ठाणे येथील सनातनच्या ४९ व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) कला प्रभुदेसाई (वय ८७ वर्षे) यांच्याविषयी त्यांची मुलगी सौ. भक्ती गैलाड यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
‘वर्ष १९९९ पासून प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे माझी आई पू. कला प्रभुदेसाई सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना आणि सेवा करायला लागल्या. वर्ष २०१५ मध्ये प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे त्यांना सनातनच्या ४९ व्या (व्यष्टी) संत म्हणून घोषित केले गेले. माझ्या लक्षात आलेली पू. आजींची गुणवैशिष्ट्ये येथे कृतज्ञताभावाने दिली आहेत.
१. अनावश्यक न बोलणे
पू. आईंच्या वाड्यातील महिला त्यांची कामे आटोपल्यानंतर गप्पा मारायला एकत्र जमत असत. आई कधीही त्यांच्या समवेत गप्पा मारायला गेली नाही. ‘घरातील कामे करणे आणि देवाच्या संदर्भातली पुस्तके वाचणे’, यांसाठी ती वेळ देत असे.
२. सन्मार्गी
वडिलांची सरकारी नोकरी होती. त्यांच्या उत्पन्नावर आमच्या कुटुंबाचे भागत नसे; म्हणून वडिलांनी आईला विचारले, ‘‘मी रिक्शा चालवू का ?’’ त्यासाठी त्यांना सरकारी नोकरी सोडावी लागणार होती. तेव्हा आईने वडिलांना सांगितले, ‘‘जोपर्यंत तुम्ही चांगल्या मार्गाने पैसे मिळवत आहात, तोपर्यंत तुम्ही कुठलेही काम केलेले मला चालेल. ‘माझ्या माहेरचे काय म्हणतील ?’, किंवा ‘आजूबाजूचे काय म्हणतील ?’, याचा विचार करू नका.’’
३. इतरांचा विचार
पू. आई रुग्णाईत असतांना त्यांना सलाईन लावतांना किंवा इंजेक्शन देतांना परिचारिकेला त्यांची शीर (नस) सापडत नसे. त्यामुळे परिचारिकेला वेगवेगळ्या ठिकाणी सुई टोचून पहावे लागायचे. तेव्हा पू. आई तिला विचारत असे, ‘‘माझ्यामुळे तुला त्रास होतो का ग ?’’ पू. आईंच्या मनात सतत इतरांचा विचार असतो, ‘माझी सेवा करणार्यांना माझ्यामुळे काही त्रास होत नाही ना ?, माझ्यामुळे कुणाला जागरण होत नाही ना ?, सर्व जण जेवले आहेत ना ?’ या प्रसंगांतून संत स्वतःला होणार्या त्रासापेक्षा ‘सातत्याने इतरांचा विचार कसा करतात ?’, हे माझ्या लक्षात आले.
४. सेवाभाव
अ. माझे वडील संघ परिवाराशी जोडलेले होते. कधी कधी आमचे जेवणे झाल्यानंतर संघस्वयंसेवक आमच्याकडे जेवायला येत, तेव्हा आई पुन्हा पूर्ण स्वयंपाक करून त्यांना वाढत असे.
आ. वडिलांकडे अनेक जण कामासाठी येत असत. तेव्हा ती घरी आलेल्या प्रत्येकाला सनातनचे ग्रंथ, सनातन पंचांग इत्यादी दाखवत असे आणि त्यांच्याकडे गुरुकार्यासाठी अर्पणही मागत असे. त्या वेळी वडील तिला थांबवायचा प्रयत्न करायचे. ती वडिलांना म्हणायची, ‘‘त्यांनी अर्पण दिले, तर मी घेणार आहे. तुम्ही मला अडवू नका.’’ अशा प्रकारे तिची घरबसल्या समष्टी सेवा होत असे.
५. गुरुदेवांवरील श्रद्धा
एकदा मी पू. आईंना विचारले, ‘‘तुमची मुले नामजप, साधना आणि सेवा करण्यात अल्प पडतात’, यांविषयी तुमच्या मनात कुठले विचार असतात ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘प.पू. गुरुदेव त्यांच्यासाठी योग्य तेच करणार आहेत. मला त्यांची काळजी वाटत नाही किंवा माझ्या मनात त्याविषयी विचारही असत नाहीत.’’
६. भाव
अ. ‘माझी काळजी घेणारे सर्व जण माझ्या अवतीभवती आहेत’, ही गुरुदेवांची माझ्यावर असलेली कृपाच आहे’, असा पू. आईंचा भाव असतो.’
