गोव्यात निम्म्या सरकारी प्राथमिक शाळांमध्ये १० किंवा त्याहून अल्प विद्यार्थी
पणजी – गोव्यात मागील शैक्षणिक वर्षी (वर्ष २०२२-२३ मध्ये) ६ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत. विशेष म्हणजे राज्यातील ७१२ पैकी ३७४ सरकारी प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या १० किंवा त्याहून अल्प आहे. यामुळे या शाळांमध्ये तातडीने विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न न झाल्यास पटसंख्येच्या अभावी शाळा बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. गोवा सरकार मात्र सरकारी प्राथमिक शाळांच्या साधनसुविधांमध्ये वाढ केल्याचा दावा करत आहे.
Govt primary schools face bleak future in Canaconahttps://t.co/IfMIAOmYBp#TodayInTheGoan @goacm @MyGovGoa @GovtofGoa pic.twitter.com/F0YQLGgTRN
— The Goan 🇮🇳 (@thegoaneveryday) June 23, 2023
वर्ष २०२२-२३ मध्ये बंद पडलेल्या सरकारी प्राथमिक शाळांमध्ये ४ मराठी माध्यमातील, तसेच मराठी-कन्नड आणि कोकणी-मराठी माध्यमातील प्रत्येकी एक शाळा यांचा समावेश आहे. यामध्ये काणकोण आणि बार्देश तालुक्यांतील प्रत्येकी २, तर सांगे आणि धारबांदोडा तालुक्यांतील प्रत्येकी एका शाळेचा समावेश आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या १० किंवा त्याहून अल्प असलेल्या सरकारी प्राथमिक शाळांची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. धारबांदोडा – एकूण ४९ शाळांपैकी ४१ शाळा, काणकोण – ६३ पैकी ४३, सांगे – ५२ पैकी ३४, केपे -५६ पैकी २४, पेडणे – ६४ पैकी ४०, डिचोली – ७३ पैकी ४०, सत्तरी १०१ पैकी ५२, फोंडा – १०३ पैकी ५०, बार्देश – ५७ पैकी २६, तिसवाडी – ३३ पैकी ९, सासष्टी – ४१ पैकी ११ आणि मुरगाव – २० पैकी ४ शाळा. विशेष म्हणजे खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या सरकारी प्राथमिक शाळांपेक्षा साडेतीन पट अधिक आहे. मागील १० वर्षांच्या कालावधीत सरकारी प्राथमिक शाळांची संख्या १ सहस्रवरून आता ७१२ वर आलेली आहे.