‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी आलेल्या हिंदुत्वनिष्ठांना साधनेचे महत्त्व समजावून सांगण्याची संधी मिळणे
‘१६ ते २२ जून २०२३ या कालावधीत गोवा, फोंडा येथील रामनाथी देवस्थानाच्या सभागृहात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ भरवण्यात आला होता. त्यासाठी देशभरातून आलेल्या ३५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांना अध्यात्माशी संबंधित काही प्रयोग दाखवण्याची सेवा मला दिली होती. हे प्रयोग बघण्यासाठी प्रतिदिन ५० हिंदुत्वनिष्ठ यायचे. या प्रयोगांमध्ये ‘आध्यात्मिक उन्नती केल्यावर देहातून पंचमहाभूते कशी प्रक्षेपित होतात आणि त्यांमुळे कोणकोणत्या अनुभूती येतात ?’, हा विषय होता. माझ्या देहातून प्रक्षेपित होणारे तेजतत्त्व आणि वायुतत्त्व मी प्रयोगांद्वारे हिंदुत्वनिष्ठांना दाखवले. त्यानंतर त्या प्रयोगांचे शास्त्र त्यांना समजावून सांगितले. याद्वारे त्यांना साधनेचे महत्त्व समजावून सांगण्याची संधी मला मिळाली. तेव्हा त्यांना मी पुढीलप्रमाणे सांगितले.
१. बहुतेक हिंदुत्वनिष्ठ हिंदुत्वाचे कार्य करतात; पण ते साधना करत नसल्याने त्यांचे कार्य फारसे प्रभावी ठरत नसणे; म्हणून त्यांना ‘साधना का आणि कशी करायची ?’, हे सांगायचे ठरवणे
सध्या फारच अल्प लोक साधना करतात. बहुतेकांना ‘साधना करायची असते’, हेच ठाऊक नाही. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ हिंदुत्वासाठी कार्य मन लावून करतात; पण त्यांची साधना नसल्याने त्या कार्यात ईश्वराचे अधिष्ठान नसते. ईश्वराचे साहाय्य मिळत नसल्याने ते करत असलेले कार्य फारसे प्रभावी ठरत नाही. त्यामुळे त्यांची शक्ती व्यय होते; पण त्यातून काही लाभ होत नाही. हिंदुत्वनिष्ठांची ही स्थिती लक्षात आल्याने मी त्यांना प्रयोगानंतर ‘साधना का आणि कशी करायची ?’, हे सांगायचे ठरवले अन् त्यांना पुढीलप्रमाणे सांगितले.
२. साधनेचे महत्त्व सांगणे
मानवाला मनुष्यजन्म हा साधना करून ईश्वरप्राप्ती करण्यासाठी मिळाला आहे. ते त्याच्यासाठी ध्येय असले पाहिजेे. त्यामुळे साधना केली नाही, तर तो जन्म फुकट जाईल आणि मग पुन्हा केव्हा मनुष्यजन्म मिळेल, हे सांगता येत नाही. तसेच आपण मागच्या जन्मी काहीतरी चांगले केले आहे; म्हणून हा मनुष्यजन्म मिळाला आहे. जर आपण या जन्मी साधना केली नाही, तर ईश्वराने आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी दिलेली ही संधी फुकट जाईल. तसेच या जन्मात साधना करून आपण ठराविक आध्यात्मिक उन्नतीला पोचलो, तर पुढील जन्मात त्या ठराविक आध्यात्मिक उन्नतीपासून आपला आरंभ होतो. अध्यात्मात पुन्हा पहिल्यापासून साधनेला आरंभ करावा लागत नाही. त्यामुळे या जन्मात केलेली साधना फुकट जात नाही.
