नवी मुंबई येथील ज्ञानपुष्प विद्यालयाला महापालिकेच्या शिक्षणाधिकार्यांकडून नोटीस !
एस्.एस्.सी. बोर्डाचे वर्ग बंद केल्याचे प्रकरण
तक्रारींच्या खुलाशाचे आदेश
नवी मुंबई, २५ जून (वार्ता.) – एस्.एस्.सी.बोर्डाचे वर्ग बंद करून सी.बी.एस्.ई. बोर्डाचे वर्ग चालू केल्याच्या प्रकरणी सीबीडी येथील ज्ञानपुष्प विद्यालयाला नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण अधिकारी अरुणा यादव यांनी नोटीस बजावली आहे. शिक्षण उपसंचालक आणि बाल हक्क आयोग यांनाही नोटीसीची प्रत माहितीस्तव पाठवण्यात आली आहे.
नोटिसीमध्ये म्हटले आहे की,…
१. या प्रकरणी पालकांनी शिक्षण विभागाकडे केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने शाळा व्यवस्थापनाने तात्काळ लेखी खुलासा सादर करावा. तसेच सी.बी.एस्.ई.ची मान्यता मिळण्यापूर्वीच शाळेने एस्.एस्.सी.बोर्डाची शाळा पूर्वमान्यता न घेता का बंद केली ? याचाही खुलासा करावा.
२. पालकांसमवेत झालेल्या बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही न झाल्यास शाळेविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल. पालकांनी पुन्हा ज्या तक्रारी केल्या आहेत, त्या प्रकरणी खुलासा सादर न केल्यास शाळेविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.
३. गेल्या वर्षी शाळेविरोधात तक्रारी प्राप्त झाल्यावर शाळेचे विश्वस्त सुशांत पाटील यांच्यासह पालकांची बैठक घेण्यात आली. या वेळी एस्.एस्.सी.बोर्ड चालू ठेवण्याविषयी शाळेने आश्वासन दिले होते. तसेच एस्.एस्.सी. बोर्ड (राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ) आणि सी.बी.एस्.ई. बोर्ड (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) यांच्यात भेदभाव केला जाणार नाही, असे आश्वासनही देण्यात आले होते; परंतु भेदभाव केला जात असल्याच्या तक्रारी पुन्हा प्राप्त झाल्या आहेत.
४. इयत्ता ४ थी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मानसिक छळ केला जात आहे.