‘टीईटी’ प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणातील बीड जिल्ह्यातील ७६ उमेदवारांचे प्रमाणपत्र अवैध !
छत्रपती संभाजीनगर – मागील वर्षी राज्यात गाजलेल्या टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणात अपप्रकार करून उत्तीर्ण झाल्याचे निष्पन्न झाल्याने बीड जिल्ह्यातील शिक्षक पात्रता परीक्षा वर्ष २०१८ मधील १ आणि वर्ष २०१९ मधील ७५ अशा एकूण ७६ शिक्षकांची संपादणूक रहित करण्यात आली असून त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. शिक्षकांचा टीईटी प्रमाणपत्र घोटाळा उघड झाल्यानंतर पुणे येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले होते. या गुन्ह्यांच्या अन्वेेषणात हे ७६ शिक्षक अपप्रकार करून उत्तीर्ण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
शिक्षकांचा टीईटी प्रमाणपत्र घोटाळा उघड झाल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला वर्ष २०१३ ते २०१९ या कालावधीतील सर्व प्रमाणपत्रे जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार बीड जिल्ह्यात वर्ष २०१३ नंतर रुजू झालेल्या शिक्षकांकडील टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी शिक्षण विभागाने मागवले होते. ज्यात बीड जिल्ह्यात ११५ प्राथमिक आणि ३५ माध्यमिक शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र संबंधित शाळांनी सादर करत ते राज्य पडताळणीसाठी पाठवण्यात आले होते. यात अनेकजण अपात्र ठरले होते. या प्रकरणी पुणे येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आला होते, तसेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अपमार्गाने उत्तीर्ण केल्याचे निष्पन्न झाल्याने बीड जिल्ह्यातील ७५ शिक्षक आणि उमेदवार यांची सूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकार्यांना पाठवली आहे. संबंधितांविरुद्ध नियमानुसार कार्यवाहीचे निर्देश दिले आहे. त्यामुळे या शिक्षकांची सूची संबंधित संस्थेला पाठवून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.