‘आदिपुरुष’ चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांचे अध:पतन !
‘सध्या आपल्या देशात आपला धर्म आणि संस्कृती यांविषयी विपरीत अर्थ काढून त्यांची जागतिक स्तरावर विटंबना करण्याचा प्रयत्न चालू आहे. स्वतःला बुद्धीवादी आणि विद्वान समजणार्या अनेकांनी हिंदु धर्म विकृत स्वरूपात जगासमोर आणण्याचा घाट घातला आहे. रामायण आणि महाभारत हे दोन ग्रंथ हिंदु धर्म अन् संस्कृती यांचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे आपणही या दोन श्रेष्ठतम ग्रंथांविषयी समाजात चुकीचा संदेश जाणार नाही, याची काळजी घेऊन त्याचे सादरीकरण केले पाहिजे. ते करतांना आपल्याच हातून काही कळत नकळत चूक घडली, तर ‘माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखे’ होईल.
१. वाल्मीकि ऋषींनी लिहिलेले रामायण हेच सत्य आणि तोच खरा इतिहास !
वाल्मीकि ऋषि यांच्याखेरीज अनेकांनी रामायण लिहिले आहे. उत्तर रामायण हे वाल्मीकिंनी लिहिलेले नाही. याच उत्तर रामायणामुळे श्रीरामांचे चरित्र कलंकित झाले आहे. न्यायमूर्ती राम केशव रानडे म्हणतात, ‘‘उत्तर रामायण हे तोतयाचे बंड आहे.’’ ब्रह्मदेवांनी वाल्मीकि ऋषि यांना आशीर्वाद दिला होता. त्यानंतर त्यांनी नारदमुनींना काही प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांची उत्तरे देतांना नारदमुनींनी वाल्मीकिंना संक्षिप्त स्वरूपात संपूर्ण रामायण कथन केले. हे रामायण मूळ रामायण असून ते १०० श्लोकांचे आहे. ते वाल्मीकि रामायणाच्या बालकांडातील पहिल्या सर्गामध्ये आपल्याला वाचायला मिळते. जेव्हा नारदमुनी प्रभु श्रीरामांचे चरित्र वाल्मीकिंना सांगत होते, तेव्हा श्रीराम आणि रावण यांच्यात युद्ध होऊन बराच काळ लोटला होता. श्रीराम अयोध्येचे राजा होते आणि रामराज्य अस्तित्वात आले होते. वाल्मीकि ऋषींनी दर्भासनावर बसून चित्त एकाग्र केले. योग सामर्थ्याच्या बळावर त्यांना श्रीरामांच्या संपूर्ण चरित्राचे ज्ञान झाले. जणू काही श्रीरामांच्या जीवनातील संपूर्ण भूतकाळ दृश्य स्वरूपात त्यांच्या दृष्टीसमोर उभा राहिला. त्या बळावरच त्यांनी रामायण लिहिले आहे.
नारदमुनी आणि वाल्मीकि यांची भेट झाल्यानंतर ब्रह्मदेव वाल्मीकि ऋषि यांना भेटण्यासाठी स्वतः त्यांच्या आश्रमात गेले. क्रौंच पक्षाच्या शिकारीचा प्रसंग ब्रह्मदेवांना आठवला. त्या वेळी वाल्मीकि ऋषींनी रचलेला छंदबद्ध श्लोक ब्रह्मदेवांनी ऐकला. त्यामुळे ते वाल्मीकि ऋषींवर अत्यंत प्रसन्न झाले. त्यानंतर त्यांनी श्रीरामांचे चरित्र लिहिण्यासाठी वाल्मीकिंना आशीर्वाद दिला, ‘बुद्धिमान असलेल्या श्रीरामांच्या आयुष्यातील गुप्त आणि प्रकट वृत्तांत, तसेच लक्ष्मण, सीता अन् राक्षस यांच्या संदर्भातील सर्व ज्ञात आणि अज्ञात घटना ज्ञात होतील. जोपर्यंत भूतलावर पर्वत आणि नद्या यांची सत्ता राहील, तोपर्यंत रामायण कथेचा प्रचार होत राहील.’ हा आशीर्वाद देऊन ब्रह्मदेव अंतर्धान पावले. हा सर्व भाग आपल्याला वाल्मीकि रामायणातील बालकांडातील दुसर्या सर्गात वाचायला मिळतो.
