जगभरात भारताच्या विकासाचा डंका !
एकीकडे अनेक देश मंदीच्या गर्तेत जात असतांना भारताची अर्थव्यवस्था मात्र चांगल्या स्थितीत आहे. ग्लोबल रेटिंग एजन्सी ‘एस् अँड पी’ यांच्या अहवालानुसार पुढील ३ वर्षांत भारताची अर्थव्यवस्था ६.७ टक्क्यांनी वाढेल. जागतिक पातळीवर ‘आम्हीच दादा’ अशी बतावणी करणार्या चीनच्या अर्थव्यवस्थेचा फुगा हळूहळू फुटत आहे. निधीची आवश्यकता भासल्यावर बळजोरीने सामान्य नागरिकांचे पैसे असलेल्या बँका कह्यात घेणे, कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती यांसारख्या अनेक कारणांमुळे चीनचा आर्थिक विकासदर ५.५ टक्क्यांवरून ५.२ टक्के इतका खाली आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ जून या दिवशी देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणार्या ५ नवीन ‘वन्दे भारत’ रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. ही घटना देश सातत्याने आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करत असल्याचे निर्देशित करते. गेल्या १० वर्षांपासून भारतीय अर्थव्यवस्थेत सातत्याने सुधारणा होत असून या कालावधीत जागतिक स्तरावर भारताला टक्कर देऊ शकेल असे कुणीच नाही.
भारतीय अर्थव्यवस्थेची गतीने प्रगती !
महागाई आणि अधिकोषांच्या अडचणी यांमुळे अमेरिका सध्या मंदीच्या उंबरठ्यावर आहे. युरोपची अर्थव्यवस्था कोरोनानंतर सुरळीत झालेलीच नाही, इतकेच काय तर युरोपमधील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेली जर्मनी सध्या आर्थिक मंदीला तोंड देत आहे. श्रीलंका, पाकिस्तान यांच्यासारख्या अनेक छोट्या देशांचे तर दिवाळे निघालेलेच आहे. याउलट भारतातील बँकांची आर्थिक स्थिती सातत्याने सुधारत असून वर्ष २०१७-१८ पर्यंत ८५ सहस्र ३९० कोटी रुपयांचा तोटा सहन करणार्या बँका वर्ष २०२३-२४ मध्ये १ लाख ४ कोटी रुपये नफ्यात आल्या. वर्ष २०१४ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था १० व्या क्रमांकावर होती, जी आता ५ व्या क्रमांकावर असून वर्ष २०२७ पर्यंत ती ३ र्या क्रमांकावर जाण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
पंतप्रधानांचा यशस्वी अमेरिका दौरा !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा यशस्वी झाला असून येत्या काळात तेथील दिग्गज आस्थापने भारतात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. अॅमेझॉन हे आस्थापन २ सहस्र ६०० कोटी रुपये, तर गूगल १ सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गुजरात येथे गूगलचे ‘जागतिक फिनटेक ऑपरेशन सेंटर’ उभारण्यात येणार आहे. अमेरिकेतील ‘मायक्रॉन’ हे आस्थापन २.५ अब्ज डॉलर्स गुंतवणूक करून ‘सेमीकंडक्टर प्लांट’ उभी करणार आहे. आजपर्यंत अमेरिका आणि अन्य देशांतील बहुतांश आस्थापने चीनलाच प्राधान्य देत असत. आता मात्र चित्र गतीने पालटत असून एलन मस्क यांचे ‘टेसला’ हे आस्थापनही भारतात मोठी गुंतवणूक करणार आहे. भारताची विश्वासार्हता वाढत असल्याचे हे लक्षण आहे.
‘मेक इन इंडिया’चा लाभ !
स्वातंत्र्यानंतर काँग्रेस शासनाने देशातील उद्योगधंदे विकसित होण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कधीच रस घेतला नाही. येथील क्लिष्ट नियम, भूमी मिळण्यात येणार्या अडचणी, अन्यायकारक करप्रणाली, लालफितीत अडकलेले प्रशासन यांमुळे एखाद्याला नवीन उद्योग चालू करणे अवघड बनत गेले. याउलट चीनमध्ये कच्च्या मालाची उपलब्धता करून देण्यापासून निर्यातीपर्यंतच्या सर्व सुविधा तेथील शासनाने लहान-लहान उद्योजकांनीही उपलब्ध करून दिल्या. यामुळे जागतिक स्तरावर चीनचा दबदबा निर्माण झाला.
‘जोपर्यंत आपण कच्च्या मालासाठी प्रत्येक लहान-सहान गोष्टीत परकियांवर अलंबून आहोत, तोपर्यंत देशाची प्रगती नाही’, हे मर्म ओळखून पंतप्रधान मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ची घोषणा केली. उद्योगातील प्रत्येक घटकापासून संरक्षण क्षेत्रातही स्वदेशी बनावटीचे हेलिकॉप्टर, युद्धनौका, तोफा बनवण्यावर भर दिला. यासाठी लागणारे सर्व छोटे छोटे भाग भारतातच सिद्ध होऊ लागल्याने भारतीय अर्थव्यवस्थेलाही गती मिळाली. अवकाशापासून प्रत्येक क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण होऊ लागल्याने जगाचा भारताकडेही पहाण्याचा दृष्टीकोन पालटला. रशिया, फ्रान्स आणि अमेरिका उपग्रह सोडण्यासाठी लहान देशांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेत असत. भारताने या क्षेत्रात प्रगती करून या देशांपेक्षा तीनपट अल्प मूल्यात हे उपग्रह सोडणे चालू केले. एकाच वेळी १०० पेक्षा अधिक उपग्रह अवकाशात सोडण्याची क्षमता भारताने विकसित केली.
राष्ट्रहितैषी नेतृत्वच हवे !
सध्या जागतिक पातळीवर विचार केल्यास परिस्थिती झपाट्याने पालटत आहे. रशिया-युक्रेनचे युद्ध असो, इजिप्तमधील संघर्ष, चीनची तैवानसह अन्य देश गिळंकृत करण्याची महत्त्वाकांक्षा पहाता यापुढील काळात या सर्व युद्धजन्य स्थितीला तोंड देत राष्ट्राचा विकास करणारे कणखर नेतृत्वच आवश्यक आहे. अनेक संतांनी येणारा काळ हा आपत्काळ-युद्धकाळ असणार असे सांगितल्याने विकासाची घौडदौड चालू असतांना या काळात तरून जाण्यासाठी नागरिकांमध्ये साधनेचे बीज रूजवणेही तितकेच आवश्यक आहे ! असे झाल्यास भविष्यात जागतिक स्तरावरील नेतृत्वही भारताकडे येईल आणि हिंदु राष्ट्र ते हिंदु विश्व ही संकल्पना साकारतांना दिसेल !
पुढील काळात युद्धजन्य स्थितीला तोंड देत राष्ट्राचा विकास करणारे कणखर नेतृत्वच आवश्यक ! |