तुर्भे येथे पहिल्या पावसातच ९ घंटे विद्युत् पुरवठा खंडित !
नवी मुंबई, २५ जून (वार्ता.) – तुर्भे येथे पहिल्या पावसातच महावितरणच्या पावसाळीपूर्व कामांची पोलखोल झाली. २४ जूनला संध्याकाळी पाऊस चालू होताच तुर्भे परिसरातील विद्युत् पुरवठा खंडित झाला. तो रविवारी पहाटे पूर्ववत् झाला. ९ घंटे वीज नसल्याने रहिवाशांना अंधारात रात्र काढावी लागली.
सेक्टर २१ मध्ये उन्हाळ्यात ६ दिवस तरी वीज जाते. विद्युत् पुरवठा वाढवून मिळण्यासाठी स्थानिकांनी प्रत्येक घरासाठी वेगवेगळे विद्युत् मीटरही आहे. त्या संदर्भातील पैसेही रहिवाशांनी महावितरणकडे जमा केले आहेत; मात्र तरीही विद्युत् वाहिन्यांची क्षमता वाढवण्यात आली नाही. त्यामुळे पहिल्या पावसातच भूमीगत विद्युत् वाहिन्या ठिकठिकाणी जळू लागल्या. (प्रशासनाने या समस्येत लक्ष घालून ती लवकरात लवकर सोडवावी ! – संपादक)
वारंवार विद्युत् पुरवठा खंडित होत असल्याने सेक्टर २१ मधील संतप्त रहिवाशी महावितरणच्या वाशी येथील कार्यालयावर मोर्चा काढण्याच्या सिद्धतेत आहेत. ‘पुढील आठवड्यात सर्व विभागांना केबल पुरवठा सुरळीत होऊन ही समस्या निकालात काढली जाईल’, अशी प्रतिक्रिया महावितरणचे कार्यकारी अभियंता श्यामकांत बोरसे यांनी दिली.