नारदमुनी आणि ब्रह्मदेव यांनी वाल्मीकि ऋषींना आशीर्वाद देऊन त्यांना रामायण लिहिण्याची प्रेरणा दिली. त्याप्रमाणे वाल्मीकिंच्या लेखणीतून रामायण शब्दबद्ध झाले; म्हणूनच केवळ वाल्मीकि रामायण हेच सत्य असून तोच श्रीरामचंद्रांचा खरा इतिहास आहे. त्याची मोडतोड करून तो विकृत स्वरूपात लिहिणे, म्हणजे नारदमुनी, ब्रह्मदेव आणि वाल्मीकि ऋषि या तिघांची प्रतारणा करण्यासारखे आहे. अशा प्रकारे श्रीरामांचे चरित्र कलंकित केल्याचे पाप नकळतपणे आपल्याला भोगावे लागणार आहे.
२. वाल्मीकि रामायणाच्या आधारावर चित्रपट बनवला असता, तर अभिमानाचा विषय ठरला असता !
वाल्मीकि ऋषींच्या व्यतिरिक्त अनेकांनी रामायण लिहिण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी लिहिलेले रामायण हे अधिकृत रामायण समजता येणार नाही. त्याला केवळ ‘तुलसी रामायण’ आणि ‘भावार्थ रामायण’ यांचा अपवाद आहे. वाल्मीकि रामायणाच्या मूळ ऐतिहासिक घटनांना कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेऊन संत तुलसीदास आणि संत एकनाथ महाराज यांनी रामायणाचे लेखन केले आहे. परकीय आक्रमकांनी हिंदु धर्म, राष्ट्र आणि संस्कृती यांना चारही बाजूने घेरले होते. अशा बिकट काळात हिंदु समाजाला नवसंजीवनी देण्यासाठी संत तुलसीदास आणि संत एकनाथ महाराज या दोन महनीय संतांनी श्रीराम चरित्रे लिहिली होती. आजही हिंदु धर्म, संस्कृती आणि राष्ट्र चारही बाजूंनी संकटात सापडले आहे. अशा वेळी वाल्मीकि रामायणाचा आधार घेऊन हिंदु समाजात चैतन्य निर्माण करण्यासाठी चित्रपट निर्मिती केली असती, तर तो निश्चितच कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय ठरला असता.
३. राम नसलेल्या श्रीरामाचे चरित्र लिहिणारे लेखक !
अन्य लोकांनी लिहिलेले रामायण ‘हे राम नसलेले रामायण’, असे आहे. याविषयी एक दृष्टांत सांगितला जातो. तो असा की, काही सामान्य लेखकांनी रामायण लिहिण्याचा प्रयत्न केला. आपण लिहिलेल्या रामायणाला मान्यता प्राप्त व्हावी; म्हणून या लेखक मंडळींनी प्रत्यक्ष रामाला साद घातली. ‘त्यांनी लिहिलेले रामायण रामाने स्वीकारल्याचे प्रमाणपत्र रामाकडून मिळावे’, असा आग्रह धरला. त्या वेळी श्रीराम त्यांना म्हणाले, ‘माझ्याच चरित्राचे मीच प्रमाणपत्र देणे योग्य नाही. आपण लिहिलेल्या रामचरित्राचे योग्य मूल्यमापन करण्यास माझे उपास्यदैवत सक्षम आहे. त्या माझ्या दैवताकडून आपण लिहिलेल्या रामचरित्राचे प्रमाणपत्र घ्यावे.’ त्या लेखकांनी रामाला विचारले, ‘‘आपले उपास्य दैवत कोणते ?’’ श्रीराम म्हणाले, ‘‘भगवान शंकर हे माझे उपास्य दैवत आहे.’’ त्यानंतर ही लेखक मंडळी त्यांनी लिहिलेल्या रामचरित्राचे प्रमाणपत्र घेण्यासाठी भगवान शंकराकडे गेली. त्यांनी भगवान शंकरांना त्यांच्या येण्याचे प्रयोजन सांगितले. भगवान शंकरांनी त्या लेखकांचे श्रीराम चरित्र वाचले. भगवान शंकर त्या लेखक मंडळींना म्हणाले, ‘‘तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे श्रीरामाचे चरित्र लिहिले आहे. मी तुम्हाला तुम्ही घेतलेल्या कष्टाचे प्रमाणपत्र देण्यास सिद्ध आहे. तथापि माझी एक अट आहे.’’ त्यांची अट लेखकांनी मान्य केली.