३. कोणतेही कर्तव्य पार पाडत असतांना ते ईश्वराला स्मरून, नामस्मरणासहित आणि निरपेक्षपणे केल्याने, तसेच धर्म आणि आचारधर्म यांचे पालन केल्याने आपली साधना होणार असल्याचे सांगणे
ईश्वराने आपल्याला जन्माला घातले आहे, तर आपल्याला काही ना काही कर्तव्ये करावी लागतात. कुटुंबियांशी आपला देवाण-घेवाण हिशोब असल्याने त्यांच्याप्रती आपली कर्तव्ये असतात. तसेच समाजाप्रतीही आपली कर्तव्ये असतात. त्यामुळेच आपण हिंदुत्वाचे कार्य करतो. कोणतेही कर्तव्य पार पाडत असतांना आपण ते ईश्वराला स्मरून केले, नामस्मरणासहित केले आणि निरपेक्षपणे केले की, त्यामध्ये आपली साधना होते. तसेच कर्तव्य पार पाडत असतांना आपण ‘धर्म काय सांगतो ?’, हे जाणून केले, तर ते योग्य होते. धर्मपालन महत्त्वाचे आहे. ते केले की, आपली साधना होते. हिंदु धर्माने ‘आपण सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी करतो, त्या कशा कराव्यात ?’, हे सांगणारा ‘आचारधर्म’ सांगितला आहे. त्याचेही पालन करायला हवे. त्यानेही आपली साधना होते.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली नाविन्यपूर्ण अशी ‘अष्टांगसाधना’ करण्यास सांगणे
नामस्मरण करणे, तसेच धर्म आणि आचारधर्म यांचे पालन करणे, याने काही टप्प्यापर्यंत आध्यात्मिक उन्नती होते; पण मोक्षप्राप्तीपर्यंत, म्हणजे ईश्वराशी एकरूप होण्यापर्यंत जायचे असेल, तर तेवढे पुरेसे नसते. चित्तशुद्धी होणे आवश्यक असते. यासाठी ज्या प्रकारे साधना होणे आवश्यक आहे, ती होण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी नाविन्यपूर्ण अशी ‘अष्टांगसाधना’ सांगितली आहे. त्यामध्ये ‘स्वभावदोष-निर्मूलन (तसेच गुणसंवर्धन), अहं-निर्मूलन, नामजप, भावजागृती, सत्संग, सत्सेवा, त्याग आणि प्रीती’ ही ८ अंगे, म्हणजे टप्पे आहेत. ही अष्टांगसाधना हे परिपूर्ण शास्त्र आहे. अशा प्रकारे साधना केली, तर आध्यात्मिक उन्नती निश्चितच होतेे. दिवसभरातील प्रत्येक कृती करतांना या ८ अंगांपैकी कोणकोणत्या अंगांनी आपण साधना करू शकतो, याचे चिंतन करावे आणि त्याप्रमाणे कृती करावी. प्रतिदिन दैनंदिनी भरावी. त्यामध्ये दिवसभरात आपण काय काय कृती केल्या, त्यांमध्ये काय साधना केली, कोणत्या चुका केल्या इत्यादी लिहावे. त्यामुळे ‘उद्या आपल्यात काय सुधारणा करायची आहे ?’, हे ठरवता येते.
हिंदुत्वनिष्ठांना हे सर्व सांगतांना मला प्रतिदिन पुष्कळ आनंद मिळत होता. त्यांच्याप्रती माझ्यात प्रीती जागृत होत होती. ‘आणखी कसे सांगितले की, त्यांना ते सहज समजेल’, असे विचार माझ्या मनात येत होते. देवाने मला ही समष्टी साधना करण्याची संधी दिली, याबद्दल माझ्या मनात कृतज्ञताही वाटत होती. हिंदुत्वनिष्ठांनी अष्टांगसाधनेच्या प्रक्रियेविषयी त्यांच्या मनात आलेल्या शंकांचे निरसन करून घेतले. एका संतांनी ‘त्यांचे शिष्य आणि स्वतःसुद्धा ही साधना शिकण्यासाठी आश्रमात येऊ शकतो का ?’, असे विचारले. अशा प्रकारे मला या सेवेची फलश्रुती मिळाली, यासाठी मी श्री गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (सद़्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२३.६.२०२३)
‘साधनेमध्ये एखादी गोष्ट जाणून घ्यायची असेल, तर ती मन किंवा बुद्धी याने जाणून घ्यायची नाही, तर त्या गोष्टीची अनुभूती घ्यायची, म्हणजे त्याचे खरे उत्तर मिळते; कारण साधनेमध्ये अनुभूती घेण्याला महत्त्व आहे. अनुभूती घेणे हे सूक्ष्मातील आहे, तर मन आणि बुद्धी यांनी जाणून घेणे हे स्थुलातील आहे.’
– (सद़्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१४.६.२०२३) |