कोणताही देश भारताविरुद्ध श्रीलंकेचा वापर करू शकणार नाही !
श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांचे आश्वासन !
कोलंबो (श्रीलंका) – चीन आणि श्रीलंका यांच्यातील संबंध भक्कम आहेत; परंतु आम्ही हेदेखील स्पष्ट करू इच्छितो की, चीनचा आमच्या देशात कोणताही सैनिकी तळ नाही आणि नसेल. कोणताही देश भारताविरुद्ध श्रीलंकेचा वापर करू शकणार नाही, असे विधान श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी ब्रिटन आणि फ्रान्स या देशांच्या दौर्यावर मार्गस्थ होण्यापूर्वी केले. ‘आम्ही चीनसमवेत कधीही सैनिकी करार करणार नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले. फ्रान्सची वृत्तवाहिनी ‘फ्रान्स २४’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही विधाने केली.
श्रीलंका का बड़ा फैसला: चीन से कोई मिलिट्री एग्रीमेंट नहीं करेगा, प्रेसिडेंट बोले- हमारे देश का इस्तेमाल भारत के खिलाफ नहीं होने देंगे#SriLanka #China https://t.co/rMnTCRI0Ss pic.twitter.com/6GSFa3rDPm
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) June 27, 2023
१. राष्ट्रपती विक्रमसिंघे म्हणाले की, आम्ही भारताला अनेकदा आश्वासन दिले आहे आणि मी हे पुन्हा सांगत आहे की, आमच्या भूमीतून भारताला कोणताही धोका निर्माण होऊ दिला जाणार नाही. कोणताही देश श्रीलंकेचा तळ म्हणून वापर करू शकणार नाही.
श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी ‘फ्रान्स २४’ला दिलेली मुलाखत (सौजन्य: FRANCE 24 English)
२. चीनविषयी विक्रमसिंघे म्हणाले की, चीन आमच्या देशात १ सहस्र ५०० वर्षांपासून आहे; परंतु येथे त्यांचा कोणताही सैनिकी तळ नाही. तो होणारही नाही. चीनकडे हंबनटोटा बंदर ९९ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे, हे खरे आहे; पण त्याची सुरक्षा आमच्या सैन्याकडे आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. हंबनटोटा बंदर केवळ व्यवसायासाठी वापरले जाऊ शकते.
३. आर्थिक संकटाविषयी विक्रमसिंघे म्हणाले की, आम्ही कठीण काळातून गेलो आहोत आणि आता परिस्थिती चांगली झाली आहे. भारतासह अनेक देशांनी आम्हाला साहाय्य केले आहे. मला पूर्ण आशा आहे की, श्रीलंकेची अर्थव्यवस्था लवकरच रुळावर येईल.