आ. एकदा मी पू. आईंना विचारले, ‘‘तुम्हाला गुरुदेवांना भेटायला जायचे आहे का ?’’ तेव्हा पू. आई गुरुदेवांच्या छायाचित्राकडे निर्देश करून म्हणाल्या, ‘‘गुरुदेव इथेच आहेत. मला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही.’’
७. पू. कला प्रभुुदेसाई यांच्यामध्ये जाणवलेले पालट
अ. त्यांची त्वचा प्रकाशमान दिसते.
आ. त्यांच्या शरिरावर पुष्कळ सुरकुत्या आहेत; मात्र त्यांच्या चेहर्यावर फार अल्प प्रमाणात सुरकुत्या आहेत.
इ. त्यांच्या तळहाताची त्वचा गुलाबी दिसते.
ई. त्यांचे केस अधिक मऊ झाले आहेत.
उ. त्या कितीही रुग्णाईत असल्या, तरी त्यांचा चेहरा निर्विकार आणि शांत असतो.
८. वर्ष २००९ मध्ये आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आणि वर्ष २०१५ मध्ये संत घोषित झाल्यानंतर पू. कला प्रभुदेसाई यांना आलेल्या अनुभूती
८ अ. सूक्ष्मातील समजणे
१. ‘वर्ष २००९ मध्ये पू. आईंची (पू. (श्रीमती) कला प्रभुदेसाई यांची) आध्यात्मिक पातळी ६१ टक्के घोषित केली. तेव्हा त्या देवद आश्रमात रहायला गेल्या होत्या. तिथे त्यांना ‘हिरवी साडी नेसलेली एक स्त्री आश्रमात येत आहे’, असे सूक्ष्मातून सारखे दिसत होते आणि खरोखरच तशी एक सवाष्ण स्त्री देवद आश्रमात आली होती.
२. पू. आई साधकांसाठी नामजपादी आध्यात्मिक उपाय करत असतांना त्यांना एका साधिकेकडे बघून लहान मूल दिसत होते. नामजप झाल्यानंतर त्या साधिकेची विचारपूस केल्यावर त्यांना ‘ती गरोदर आहे’, असे समजले.
८ आ. १५ – २० वर्षांपूर्वी प.पू. गुरुदेवांनी वापरलेल्या औषधांची रिकामी खोकी ठेवलेल्या पिशवीला गुलाबी रंग येणे : जवळजवळ १५ – २० वर्षांपूर्वी प.पू. गुरुदेवांनी वापरलेल्या औषधांची रिकामी खोकी पू. आईंना चैतन्य मिळण्यासाठी दिली होती. ज्या पिशवीमध्ये ती खोकी ठेवली आहेत, त्या पिशवीला आता गुलाबी रंग आला आहे.’
९. पू. कला प्रभुदेसाई यांच्याविषयी आलेल्या अनुभूती
९ अ. पू. कला प्रभुदेसाई यांच्या सान्निध्यात थकवा जाऊन मन शांत होणे : मला एखाद्या गोष्टीचा ताण आला असेल, तर पू. आईंजवळ बसल्यावर ताण जाऊन मन शांत होतेे. कंटाळा आला असेल, तर उत्साही वाटते आणि थकवा आला असेल, तर तो जातो.
९ आ. पू. कला प्रभुदेसाई यांच्या जवळ बसून नामजप करतांना पूर्ण एकाग्रतेने नामजप होणे : एकदा मी पू. आईंच्या खोलीत नामजपाला बसले होते. तेव्हा मला माझ्या शरिराची जाणीव नव्हती. माझे लक्ष श्वासावर केंद्रित झाले होते आणि माझा एक घंट्यापेक्षा अधिक वेळ एकाग्रतेने अन् निश्चलपणे नामजप झाला होता. पू. आई झोपून उठल्यावर मी त्यांना विचारले, ‘‘मी नामजप करत असतांना तुम्ही प्रार्थना केली होती का ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मी प.पू. गुरुदेवांना म्हणाले, ‘बघा, ती नामजप करत आहे.’’
९ इ. पू. कला प्रभुदेसाई रुग्णाईत असतांना आलेल्या अनुभूती
९ इ १. कोरोना महामारीच्या वेळी पू. कला प्रभुदेसाई यांना कोरोना होणे, तेव्हाच स्वतःलाही कोरोना झाल्यामुळे त्यांच्या समवेत रहाता येऊन त्यांची सेवा करता येणे : कोरोना महामारीच्या वेळी पू. आईंना कोरोना झाल्यामुळे त्यांना अलगीकरणात ठेवले होते. त्याच वेळी मलाही कोरोना झाल्यामुळे देवाच्या कृपेने मला त्यांच्या समवेत रहाता येऊन त्यांची सेवा करता आली.
