सूक्ष्मातून पंढरपूरला गेल्यावर मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती सजीव झाल्याचे जाणवणे, मूर्तीतून पांढरा प्रकाश संपूर्ण परिसरात पसरणे, त्याचे पिवळ्या रंगात रूपांतर होऊन नंतर निळ्या रंगाच्या कणात विघटन होणे आणि त्या वेळी देहभान विसरून जाणे

‘एकदा आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबरच आपोआप मी सूक्ष्मातून पंढरपूरला गेलो. तत्पूर्वी पंढरपूरच्या मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती सजीव झाल्याचे मला अंतरंगात जाणवले. मूर्तीला पहाताच खरोखरच ती सगुणात येऊन हालचाल आणि मंद स्मित करत असल्याचा दिसत होते. मूर्तीतून पांढरा प्रकाश संपूर्ण परिसरात पसरला होता. त्यातून पांढरे कण उधळले जात होते. मी सूक्ष्मातून हे अनुभवत असतांना देहभान विसरून गेलो होतो. नंतर हा पांढर्‍या प्रकाशाचे पिवळ्या रंगात रूपांतर होऊन तो अधिक वेगाने संपूर्ण परिसर आणि वातावरण यांत पसरला. काही वेळाने पिवळा रंग पालटून त्याचे निळ्या रंगाच्या कणात विघटन झाले. मग तो प्रकाश अंतर्धान पावला. – एक साधक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक