातील खांबाला बांधून ठेवले. संत सखुबाई यांच्यामध्ये पंढरीनाथाच्या दर्शनाची इतकी तीव्र ओढ होती, की साक्षात् पांडुरंगाला त्यांना मुक्त करण्यासाठी धावत यावे लागले. पांडुरंगाने खर्‍या सखूला मोहमायेच्या बंधनातून मुक्त करून थेट पंढरपुरात पोचवले आणि त्यांचे रूप घेऊन स्वतःला खांबाला बांधून घेतले.

संत कूर्मदास यांच्या उत्कट भक्तीमुळे साक्षात् विठ्ठलच त्यांच्या भेटीसाठी पंढरपूरहून लहूल या त्यांच्या गावी संतांना घेऊन आला !

संत कूर्मदास पैठणचे निवासी होते. त्यांना जन्मतःच हात आणि पाय दोन्ही नव्हते. त्यांनी एकादशींचे महत्त्व जाणून पंढरपूरला जाण्याचा निश्चय केला. ते पोटाच्या साहाय्याने सरकत सरकत प्रतिदिन एक कोस अंतर पार करत होते. त्यांची स्थिती पाहून करुणेने कुणी त्यांना भाकरीचा तुकडा भरवी, तर कुणी त्यांना उचलून पुढे नेत असे. पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने ते पंढरपूरच्या दिशेने तसेच जाण्याचा प्रयत्न करत होते. असे ४ मास झाले. आषाढी एकादशीला १ दिवस शिल्लक असतांना ते पंढरपूरपासून ७ कोस अंतर दूर असणार्‍या लहुल गावी येऊन पोहोचले. ‘उद्या आषाढी एकादशी आहे आणि आता मला पांडुरंगाचे दर्शन होणार नाही’, याची खंत त्यांच्या मनात होती. ‘देवा, मी दीन-हीन, अपंग. मी तुझ्या दर्शनासाठी पोहोचू शकत नाही; पण तू तर मला भेटण्यासाठी येऊ शकतोस ना ? तुला काय अशक्य आहे ?’, असा विचार करून संत कूर्मदास यांनी एका यात्रेकरूच्या माध्यमातून चिठ्ठीद्वारे विठ्ठलाला भेटण्यासाठी बोलावणे पाठवले. दुसर्‍या दिवशी एकादशीला तो यात्रेकरू पंढरपुरात पोचला. त्याने श्रीविठ्ठलाचे दर्शन घेऊन संत कूर्मदास यांनी पाठवलेली चिठ्ठी पांडुरंगाच्या चरणांवर अर्पण केली. भक्तवत्सल पांडुरंगाला एक क्षणही रहावेना. तो संत कूर्मदास यांच्या भेटीसाठी संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि संत सावतामाळी यांना समवेत घेऊन लहुल या गावी गेला. साक्षात् भगवंताचे दर्शन झाल्याने संत कूर्मदास यांच्या जन्माचे सार्थक झाले आणि ते पांडुरंगाच्या चरणांवर लोटले. संत कूर्मदास लहूल या गावी असेपर्यंत श्रीविठ्ठलही तेथेच राहिला. संत कूर्मदास यांना दर्शन दिलेल्या ठिकाणी श्रीविठ्ठलाचे सुंदर मंदिर आहे.