मानाच्या संत मुक्ताबाई पालखीचे पंढरपुरात आगमन !
पर्जन्यवृष्टी करत वरुणराजाने केले स्वागत
सोलापूर – मानाच्या सात पालख्यांपैकी एक असलेल्या संत मुक्ताबाई यांची पालखी आज पंढरपुरात पोचली आहे. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही पालखी पंढरपुरात पोचताच वरुणराजाने पर्जन्यवृष्टीने तिचे स्वागत केले.
आषाढी महासोहळ्यासाठी राज्यभरातून शेकडो पालखी सोहळे पायी पंढरीची वाट चालत असतांना पहिल्या मानाच्या पालखी सोहळ्याचे पंढरीत आगमन झाले आहे. सर्वच पालखी सोहळे वारकरी संप्रदायासाठी पूजनीय असले, तरी मानाच्या समजल्या जाणार्या सात पालख्यांतील संत मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा आज ३ च्या सुमारास पंढरपूरमध्ये आला. वरुणराजाने जोरदार पर्जन्यवृष्टी करीत आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या सोहळ्याचे स्वागत केले. तापी तीरावरून आलेल्या या पालखी सोहळ्याने गेल्या २४ दिवसांत जवळपास ६०० कि.मी.चे अंतर पायी कापले आहे. यंदा या पालखी सोहळ्याने वाट थोडी पालटल्याने ११ दिवसांचे आणि १५० कि.मी.चे अंतर अल्प झाले. त्यामुळे वारकर्यांचा प्रवास सुसह्य झाला.