सनातनच्या ५५ व्या संत पू. (श्रीमती) सुशीला शहाणेआजी (वय ९८ वर्षे) यांच्या रुग्णाईत स्थितीतील घटनाक्रम !
राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथील पू. (श्रीमती) सुशीला शहाणेआजी यांच्या निधनानंतरचा आज अकरावा दिवस आहे. त्यानिमित्ताने…
नाटे (राजापूर) येथील सनातनच्या ५५ व्या संत पू. (श्रीमती) सुशीला विष्णु शहाणेआजी (वय ९८ वर्षे) यांनी १६ जून २०२३ या दिवशी देहत्याग केला. २६.६.२०२३ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा अकरावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांची सून सौ. कविता शहाणे यांना पू. आजींच्या आजारपणात जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
१. पू. शहाणेआजींच्या रुग्णाईत स्थितीतील घटनाक्रम
१ अ. ‘१८.५.२०२३ च्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून : पू. शहाणेआजींना उलट्या होणे, पोटात दुखणे असे त्रास होऊ लागले. त्यांच्या उलटीचा रंग लाल, निळा होता. त्यांना पुष्कळ अशक्तपणा आला होता.
१ आ. १९.५.२०२३ या दिवशी : त्यांच्या पोटात पुष्कळ दुखत होते. त्या आम्हाला पोटाला हातही लावू देत नव्हत्या.
१ इ. २०.५.२०२३ या दिवशी
१. सद़्गुरु सत्यवान कदम यांनी आम्हाला पू. आजींसाठी आज्ञाचक्र आणि अनाहतचक्र यांच्या समोर तळहात धरून ‘निर्गुण’ हा नामजप करायला सांगितला.
२. पू. आजींना रुग्णालयात घेऊन जातांना त्या पूर्ण प्रवासात पुष्कळ शांत होत्या. गुरुदेवांच्या कृपेने त्या वेळी त्यांना कोणताच शारीरिक त्रास झाला नाही; मात्र रुग्णालयात गेल्यावर त्यांचा त्रास वाढला. त्याच दिवशी त्यांना दुसर्या रुग्णालयात नेलेे. आम्ही सतत देवाला प्रार्थना करत होतो, ‘त्यांचा त्रास न्यून होऊ दे.’ दुसर्या दिवशी त्या स्वतः देवीला प्रार्थना करत होत्या, ‘आई मला सोडव गं.’
३. पू. आजींची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे त्यांना रत्नागिरी येथील रुग्णालयात भरती केले. तेथे त्यांच्या वैद्यकीय चाचण्या केल्यावर आधुनिक वैद्यांच्या लक्षात आले, ‘पू. आजींच्या किडनीवर परिणाम झाला आहे. त्यांना आतड्याचा अल्सर झाला आहे आणि तो फुटला आहे.’
४. पू. आजींना श्वास घेतांना त्रास होऊ लागला. त्या तोंडाने मोठ्याने आवाज करत श्वास घेऊ लागल्या.
१ ई. २१.५.२०२३ या दिवशी : आधुनिक वैद्यांनी पू. आजींना अतीदक्षता विभागात हालवले. तेथे त्यांना रक्त चढवले आणि प्राणवायू (ऑक्सिजन) देण्यात आला.
१ उ. २२.५.२०२३ या दिवशी : पू. आजींच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने आधुनिक वैद्यांनी पू. आजींना घरी घेऊन जायला सांगितले.
२. पू. आजींना रुग्णालयातून घरी आणल्यानंतर त्यांच्यात जाणवलेले पालट
२ अ. २३ ते २५.५.२०२३ या दिवसांत पू. आजींना नळीवाटे पातळ पदार्थ आणि औषधे देण्यात येत होती. आम्ही नामजपादी उपायही करत होतो.
२ आ. २५.५.२०२३ या दिवशी
२ आ १. पू. आजींसाठी विविध आध्यात्मिक उपाय करणे : पू. आजींना अस्वस्थ वाटत असल्याने (पू. (सौ.) शैलजा परांजपे यांनी सांगितल्याप्रमाणे) पू. आजींवरून भाकरीचा उतारा काढून तिठ्यावर नेऊन ठेवला. आम्ही मृत्यूंजय मंत्र म्हणत होतो. श्री. केतन शहाणेगुरुजी (पू. आजींचा नातू) यांच्या सांगण्यानुसार आम्ही प्रतिदिन संध्याकाळी श्रीविष्णुसहस्रनाम म्हणायला आरंभ केला.
