अकोला येथील श्री राजराजेश्वर आणि श्री विठ्ठल मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू !
अशोभनीय वेशभूषेत प्रवेश न करण्याविषयी फलक लावले !
(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)
अकोला – अमरावतीनंतर आता अकोला येथील काही मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयीचे फलक अकोलावासियांचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजेश्वर मंदिर आणि जुने शहरातील ३१९ वर्षे पुरातन श्री विठ्ठल मंदिरात लावण्यात आले आहेत. ‘अंगप्रदर्शन करणारी वेशभूषा करून मंदिरात प्रवेश करू नये आणि भारतीय संस्कृतीचे पालन करून सात्त्विक वेशभूषेतच दर्शन घ्यावे’, असे फलकांवर नमूद करण्यात आले आहे.
‘मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी वस्त्रसंहिता आवश्यक आहे. शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू असून धार्मिक, प्रार्थनास्थळे, खासगी आस्थापने, शाळा-महाविद्यालये, न्यायालय, पोलीस आदी क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे’, असे हिंदुत्ववानिष्ठांचे म्हणणे आहे. मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता असावी, असे महाराष्ट्र मंदिर महासंघाद्वारे काही दिवसांपूर्वी मत घोषित करण्यात आले होते.
विश्वस्तांची मते !
१. श्री. गजानन घोंगे, विश्वस्त, श्री राजेश्वर संस्थान – वस्त्रसंहितेच्या संदर्भात सामाजिक, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पत्र प्राप्त झाले होते. यावर विश्वस्त मंडळातील सदस्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतरच वेशभूषेविषयी निर्णय घेण्यात आला. भाविकांनी वस्त्रसंहितेचे पालन करणे अपेक्षित आहे; मात्र वेशभूषेवरून कुणीही दर्शनापासून वंचित रहाणार नाही.
२. श्री. रमेश अलकरी, विश्वस्त, श्री विठ्ठल-रखुमाई संस्थान – भारतीय संस्कृतीचे जतन होणे आणि पावित्र्य जपत भावनांचाही आदर होणे आवश्यक आहे. मंदिर हे पवित्र स्थान असून ते पर्यटन किंवा फिरण्याचे ठिकाण नव्हे. मंदिराचे पावित्र्य जपणे आवश्यक आहे. त्यामुळे मंदिरात वस्त्रसंहिता लागू केली आहे.
संपादकीय भूमिकामहाराष्ट्रातील सर्वत्रच्या मंदिर विश्वस्तांनी याचा आदर्श घ्यावा ! |