वारी : भावभक्तीचा महासागर !
पाहू द्या रे मज विठोबाचे मुख । लागलीसे भूक डोळा माझ्या ।। – संत नामदेव महाराज
‘विठुमाऊली तू, माऊली जगाची’, असा विठ्ठलमहिमा आळवत लक्षावधी वारकरी प्रतिवर्षी वारीला जातात आणि परत आल्यावर स्वतःपुरतीच नव्हे, तर परिसरातही विठ्ठलाची उपासना उत्साहाने चालू करतात.!
वारीचा मूळ गाभा
१. अध्यात्ममार्गावरील अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि भक्ती. श्रद्धा दृढ होण्यासाठी वारीचे प्रयोजन आहे.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
२. ‘भजन, नामस्मरण आणि कीर्तन यांच्या माध्यमातून परमेश्वराला प्राप्त करणे’, हा वारकरी पंथाचा सरळसोपा मार्ग आहे. भागवत संप्रदायात याला ‘नवविधा भक्ती’ म्हणतात. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या नऊ भक्ती एक ‘वारी’ केल्यास सिद्ध होतात अन् ‘याची देही याची डोळा’ माणसाचे जीवन कृतार्थ होते. हा वारीचा मूळ गाभा आहे.
(संदर्भ : त्रैमासिक ‘सद्धर्म’, जुलै २०१७)
३. वैयक्तिक जीवनातील अभिनिवेष बाजूला ठेवून ईश्वराच्या नामस्मरणात देहभान विसरायला लावणारा आध्यात्मिक सोहळा म्हणजे पंढरपूरची वारी !
– डॉ. ज्योती काळे, सौ. सायली ढमढेरे, पुणे आणि सौ. गौरी कुलकर्णी, फोंडा, गोवा.
भक्तीमय वातावरणात वाटचाल करणारे वारकरी !
वारीत ‘तृण आणि पाषाण तेही जीव मानावे’, असे मानणार्या संतांच्या भूमिकेत राहून (ते जीव दुखवू नयेत; म्हणून) अनवाणी चालणारे हे वारकरी भगव्या पताका घेऊन अस्सल मराठमोळ्या रंगाची उधळण करत; चिपळ्या, टाळ आणि मृदंग यांच्या नादात मोठ्या आनंदाने नाचत हरिपाठ म्हणत जात असतात. त्यामुळे सभोवतालचे सर्व वातावरण भक्तीमय होऊन जाते. सर्वांचा अहंकार न्यून होऊन ते आनंदात डुंबून जातात. भक्ती हा भारतीय समाजाचा गाभा आहे. महाराष्ट्र आणि अन्य ठिकाणच्या कानाकोपर्यातून येणारे वारकरी अन् भाविक वर्षभर जमवलेला पै-पैसा व्यय (खर्च) करून वारीला येतात. ते अत्यल्प सामान घेऊन, हातांत टाळ आणि मुखात ‘माऊली’च्या नामाचा गजर करत अत्यंत आनंदात वाटचाल करत असतात.
– परात्पर गुरु परशराम माधव पांडे
‘वारी’ या शब्दाच्या व्युत्पत्ती
१. वार : ‘अमरकोषात ‘वार’ हा शब्द ‘समुदाय’ या अर्थाने वापरला आहे. यावरून ‘भक्तांचा समुदाय’, असा ‘वारी’ शब्दाचा अर्थ काढता येतो.
२. वारी : संस्कृत भाषेत ‘वारि’ म्हणजे पाणी. पाण्याचा प्रवाह जसा अनेक वळणे घेऊन समुद्राला मिळतो, तसा वारकर्यांच्या भक्तीच्या प्रेमाने भारलेला प्रवाह पंढरपूरला येऊन मिळतो.
३. फेरा किंवा खेप : संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत ‘वारी’ हा शब्द ‘फेरा’ किंवा ‘खेप’ या अर्थाने वापरला आहे. ‘ही वारी कधी चालू झाली ?’, याविषयी विद्वानांमध्ये मतभेद आहेत; मात्र ‘ज्ञानेश्वर माऊलींनी ‘वारी’ची महती अधिक प्रमाणात वाढवली’, असे म्हणता येईल.
४. केवळ पायी चालणे म्हणजे वारी नसून पदोपदी भगवंताचे कीर्तन करणे म्हणजे वारी.
(संदर्भ : त्रैमासिक ‘सद्धर्म’, जुलै २०१७)
नित्य हरिकथा नामसंकीर्तन । संतांचे दरूषन सर्वकाळ ॥
पंढरीची वारी आषाढी कार्तिकी । विठ्ठल एकाएकी सुखरूप ॥
– संत नामदेव महाराज
संत नामदेव यांनी लिहिलेल्या आरतीतील वारीचा उल्लेख
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती ।
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति ।
केशवासी नामदेव भावें ओवाळिती ॥
– संत नामदेव महाराज
वारी म्हणजे शिस्तबद्धतेचे दर्शन
अ. वारकर्यांना प्रतिदिन १० ते २० किलोमीटरचा टप्पा चालत पार करावा लागतो. सकाळी लवकर मार्गस्थ व्हावे लागते. अल्पाहार आणि महाप्रसादही वाटेतच घ्यावा लागतो. सायंकाळी विलंबाने मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यानंतर भजन-कीर्तन होऊन दिवसाची समाप्ती होते.
