नाशिक येथील अंजनेरी-ब्रह्मगिरी या प्रस्तावित रोपवेला पर्यावरणप्रेमींचा विरोध !
‘जटायू बचाव, रोपवे हटाव’च्या घोषणा !
नाशिक – अंजनेरी-ब्रह्मगिरी या प्रस्तावित रोपवेला (ट्रॉलीमध्ये बसून तारांच्या साहाय्याने उंच ठिकाणी जाण्याचा मार्ग) पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवला. रोपवेमुळे होणार्या जैवविविधतेची हानी लक्षात घेता तातडीने हा रोपवे रहित करावा, या मागणीसाठी ब्रह्मगिरी येथे जटायू पूजन करून ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी यांनी विरोध केला. अंजनेरीची जैवविविधता आणि ब्रह्मगिरीची पवित्रता अबाधित राखण्यासाठी मेटघर ग्रामस्थ, त्र्यंबकवासी, पर्यावरणप्रेमी एकवटले आहेत. हुतात्मा स्मारकात पर्यावरणप्रेमींच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे २५ जून या दिवशी ब्रह्मगिरी पायथ्याशी जटायू पूजन करून या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.
केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेअंतर्गत पर्यटनास चालना देण्यासाठी ब्रह्मगिरी-अंजनेरी रोपवे प्रस्तावित आहे. या दृष्टीने निविदा काढण्याची प्रक्रियाही चालू करण्यात आली आहे; मात्र दुसरीकडे अतीदुर्मिळ जैवविविधतेसाठी प्रसिद्ध अंजनेरी पर्वताला अभयारण्य घोषित करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न चालू आहेत. या ठिकाणी रोपवे उभारणे जैवविविधतेसाठी धोकादायक ठरणार आहे. येथील अरण्य वाचवण्यासाठी ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी नागरिक लवकरच वनमंत्र्यांची भेट घेणार आहेत. रोपवेविरुद्धचा लढा तीव्र आंदोलन करून अधिक बळकट करण्याचा निर्णय सर्व निसर्गप्रेमी आणि ग्रामस्थ यांच्याकडून घेण्यात आला.
रोपवेला विरोध करत जटायूंचा अधिवास टिकवून ठेवण्यासाठी ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी मेटघर निवासी, त्र्यंबकनिवासी, धर्मगुरु गिरिजानंद सरस्वती महाराज, आनंद आखाडा, त्र्यंंबकेश्वर, मेटघरचे सरपंच झोले, ललित गुरु लोहगावकर, प्रकाश दिवे, कैलास देशमुख, हरित ब्रह्मगिरी सदस्य आणि रमेश अय्यर, कुलदीप कौर, आधुनिक वैद्य संदीप भानोसे, भारती जाधव, अरविंद निकुंभ, जगबीर सिंग, नितीन रेवगडे, जयेश पाटील, सूरज अकोलकर, हेमंत जाधव, शिवराज रेवगडे, टीम वृक्षवल्ली, पांजरपोळ ग्रुप, तसेच २०० हून अधिक पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
केंद्रशासनाच्या राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट आस्थापनाने प्रस्तावित रोपवे प्रकल्पाची निविदा प्रक्रिया चालू केली आहे. प्रक्रियेचा अंतिम दिनांक ३१ जुलैपर्यंत आहे. प्रकल्पाचा मुख्य कंट्रोल रूम पेगलवाडी येथे राहील. रोपवेची लांबी ५.७ किलोमीटर असणार असून या प्रकल्पावर होणारा व्यय अनुमाने ३७५ कोटी रुपये इतका आहे.
प्रकल्पाने पर्यावरणाची हानी होणार नाही ! – खासदार हेमंत गोडसे
रोपवे प्रकल्पासाठी ६ वर्षांपासून केंद्रशासनाकडे नियमित पाठपुरावा केला. प्रकल्पाची व्यवहार्यता पडताळण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यास देशभरातीलच नव्हे, तर जगभरातील पर्यटक याठिकाणी पर्यटनासाठी येऊ शकतील. या प्रकल्पाने कुठल्याही प्राण्यांची हानी होणार नसून नैसगिक संपदा तशीच राहील. केवळ चांगल्या प्रकल्पाला विरोध करू नये.
रोपवे म्हणजे काय ?रोप म्हणजे दोरी आणि वे म्हणजे मार्ग. दोरी आणि मार्ग म्हणजे ट्रॉलीमध्ये बसून तारांच्या साहाय्याने जाणारे विद्युत् ऊर्जेवर चालणारे यंत्र जे सखल ठिकाणाहून उंच जागी जाते. तिथे रोपवेमध्ये बसण्यासाठी जागा असते. त्यामध्ये १० ते १२ लोक सहज बसू शकतात. ही सुविधा बहुतेक मंदिरांमध्ये उपलब्ध आहे. वृद्ध, अपंग लोक पायर्या किंवा वाटेने जाऊ शकत नाहीत, ते याचा लाभ घेऊ शकतो. |