तेव्हा भगवान शंकर म्हणाले, ‘‘मी देत असलेल्या प्रमाणपत्राचा मोबदला म्हणून मला तुम्ही लिहिलेल्या रामचरित्रातील दोन अक्षरे माझ्याकडे ठेवून घेणार आहे आणि उरलेले रामचरित्र मी आपणास देऊन तसे प्रमाणपत्र देतो.’’ सर्व लेखक मंडळींनी या गोष्टीला मान्यता दिली आणि भगवान शंकरांकडून प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले. त्यांच्यापैकी एकानेही भगवान शंकरांना विचारले नाही की, त्यांनी लिहिलेल्या श्रीराम चरित्रातील कोणती दोन अक्षरे भगवान शंकरांना हवी आहेत ? भगवान शंकराने त्या लेखकांच्या रामचरित्रातील ‘राम’ ही दोन अक्षरे काढून घेऊन त्यांना रामचरित्राचे प्रमाणपत्र दिले. त्या प्रमाणपत्रात भगवान शंकराने लिहिले, ‘‘राम नसलेल्या रामाचे हे चरित्र आहे !’’ असे राम नसलेल्या रामाचे चरित्र लोकांना सांगून आपण नेमके काय साध्य करतो ?, याचा विचार करायला हवा. दुर्बुद्ध लोकांना राम नसलेल्या रामायणात रामाचे केलेले वर्णन खरे आहे, असेच वाटते. रामाच्या चरित्रात हनुमंत, सीतामाई, लक्ष्मण, भरत इत्यादी अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेली अनेक महनीय मंडळी आहेत. त्यांच्या चारित्र्याचेही आपण विडंबन करतो. त्यामुळे हिंदु धर्माच्या आधारस्तंभांना आपण वाळवीसारखे पोखरून टाकतो आहोत, हे आपल्याला कळत नाही.
४. चित्रपटकारांना त्यांच्या चित्रपटात मूळ रामायण दाखवण्यात अडचण काय ?
चित्रपट बनवण्यासाठी ऐतिहासिक चित्रपटांना काल्पनिकतेची जोड का द्यावी लागते ? श्रीरामांच्या मूळ चरित्रातील घटना जशाच्या तशा चित्रपटातून दाखवल्या, तर असे कोणते आकाश कोसळणार आहे ? लोकांच्या मनाचा वेध घेण्याचे सामर्थ्य वाल्मीकिंनी लिहिलेल्या रामायणात नाही, असे या चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांना वाटते का ? उत्तर रामायणामध्ये सीतेचा त्याग आणि शंबूकवध या न घडलेल्या घटना चित्रित करण्यात आल्या. त्यामुळे श्रीरामाच्या चरित्रावर काळाकुट्ट कलंक लागला आहे. मूळ रामायणामध्ये लक्ष्मण रेषा नाही. या गोष्टी ध्यानात घेऊन वाल्मीकि रामायणावर आधारित चित्रपटांची निर्मिती केली असती, तर श्रीरामांच्या चरित्रावर लावण्यात आलेला कलंक पुसून त्याचे खरे स्वरूप सिद्ध करण्याची संधी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांनी मिळाली होती, जी त्यांनी दवडली आहे.’
५. हिंदूंनो, श्रीरामांवरील श्रद्धा ढळू देऊ नका !
आपली श्रद्धा ही श्रीरामांवर असणे नितांत आवश्यक आहे. श्रीराम हा विष्णूचा अवतार आहे. तो मर्यादा पुरुषोत्तम असून एक वचनी आणि एक बाणी आहे. हनुमंत साक्षात् भगवान शंकराचा अवतार आहे. हनुमंत बुद्धिमंतांमधील बुद्धिमंत आणि जितेंद्रिय असून सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. तो दास्य भक्तीचा आदर्श आहे. अशा हनुमंताच्या वाणीला अपशब्दांचा कधीही स्पर्शही झाला नाही. तसेच त्याची वाणी कधी विटाळली नाही.’
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२५.६.२०२३)