गोवा : अबकारी घोटाळा प्रकरणी कारकुनासह २ निरीक्षक सेवेतून निलंबित
पणजी, २७ जून (वार्ता.) – अबकारी खात्यात बनावट अनुज्ञप्ती आणि बनावट अनुज्ञप्ती नूतनीकरण प्रकरणी कारकून हरीश पी. नाईक याच्यासह २ निरीक्षक यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
अबकारी खात्याच्या पेडणे कार्यालयात मद्यविक्री दुकाने आणि मद्यालये यांचे नूतनीकरण किंवा अनुज्ञप्ती नूतनीकरण यांसाठी संबंधित व्यावसायिकांकडून कार्यालयातील वरिष्ठ कारकुनाने पैसे घेतले; मात्र हे पैसे अबकारी खात्याच्या अधिकोषात जमा केले नाहीत. अबकारी खात्याने नंतर संबंधित व्यावसायिकांना अनुज्ञप्ती किंवा अनुज्ञप्ती नूतनीकरण न झाल्याने नोटीस पाठवण्यास प्रारंभ झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर खात्यांतर्गत अन्वेषण चालू करून संबंधित वरिष्ठ कारकुनाला ११ लाख रुपये भरण्यास भाग पाडण्यात आले, तर उर्वरित २८ लाख रुपये पुढील २ दिवसांत वसूल केले जाणार असल्याचे अबकारी सूत्रांनी सांगितले.