२ आ २. पू. आजींच्या प्रकृतीत सुधारणा होणे : त्यानंतर पू. आजींच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. त्या डोळे उघडू लागल्या. त्यांना आम्ही बोललेले समजू लागले. त्या आमच्या बोलण्याला प्रतिसाद देऊ लागल्या. त्यांना अधूनमधून पोटात कळ येत होती. त्यांचे हात-पाय हालवण्याचे प्रमाण वाढले होते. त्या स्वत:हून कूस पालटण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांना उठून बसवल्यावर त्या हाताचा आधार घेऊन बसल्या. त्या मोठ्याने श्वास घेत होत्या. ‘त्यांच्या चेहर्यावरून त्यांच्यावर त्रासदायक आवरण आले आहे’, असे आम्हाला जाणवत होते.
२ आ ३. साधिकेने गुरुमाऊलींना प्रार्थना करणे आणि त्यानंतर तिला सूक्ष्मातून ‘गुरुमाऊली पू. आजींना ‘तुम्हाला निर्गुणाकडे जायचे असल्याने तुम्ही केवळ नामजप करा’, असे सांगत आहे’, असे दिसणे : २५.५.२०२३ च्या रात्री ११ वाजता मी गुरुमाऊलींना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना करत होते, ‘पू. आजींचा त्रास आपणच दूर करणार आहात. आपणच त्यांना त्रास सहन करण्यासाठी बळ द्या.’ तेव्हा मला सूक्ष्मातून दिसले, ‘आमची कुलस्वामिनी कोल्हापूरची श्री महालक्ष्मीदेवी पू. आजींच्या समोर हात जोडून उभी आहे. पू. आजी प.पू. डॉक्टरांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) सांगत आहेत, ‘‘मला बोलता येत नाही, दिसत नाही आणि ऐकूही येत नाही.’ तेव्हा प.पू. डॉक्टर खळखळून हसले आणि पू. आजींना म्हणाले, ‘आता काही पहायचे नाही, ऐकायचे नाही आणि बोलायचेही नाही. आता आपल्याला निर्गुणाकडे जायचे आहे. तुम्ही आता केवळ नामजप करा.’ नंतर पू. आजी प.पू. डॉक्टरांकडे बघत नामजप करू लागल्या.’
२ आ ४. ‘सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, पू. सदाशिव परांजपेआजोबा आणि पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी यांच्या माध्यमातून ‘प.पू. गुरुमाऊली घरी येणार आहेत’, असे सांगितल्यावर पू. आजींचा चेहरा तेजस्वी दिसणे : ‘२६.५.२०२३ या दिवशी आमच्याकडे सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, पू. सदाशिव परांजपेआजोबा आणि पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी येणार आहेत’, असे आम्हाला समजले. आम्ही पू. आजींना ‘सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, पू. सदाशिव परांजपेआजोबा आणि पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी यांच्या माध्यमातून ‘प.पू. गुरुमाऊली येणार आहेत’, असे सांगितल्यावर पू. आजी शांत झाल्या. त्यांचा श्वास मध्यम गतीत होऊ लागला. त्यांचा चेहरा प्रसन्न आणि तेजस्वी दिसत होता. पू. आजींच्या खोलीतील वातावरण शांत जाणवत होते.’
– सौ. कविता रविकांत शहाणे (पू. आजींची सून, वय ५८ वर्षे), नाटे, राजापूर. (२७.५.२०२३)
पू. (श्रीमती) सुशीला शहाणेआजी यांना लाभलेला सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, पू. सदाशिव परांजपेआजोबा आणि पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी यांचा सत्संग !
‘२६.५.२०२३ या दिवशी आमच्या घरी सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, पू. सदाशिव परांजपेआजोबा आणि पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी आले. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी पू. शहाणेआजींचा हात हातात घेऊन त्यांना आधार दिल्यावर पू. आजींच्या चेहर्यावर प्रसन्नता जाणवणे
सद़्गुरु गाडगीळकाकांनी पू. शहाणेआजींचा हात हातात घेतला आणि ते त्यांच्याशी बोलू लागले. तेव्हा पू. आजी सद़्गुरु काकांच्या बोलण्याला व्यवस्थित प्रतिसाद ेत होत्या. सद़्गुरु काकांनी त्यांना विचारले, ‘‘पू. आजी, आता हात सोडू का ?’’ तेव्हा त्या ‘‘नको’’ म्हणाल्या. सद़्गुरु काका बराच वेळ पू. आजींचा हात हातात धरून बसले होते. त्यानंतर ते पू. आजींना म्हणाले, ‘‘लवकर बर्या व्हा.’’ त्या वेळी पू. आजींच्या चेहर्यावर प्रसन्नता जाणवत होती. जणूकाही त्यांना जे हवे होते, ते त्यांना मिळाल्याचे समाधान त्यांच्या चेहर्यावर दिसत होते.
