वर्ष २०२२ मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी करण्यात आलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पाद्यपूजेच्या सोहळ्याची साधिकेला मिळालेली पूर्वसूचना
१. सनातनच्या तिन्ही गुरूंची मानस पाद्यपूजा केल्याचे दृश्य दिसणे आणि त्या वेळी प.पू. भक्तराज महाराज यांचीही पुष्कळ आठवण येणे
‘१२.७.२०२२ या दिवशी सकाळी ११ ते १२ या वेळेत मी ध्यानमंदिरात गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतांना गुरूंना आत्मनिवेदन करत होते. त्या वेळी मला पुढील दृश्य दिसले – ‘मला सनातनचेे तीनही गुरु (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) डोळ्यांसमोर दिसले. ‘तिन्ही गुरूंची पाद्यपूजा मी एकटीने एकाच वेळी कशी करायची ?’, असा विचार माझ्या मनात येताच माझ्यातूनच माझी अन्य दोन रूपे बाहेर आली आणि माझ्या तीन रूपांनी सनातनच्या तिन्ही गुरूंच्या पाद्यपूजनास आरंभ केला. त्यांची पाद्यपूजा करतांना प्रथम तिन्ही गुरूंचे चरणकमल चांदीच्या पात्रात ठेवून त्यांच्यावर जलाने अभिषेक केला. नंतर तिन्ही गुरूंचे चरणकमल रेशमी वस्त्राने हळूवार पुसले. त्यांच्यावर चंदनाने स्वस्तिक काढून कुंकू आणि अक्षता वाहिल्या. पाद्यपूजेनंतर तिन्ही गुरूंच्या चरणकमलांवर मोगर्याची फुले वाहिली आणि तिन्ही गुरूंना मोगर्याचा पुष्पहार घालून त्यासोबत गुलाबपुष्पेही वाहिली.’ हे सगळे अनुभवतांना मला प.पू. भक्तराज महाराज यांचीही पुष्कळ आठवण आली; कारण त्यांना गुलाबपुष्पे फार प्रिय होती. ‘त्यामुळेच तिन्ही गुरूंच्या चरणांवर गुलाबपुष्पे वहाण्याचे माझ्या मनात आले’, असे मला वाटले.
२. आदल्या दिवशी केलेली तिन्ही गुरूंची मानस पाद्यपूजा, ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी करण्यात आलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पाद्यपूजनाच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना असल्याचे लक्षात येणे
दुसर्या दिवशी, म्हणजे १३.७.२०२२ ला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ११ ते १२ याच वेळेत आदल्या दिवशी अनुभवलेला सोहळा प्रत्यक्षात बघायला मिळाला. तेव्हा माझे मन कृतज्ञतेने भरून आले. आदल्या दिवशी गुरूंचे पूजन करतांना श्री दत्तात्रयांचे स्मरण झाले होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे स्वतःच दत्तावतार आहेत’, असे महर्षींनी सांगितले असल्याचे सांगण्यात आले. ‘आदल्या दिवशी गुरुदेवांच्या कृपेने मी तिन्ही गुरूंची मानस पाद्यपूजा करणे, म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी करण्यात आलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पाद्यपूजनाच्या संदर्भात मला मिळालेली पूर्वसूचनाच होती’, हे माझ्या लक्षात आले.
३. तिन्ही गुरु साधकांना मोक्षाची वाट दाखवत असल्याने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे
तिन्ही गुरूंच्या चरणी मनोमन भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त झाली; कारण हे तिन्ही गुरु प्रत्येक साधकाच्या मनातील स्वभावदोष आणि अहं यांचा नाश करून, त्यांना ज्ञानाचा मार्ग दाखवून आणि त्यांच्यावर प्रीतीचे सिंचन करून मोक्षाची वाट दाखवत आहेत. तिन्ही गुरूंच्या या कृपेबद्दल मी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– कु. रजनीगंधा कुर्हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.७.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |