श्रीरामपूर (नगर) येथे वाळू तस्करांचा महसूल पथकाला चिरडण्याचा प्रयत्न !
श्रीरामपूर (अहिल्यानगर) – तालुक्यातील सरला गोवर्धन परिसरामध्ये वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल आणि पोलीस पथकांवर वाहने घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा स्वसंरक्षणाकरता पोलिसांनी हवेत गोळीबार केल्यानंतर वाळू तस्कर पळून गेले. ही घटना २५ जूनला मध्यरात्री घडली. तस्करी करणारी सर्व वाहने महसूल कार्यालयामध्ये आणण्यात आली आहेत. अनेक वाहनांवर ‘नंबर प्लेट’ नसल्याने कारवाई करण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे समजते. (वाळू तस्करांवर वारंवार कारवाई करण्यात येत असूनही ते वाळूची तस्करी करणे थांबवत नाहीत. म्हणजे त्यांच्यावर जरब बसेल, अशी कारवाई करण्यात येत नाही, असा याचा अर्थ होतो. जरब बसेल अशी कारवाई पोलीस कधी करणार ? – संपादक)
या वेळी धाड टाकण्यासाठी प्रशासन यंत्रणेने खासगी मालवाहतूक टेंपो नेला होता. त्यामुळे वाळू तस्करांनी या टेंपोकडे दुर्लक्ष केले. प्रत्यक्ष नदीपात्रामध्ये गेल्यानंतर पोलिसांना पहाताच अनेकांनी वाहने तशीच जागेवर ठेवून पळ काढला. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळूच्या अवैध तस्करीला आळा बसावा, यासाठी ६०० रुपये ब्रास वाळू विक्रीचे नवे धोरण आणले; परंतु तरीही श्रीरामपूर तालुक्यामधून मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा चालू असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. तस्करांवर कारवाईसाठी महसूल विभाग, तसेच तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.