गोव्यात आठवड्याला एक विवाहित जोडपे घटस्फोटासाठी महिला आयोगाकडे येते !
पणजी, २५ जून (वार्ता.) – राज्य महिला आयोगाकडे प्रत्येक आठवड्याला एक विवाहित जोडपे घटस्फोटासाठी धाव घेत असते. पती-पत्नी यांच्यामध्ये अल्प होत चाललेला संवाद याला अधिक उत्तरदायी आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रंजिता पै यांनी दिली.
त्या पुढे म्हणाल्या, ‘‘वर्ष २०२० पासून आतापर्यंत महिला आयोगाकडे महिलांची घटस्फोटासंबंधी ५० प्रकरणे प्रलंबित आहेत आणि यामध्ये प्रत्येक आठवड्याला एका प्रकरणाची भर पडत आहे. या काळात आयोगाकडे महिलांशी निगडित सर्व प्रकारची एकूण ३०० प्रकरणे प्रलंबित आहेत. यातील बर्याच प्रकरणांसंबंधी आयोगाकडून सुनावणी चालू आहे, तर काही प्रकरणे समुपदेशाने मिटवण्यात आली आहेत. गेल्या काही वर्षांत महिला आयोगाने समुपदेशनाच्या माध्यमातून अनेक जोडप्यांमध्ये समन्वय घडवून आणला आहे; मात्र अडीच वर्षांनंतर संबंधित महिला आता पुन्हा एकदा घटस्फोटासाठी आयोगाकडे येत आहेत. अशा महिलांची संख्याही वाढत आहे.’’ (याचाच अर्थ समुपदेशन ही मानसिक स्तरावरील उपाययोजनाही यशस्वी ठरत नाही. साधना हाच पर्याय आहे ! – संपादक)
(सौजन्य : Telugu News)
घटस्फोटासाठी आयोगाला वाटत असलेली प्रमुख कारणे आणि त्यावरील उपाययोजना
घटस्फोटासाठी आयोगाला वाटत असलेली प्रमुख कारणे आणि त्यावरील उपाययोजना यांविषयी अध्यक्षा रंजिता पै यांनी पुढील माहिती दिली.
१. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पती-पत्नी कामावर जातात. दिवसभर एकमेकांशी संपर्कात नसल्याने त्यांच्यात अल्प संवाद होतो. संवाद अल्प झाल्याने भांडणे होऊन पुढे घटस्फोटापर्यंत वाटचाल होते.
२. त्रिकोणी कुटुंबाच्या हट्टातून मुलाच्या आई-वडिलांना निराळे ठेवले जाते. यामुळे पतीचा पत्नीवरील विश्वास उडून दोघांमध्ये खटके उडू लागतात. विभक्त कुटुंबामुळे दोघांना त्यांच्या कुटुंबाचा आधार मिळत नसल्याने लहानसहान कारणांवरून पती-पत्नी भांडण करत असतात. या भांडणामुळे दोघांमध्ये टोकाचा गैरसमज निर्माण होतो. माघार घेण्यास कुणीही सिद्ध नसते. या स्थितीत महिला घटस्फोटासाठी महिला आयोगाकडे धाव घेतात.
३. पूर्वी पती-पत्नी यांच्यामध्ये भांडण झाल्यास पत्नी लगेच माघार घेत असे; मात्र आता पत्नी त्वरित घटस्फोटाचे पाऊल उचलते, असे निरीक्षण आहे.
४. राज्यातील वाढत असलेले घटस्फोटांचे प्रमाण रोखण्यासाठी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती होण्याची आवश्यकता आहे. महिला आयोग यासाठी पूर्ण क्षमतेने काम करणार आहे.
संपादकीय भूमिका
|