आ. प्रत्येक दिंडीची रचना ठरलेली आहे. प्रारंभी भगवे ध्वजधारी वारकरी, मग तुळशी-वृंदावन घेतलेल्या महिला, त्यामागे टाळकरी, नंतर विणेकरी अशीच सर्व दिंड्यांची रचना असते. टाळ वाजवणार्या वारकर्यांचा पदन्यासही लयबद्ध असतो. भले टाळकरी-वारकरी शेकडोंच्या संख्येने का असेना !
इ. दिंडी व्यवस्थापन ! : दिंडीसमवेत साधारण २ ट्रक, १ पाण्याचा टँकर, २ टेम्पो आणि २ कार अशी वाहने असतात. ट्रकमध्ये जेवणाची सर्व सामग्री आणि रहाण्यासाठी लागणारे कापडी तंबू, तसेच ताडपत्र्या अशी सर्व व्यवस्था असते. साधारणपणे २ लाख रुपयांचा किराणा आणि साहित्य लागते; पण विविध देणगीदार आणि भाविक यांच्या देणग्यांच्या माध्यमातून सोय होते. याचे नियोजन एक मास आधीपासूनच चालू होते. दिंडीतील महिला स्वयंपाक बनवतात. सकाळी पालख्या निघण्यापूर्वी दिंडीतील काही जण वाहनांसह पुढच्या विसाव्याला निघतात. सलग २२ दिवस हाच दिनक्रम असतो.
वारीची परंपरा !
पहिली वारी
वारकरी पंथातील काही सांप्रदायिक भक्तांची अशीही एक धारणा आहे की, पहिली वारी महादेवाने केली.
पद्मपुराण आणि स्कंदपुराण यांतील उल्लेखावरून ‘पंढरपूर हे देवस्थान प्राचीन काळापासून प्रतिष्ठित होते’, असे दिसते. तेव्हापासून लोक पंढरपूरला दर्शनासाठी येत होते. ‘भक्त पुंडलिकाने पांडुरंगाकडे ‘दर्शनास आलेल्या सर्वांची पापे नष्ट कर’, असा वर मागितला’, असा उल्लेख पद्मपुराणात आहे.
(संदर्भ : त्रैमासिक ‘सद्धर्म’, जुलै २०१७)
१. वारीची परंपरा पुनरुज्जीवित करणारे संत ज्ञानेश्वर !
संत ज्ञानेश्वर स्वतः एक सिद्ध पुरुष असून त्यांनी केवळ समाजात भक्तीचा प्रवाह खळाळत राहावा आणि नामस्मरणाचे सोपे तंत्र जनतेच्या मनी रुजावे; म्हणून वारीची परंपरा पुनरुज्जीवित केली. ज्ञानप्राप्ती झाल्यावर सामान्य जनांप्रती असलेली कणव या साधु पुरुषांच्या आचरणाने स्पष्ट होते. त्यांच्या या विश्वात्मक जाणिवेमुळे त्यांना ‘माऊली’ हे बिरुद सार्थ वाटते. ते म्हणतात,
‘अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिही लोक ।
जाईन गे माये तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥
(संदर्भ : त्रैमासिक ‘सद्धर्म’, जुलै २०१७)
२. श्रीक्षेत्र आळंदी आणि देहू येथून निघणाार्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव !
– डॉ. ज्योती काळे, सौ. सायली ढमढेरे, पुणे आणि सौ. गौरी कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३. पालख्या आणि दिंड्या नेण्याची परंपरा
प्रमुख संतांच्या निर्वाणानंतर त्यांच्या नावाने पालख्या आणि दिंड्या नेण्याचा प्रघात हैबतबाबा अरफळकर यांनी चालू केला. हैबतबाबा हे ग्वाल्हेरच्या शिंद्यांच्या दरबारी सरदार होते. त्यांनी सर्वप्रथम ज्ञानेश्वरांच्या पादुका गळ्यात बांधून पायी दिंडी काढली. ते लष्करी शिस्तीचे होते. त्यांचे तत्कालीन राजे अन् सरदार यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला एक भव्य दिव्य स्वरूप मिळवून दिले. हत्ती, घोडे, पालखी इत्यादी व्यवस्था त्यांनी माऊलींच्या पालखीला करवली. महाराष्ट्रातील प्रमुख संतांच्या पालख्या आजही मोठ्या दिमाखात आणि शिस्तीत आषाढी एकादशीला पंढरपुरात पोचतात.’
(संदर्भ : त्रैमासिक ‘सद्धर्म’, जुलै २०१७)