२. त्या वेळी मला घरातील वातावरण शांत जाणवत होते. मला पू. आजींची खोली प्रसन्न जाणवत होती.
३. सद़्गुरु गाडगीळकाका आम्हाला म्हणाले, ‘‘पू. शहाणेआजींना प.पू. गुरुमाऊलींचे तीर्थ आणि गंगाजल द्या.’’ पू. परांजपेआजी म्हणाल्या, ‘‘त्याने पू. आजींची अंतर्शुद्धी होईल.’’
४. सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी पू. शहाणेआजींसाठी नामजपादी उपाय करणे
अ. सद़्गुरु गाडगीळकाकांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय करायला आरंभ केल्यावर ‘पू. आजी पुष्कळ शांत झाल्या आहेत’, असे आम्हाला जाणवले.
आ. सद़्गुरु काकांनी नामजपादी उपाय करणे चालू केल्यावर पू. आजींच्या श्वासाचा मोठा आवाज येणे बंद झाले; मात्र ‘त्यांना श्वास घ्यायला त्रास होत आहे’, हे आमच्या लक्षात येत होते. पू. आजींचे पाय थरथरत होते. त्या मधूनच थोडा वेळ डोळे उघडत होत्या. ‘त्यांना पुष्कळ अस्वस्थ वाटत आहे’, असे आम्हाला जाणवत होते. त्या पुष्कळ प्रमाणात हात-पाय हलवत होत्या. ‘त्या मध्येच शांत राहून जप करत आहेत’, असे आम्हाला जाणवत होते. त्यांचा श्वास घेण्याचा आवाज पुन्हा येऊ लागला. त्यानंतर बर्याच वेळाने त्यांना खोकला आला.
इ. त्यानंतर आम्ही पू. आजींशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना विचारले, ‘‘पू. आजी, तुम्हाला आता बरं वाटत आहे ना ?’’ तेव्हा त्यांनी होकारार्थी मान हलवली.
ई. माझी सून सौ. देवश्री प्रथमेश शहाणे म्हणाली, ‘‘पू. आजींकडे पाहून त्रास जाणवत नाही.’’
५. सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नामजपादी उपाय केल्यानंतर पू. आजींमध्ये जाणवलेले पालट
अ. पू. आजींना श्वास घेतांना होणार्या त्रासाचे प्रमाण न्यून झाले. त्यांच्या श्वासाचा आवाजही न्यून झाला. त्या डोळे उघडून सर्वांकडे बघू लागल्या आणि सर्वांना प्रतिसाद देऊ लागल्या.
आ. सद़्गुरु काका घरी येण्याआधी ‘पू. आजींना कुणाची तरी काळजी आहे’, असे आम्हाला जाणवत होते. मी पू. आजींना विचारले, ‘‘तुम्हाला काळजी वाटत आहे का ?’’ तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘मला एका मुलाची काळजी वाटत आहे.’’ सद़्गुरु काकांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय केल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘आता मला कसली काळजी वाटत नाही.’’
इ. सद़्गुरु काकांचा सत्संग लाभल्याने आणि त्यांनी नामजपादी उपाय केल्याने पू. आजी पुष्कळ शांत झाल्या. ‘त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे’, असे आम्हाला जाणवले.
६. सद़्गुरु गाडगीळकाका घरी येऊन गेल्यावर ‘पू. आजींनी सूक्ष्मातून प.पू. डॉक्टरांच्या चरणांवर डोके ठेवले आहे’, असे मला जाणवले. तेव्हा मी पू. आजींना विचारले, ‘‘प.पू. डॉक्टर आले होते. भेटले नां !’’ त्या वेळी पू. आजींनी होकारार्थी मान हलवली.
देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. कविता रविकांत शहाणे (२७.५.२०२३)
|