खलिस्तान : काँग्रेसचे पाप !
खलिस्तानचे पाप निर्माण करणार्या दिवंगतांना दिला जाणारा मानसन्मान रहित करा !
काँग्रेसचे नेते राहुल गांधी विदेशात जाऊन भारतातील लोकशाहीची स्थिती अत्यंत वाईट असल्याचे सांगत भारताची अपकीर्ती करत असतात. ‘विदेशात जाऊन स्वदेशाची अपकीर्ती करू नये’, हा साधा संकेतही ते पाळत नाहीत. भाजप आणि मोदी यांच्याप्रति द्वेष असल्यामुळे ते असे करत आहेत. राहुल गांधी यांना देशातील जनता गांभीर्याने घेत नाही, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य असतांना काँग्रेसचे अन्य नेतेही त्यांच्या कृतीला विरोध न करता राहुल गांधी यांचा बचाव करतांना दिसतात. आता याच काँग्रेसचा खरा चेहरा (जो बहुतेकांना ठाऊक आहे) भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’चे माजी सचिव जी.बी.एस्. सिद्धू यांनी उघड केला आहे. सिद्धू यांनी काँग्रेसच्या लोकशाहीप्रेमाचा आणि लोकशाहीच्या रक्षणाचा बुरखा फाडला आहे. हा बुरखा घालून आपणच लोकशाहीचे रक्षक आहोत, हे दाखवण्याचा आटापिटा काँग्रेस नेहमीच करत आली आहे आणि करत आहे. सिद्धू यांनीही बुरखा फाडतांना जो दिवस निवडला, तोही महत्त्वाचा आहे.
२५ जून या दिवशी तत्कालीन इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली होती आणि लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या होत्या, त्याच २५ जूनला सिद्धू यांनी एका मुलाखतीत काँग्रेसचे पाप उघड केले. यावर एकही काँग्रेसवाला किंवा राहुल गांधी, सोनिया गांधी तोंड उघडतांना दिसत नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. सिद्धू यांनी काँग्रेसनेच देशात खलिस्तानचे भूत कसे उभे केले ? हे उघड केले. खलिस्तान आणि भिंद्रनवाले यांना राजकारणासाठी उभे करण्यात आले, हे आतापर्यंत जनतेला सांगण्यात येत होते; मात्र सिद्धू यांनी अधिक स्पष्टपणे ते सांगितले आहे. ते ‘रॉ’चे माजी अधिकारी असल्याने आणि सर्व घडामोडी पहिल्यापासून प्रत्यक्ष पाहिल्याने त्यांच्या या सांगण्यावर विश्वास ठेवावाच लागेल. सिद्धू यांच्या सांगण्यावर काँग्रेसकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, यावरून ते सत्य आहे, हे अधिक स्पष्ट होते. राजकारणासाठी काँग्रेस किती खालच्या स्तरावर गेली होती, ते यावरून समजते. आजही याची फळे भारताला भारतात आणि विदेशातही भोगावी लागत आहेत. काँग्रेसने भारताच्या फाळणीला अशा राजकीय स्वार्थासाठी पाठिंबा दिला होता आणि त्यामुळे लक्षावधी लोकांचा मृत्यू झाला अन् आजही त्याचे फळ भारत भोगत आहे. पुढे याहून अधिक संकटे भारताला फाळणीच्या चुकीमुळे झेलावी लागणार आहेत. सिद्धू यांनी सांगितलेल्या घटनाक्रमावरून काँग्रेसवर गुन्हा नोंद करून त्यातील जिवंत असणार्या संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. देहलीतील शीखविरोधी दंगलीमध्ये काँग्रेसचेच नेते जगदीश टायटलर आणि सज्जनकुमार यांना न्यायालयाने आधीच दोषी ठरवलेले आहे. कमलनाथ यांचेही नाव आरोपींमध्ये होते. त्यांचे नाव सिद्धू यांनीही घेतले आहे. या प्रकरणी कमलनाथ यांची चौकशी झाली पाहिजे. तसेच जे जिवंत नाहीत; मात्र ते दोषी ठरतील, त्यांना सरकारी स्तरावर जो काही मानसन्मान मृत्यूनंतर दिला जात आहे, तो रहित केला पाहिजे. देशाच्या मोठ्या हानीला ते उत्तरदायी होते, हे पुढच्या पिढीला समजले पाहिजे. यासाठी केंद्रातील भाजप सरकारने प्रयत्न केले पाहिजेत.