संगीतोपचार !
पृथ्वीतलावर एकही व्यक्ती नसेल, जिला संगीत आवडत नाही. संगीत ऐकल्याने मन उत्साही, सकारात्मक होते, असे अनेकांनी अनुभवले असेल आणि अनुभवतही असतील. हिंदु धर्मात संगीतासाठी देवताही आहेत. ऋषिमुनींनी संगीताचा अभ्यास करून वेगवेगळे रागही निर्माण केले आहेत. या रागांचा मनावर विविध प्रकारे परिणाम होत असतो, हेही संशोधनातून समोर आले आहे. अनेक देशांत तर रुग्णांवर संगीतोपचार करून त्याला बरे करण्याचा प्रयत्न केला जातो. माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंह आजारी असतांना त्यांच्या कानांना ईअरफोनद्वारे गुरुबाणी (गुरुग्रंथ साहिबमधील अभंग) ऐकवले जात होते. त्यामुळे त्यांच्या शरिरावर चांगला परिणाम होत असे. एका संशोधनानुसार केवळ मनुष्यच नाही, तर प्राण्यांनाही संगीत आवडते आणि त्यांच्यावर चांगला परिणाम दिसून येतो, असेही समोर आले आहे. इतकेच नव्हे, तर वनस्पतींवरही संगीताचा चांगला परिणाम होत असतो, हेही यापूर्वी संशोधनातून समजले होते. कर्नाल (हरियाणा) येथील ‘नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या हवामान प्रतिरोधक पशूधन संशोधन केंद्राने दुभत्या प्राण्यांवर संशोधन केले आहे. या प्राण्यांना मधुर संगीत ऐकवल्यावर हे प्राणी तणावमुक्त झाले आणि ते अधिक प्रमाणात दूध देऊ लागले.
आता या संशोधनाचा लाभ दुभती जनावरे पाळणार्या लोकांनी उठवला पाहिजे. त्यातही या संशोधनात प्राण्यांना भजन, स्तोत्र ऐकवण्यात आले होते, हे लक्षात घेऊन तसे प्रयत्न केले पाहिजेत. आधुनिक संगीत ऐकवून प्राण्यांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. अशा संगीतामुळे रज-तम वाढते आणि शरीर अन् मन यांवर वाईट परिणाम होतो, हेेही संशोधनातून लक्षात आलेले आहे. आता सरकारने स्वतःहून पुढाकार घेऊन पशूपालन करणार्यांमध्ये संगीताच्या संदर्भात जागृती करावी, तसेच शेतकर्यांनी त्यांच्या शेतातील पीक अधिक प्रमाणात मिळावे; म्हणूनही पिकांना मधुर संगीत ऐकवावे, असे सांगितले पाहिजे. संत सावता माळी त्यांच्या शेतात भाज्या पिकवत असतांना पीक अधिक प्रमाणात येत असे, असे सांगितले जाते. याचे कारण ते शेती करतांना भावपूर्ण अभंग आणि भजन म्हणत. विठ्ठलाला आळवत असत. याचा परिणाम पिकांवर होत असे. आधुनिक विज्ञानाने संगीताचा परिणाम वनस्पतींवर होतो, हे सिद्ध केले आहे. त्याचा लाभ शेतकर्यांनी करून घ्यायची आवश्यकता आहे. आजही काही शेतकरी हा प्रयत्न करतांना दिसतात. त्यांच्या अनुभूतीही वाचनात येतात. केवळ प्राणी, शेती यांच्यावरच संगीताचा परिणाम होतो, असे नाही, तर वातावरणावरही परिणाम होतो. ‘संगीत सम्राट’ अशी पदवी लाभलेले तानसेन यांच्या गायनामुळे पाऊस पडत असे, दीप प्रज्वलीत होत असत, असे म्हटले जाते. आज वातावरण पालटाच्या जागतिक समस्येवरही संगीताचा कसा वापर करता येईल ? याचेही संशोधन करण्याची आवश्यकता आहे.