(म्हणे) ‘कायदा-सुव्यवस्थेसाठी क्षमा मागितली; पण छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्याचा आदेश मागे घेतलेला नाही !’ – कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा, गोवा

कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांचे घुमजाव !

कळंगुट येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा

म्हापसा, २७ जून (वार्ता.) – कळंगुट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा १० दिवसांत हटवण्याचा आदेश कळंगुट पंचायतीने हल्लीच काढला होता. या आदेशानंतर शिवप्रेमींनी तीव्र आंदोलन छेडून कळंगुट पंचायतीला हा आदेश मागे घेण्यास आणि सरपंच जोसेफ सिक्वेरा यांना शिवप्रेमींची क्षमा मागण्यास भाग पाडले होते. यानंतर सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलतांना ‘मी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच क्षमा मागितली होती’, असे सांगितले. कळंगुट पंचायत मंडळाच्या २६ जून या दिवशी झालेल्या बैठकीत ‘शिवरायांचा पुतळा हटवण्याच्या ठरावाविषयी पुढे काय करावे ?’, याविषयी चर्चा केली. या ठरावाविषयी कायदेशीर सल्ला घेण्याचा निर्णय पंचायत मंडळाने घेतला आहे.

वास्तविक शिवप्रेमींनी आंदोलन केले, त्या वेळी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी ‘शिवरायांचा पुतळा हटवण्याचा आदेश मागे घेतल्याचे आणि पुतळा हटवण्याच्या आदेशावरून कुणाच्याही धार्मिक भावना दुखवल्यास क्षमा मागतो’, असे उघडपणे म्हटले होते.

सरपंच जोसेफ सिक्वेरा वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पुढे म्हणाले, ‘‘२० जून या दिवशी मी मागितलेली क्षमा मनापासून नव्हती, तर ती कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मागितली होती.’’

(सौजन्य : prime media goa) 

शिवरायांच्या पुतळ्यावरून सरपंच जोसेफ सिक्वेरा शिवप्रेमींची दिशाभूल करत आहेत ! – शिवस्वराज्य कळंगुट संघटना

कळंगुट – सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी २० जून या दिवशी शिवप्रेमींच्या आंदोलनानंतर शिवस्वराज्य कळंगुट संघटनेला दोष दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य कळंगुट संघटनेने २७ जून या दिवशी शिवरायांच्या पुतळ्याखाली एक पत्रकार परिषद घेतली आणि या वेळी पुढील महत्त्वाची सूत्रे मांडली.

१. सरपंच सिक्वेरा यांचे दावे खोटे आहेत. त्यांनी संघटनेला कधीच विश्वासात घेतलेले नाही. सरपंचांनी ठराव मागे न घेता तो कायदेशीर सल्ला घेण्यासाठी पाठवल्याचे म्हटले आहे, हा दावा धादांत खोटा आहे. शिवप्रेमींनी या विधानाला बळी पडू नये. शिवरायांचा पुतळा पूर्ण कायदेशीररीत्या करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले; मात्र यासाठी सरपंच सिक्वेरा यांनी कोणतेच सहकार्य केले नाही. पुतळा उभारण्याच्या ठिकाणी सरपंचांनी घाईघाईने अनधिकृतपणे ‘हायमास्ट’ दिवा उभारण्यासाठी काम चालू केले होते.

२. मुळात कळंगुटवासियांना विश्वासात घेऊनच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. पुतळा उभारून एक मास उलटला असूनही त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झालेली नाही. ‘पुतळ्यामुळे वाहतुकीची कोंडी होणार’, हा दावा खोटा आहे.

३. सरपंच इंग्रजीमध्ये बोलतांना योग्य व्याकरणासह बोलत नाहीत आणि यामुळे सुसंवाद साधला जात नाही. सरपंचांनी आदेशात चुकीचे शब्द वापरल्यानेच गोंधळ झाला. सरपंच सिक्वेरा यांनी शिवरायांची क्षमा मागून शिवरायांचे व्यवस्थापन शिकून घ्यावे. सरपंचपद हे कायमस्वरूपी नसते, हे त्यांनी जाणावे आणि पुढे निवडणुकीत कळंगुटवासियांनी त्यांना क्षमा न करता योग्य जागा दाखवावी.



हे वाचा –

गोवा : शिवप्रेमींच्या आंदोलनानंतर कळंगुटचे सरपंच सिक्वेरा यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा आदेश मागे
https://sanatanprabhat.org/marathi/694348.html

संपादकीय भूमिका

अशा लोकप्रतिनिधींवर कधीतरी विश्वास ठेवता येईल का ?