९ इ २. रात्री झोप अल्प होऊन आणि दिवसभरात न झोपूनही त्रास न होणे : पू. आईंना रात्री ३ – ४ वेळा प्रसाधनगृहात न्यावे लागे. पू. आईंनी हाक मारताक्षणी मला जाग येत असे आणि त्यांना प्रसाधनगृहात नेऊन आणल्यावर लगेच झोप लागत असे. एरव्ही मला सलग झोप मिळाली नाही, तर दिवसभर त्रास होतो; पण पू. आईंनी अनेकदा उठवूनही आणि दिवसभरात न झोपताही मला कुठलाही त्रास होत नसे.
९ इ ३. थकवा न येणे : अनेक जणांना कोरोनामुळे थकवा येत असे; परंतु पू. आईंची सेवा करतांना जागरण होऊनही मला कधीच थकवा आला नाही; उलट या कालावधीमध्ये पू. आईंच्या सेवेच्या समवेतच ‘ऑनलाईन’ सत्संग घेणे इत्यादी माझ्या सेवाही व्यवस्थित चालू होत्या.
९ इ ४. ‘संतांच्या अस्तित्वाने वास्तूमधील स्पंदने पालटतात’, हे गुरुदेवांच्या कृपेने अनुभवता येणे : ज्या खोलीत आम्हा दोघींना अलगीकरणासाठी ठेवण्यात आले होते, तिथे अगोदर माझा भाऊ (श्री. रवींद्र वामन प्रभुदेसाई, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६० वर्षे), माझा भाचा (श्री. परिक्षित रवींद्र प्रभुदेसाई, वय ३० वर्षे), मी आणि माझे यजमान (श्री. प्रमोद अनंत गैलाड, वय ६० वर्षे) वेगवेगळ्या दिवसांत अलगीकरणासाठी राहिलो होतो. त्यामुळे ‘त्या खोलीमध्ये थांबू नये’ असे मला वाटत असे; पण पू. आईंना त्या खोलीमध्ये अलगीकरणासाठी आणल्यावर त्यांच्या अस्तित्वाने ‘खोलीतील सर्व वाईट स्पंदने नाहीशी झाली’, असे मला जाणवले. ‘संतांच्या अस्तित्वाने वास्तूमधील स्पंदने पालटतात’, हे गुरुदेवांच्या कृपेने मला अनुभवता आले. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
९ इ ५. पुष्कळ शारीरिक त्रास होत असूनही पू. आईंचा चेहरा निर्विकार असणे : आजारपणामध्ये पू. आईंना कितीही त्रास होत असला, कितीही दम लागत असला, तरी त्यांचा चेहरा निर्विकार दिसतो. त्रासाचा लवलेशही त्यांच्या चेहर्यावर दिसत नाही. यातून ‘संतांची स्थिती कशी असते ?’ हे माझ्या लक्षात आले.
९ इ ६. पू. आईंच्या सेवेसाठी देवाने शक्ती दिल्यामुळे सतत कृतज्ञताभावात रहाता येणे : पू. आईंच्या सेवेसाठी देवच मला शक्ती देत होता. देवाच्या या कृपेची जाणीव होऊन मला कृतज्ञता वाटली. ‘संतांची सेवा कशी करायची ?’, ‘भाव कसा ठेवायचा ?’, हे मी ‘प.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण’, या ग्रंथात वाचल्यामुळे मला ते कृतीत आणता आले. त्यामुळे मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती आणि त्या १५ दिवसांच्या कालावधीमध्ये माझी सतत भावजागृती होत होती.
१०. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘साधनेमुळे संतांचा देह आणि विचार यांच्या स्तरावर झालेले पालट गुरुदेवांच्या कृपेने माझ्या लक्षात आले अन् माझ्याकडून पू. आईंवर लेख लिहिला गेला’, यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘हे गुरुदेवा, आम्हा सर्वांमध्ये साधनेची तळमळ वाढू दे’, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहेे.’
– सौ. भक्ती गैलाड (पू. (श्रीमती) कला प्रभुदेसाई आजींची मुलगी) (वय ५७ वर्षे), ठाणे. (२६.५.२०२३)
|