सिंधुदुर्ग : सावंतवाडी रक्तपेढीतील रिक्त पदे भरावीत, यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे आंदोलन
सावंतवाडी – येथील उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीतील रिक्त पदे भरा, या मागणीसाठी वारंवार निवेदने आणि चेतावणी देण्यात आली; मात्र तरीही ६ मासांहून अधिक काळ याची प्रशासनाने नोंद घेतली नाही, असा आरोप करत ‘युवा रक्तदाता संघटने’ने सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर २६ जून या दिवशी आरोग्य विभागाच्या निषेधार्थ हाताला काळी फित बांधून आंदोलन केले. ‘रिक्त पदे तातडीने न भरल्यास जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयाबाहेर आत्मदहन करू’, अशी चेतावणी संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी या वेळी दिली.
या वेळी देव्या सूर्याजी म्हणाले,
‘‘सावंतवाडीची रक्तपेढी बंद करण्याचा घाट प्रशासन आखत आहे. २६ जूनपर्यंत रिक्त पदांविषयी कार्यवाही करण्याची चेतावणी देऊनही प्रशासनाने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे आंदोलनाद्वारे आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य प्रशासन यांचा निषेध करत आहोत. तातडीच्या वेळी आम्ही रक्तदाते सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करण्यासाठी येतो; मात्र उपजिल्हा रुग्णालयातील पदभरती होत नाही, तोपर्यंत आम्हाला देखील रक्तदान करतांना विचार करावा लागेल अन् याला सर्वस्वी जिल्हा आरोग्य प्रशासन उत्तरदायी असेल.’’
या वेळी गौतम माठेकर, अर्चित पोकळे, संदीप निवळे, राजू धारपवार, सूरज मठकर आदी उपस्थित होते.
संपादकीय भूमिकाअसे आंदोलन करावे लागणे, हे आरोग्य विभागाला लज्जास्पद ! |