‘वॅगनर ग्रुप’च्या बंडाचे रशिया आणि युक्रेन युद्धावर होणारा परिणाम !
‘रशियाचे एक खासगी सैन्य आहे, ज्याला ‘वॅगनर ग्रुप’ म्हटले जाते. त्या ‘वॅगनर ग्रुप’ने रशियाच्या विरोधात बंड केले आहे’, असा आरोप रशियाचे सैन्य आणि गुप्तचर संस्था करत आहेत. यावर ‘आम्ही कोणतेही बंड केलेले नसून स्वत:चे रक्षण करत आहोत’, असे या गटाचे प्रमुख येवगेनी प्रिगोजिन यांनी म्हटले आहे. त्यामुळे ‘वॅगनर ग्रुप’ म्हणजे काय ? ‘वॅगनर ग्रुप’ आणि रशियाचे सैन्य यांच्या संघर्षाचे रशिया अन् रशिया-युक्रेन युद्ध यांवर काय परिणाम संभवतात, याविषयीचे विश्लेषण या लेखात पाहूया.
१. युक्रेन युद्ध जिंकण्यात रशियाला अपयश !
‘वॅगनर ग्रुप’मध्ये निवृत्त सैनिकांचा समावेश आहे. त्याचा प्रमुख हा एक माजी सैनिक आहे. त्याच्याकडे आज २० ते २५ सहस्र सैनिक असल्याचे समजते. या सैनिकांचा युक्रेन युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. रशिया-युक्रेन युद्धामध्ये रशियाचे दोन ते अडीच लाख सैन्य सहभागी झाले आहे. असे असूनही १६ मास होऊनही रशियाला हे युद्ध जिंकता आले नाही. रशियाचे सैनिक लढायला सिद्ध नाहीत. रशिया केवळ दुरून शस्त्रांचा मारा करून हे युद्ध जिंकण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याला हे युद्ध जिंकणे जड जात आहे. युद्ध जिंकण्यासाठी पायदळ, इंन्फंट्री यांच्या साहाय्याने जवळून लढाई केली जाते आणि त्यासाठी रशियाचे सैन्य सिद्ध नाही. याचे मुख्य कारण, म्हणजे रशियाचे सर्व सैनिक तरुण असून ते केवळ ४ वर्षांसाठी सैन्यामध्ये येतात. त्यांना पुढे जाऊन दुसरे करिअर चालू करायचे असते. त्यामुळे ‘या युद्धात आपण का मरावे ?’, असे त्यांना वाटते. अशा वेळी रशियाच्या प्रमुख अधिकार्यांना क्षेपणास्त्रे किंवा आधुनिक शस्त्रे वापरणे आणि मानसिक युद्ध करणे यांखेरीज दुसरा पर्याय नसतो.
२. रशिया-युक्रेन युद्धाविषयी रशियाच्या प्रमुख अधिकार्यांकडून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची दिशाभूल
प्रारंभी रशियाच्या वरिष्ठ अधिकार्यांना वाटले की, त्यांच्याकडे मोठे सैन्य आणि आधुनिक तंत्रज्ञान आहे. आपण सहस्रो रणगाडे आणि तोफा युक्रेनमध्ये पाठवल्या, तर ते पाहून युक्रेन घाबरेल अन् त्वरित आत्मसमर्पण करील; पण तसे झालेले नाही. गेले १६ मास ही लढाई चालू आहे. आता सैन्य आणि त्यांचे प्रमुख अधिकारी रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमिर पुतिन यांना पुष्कळ घाबरतात. त्यामुळे ते त्यांना खोटी माहिती देतात. ते ‘रशियाचे सैन्य आक्रमक कारवाई करत आहे’, ‘युक्रेनचे सैन्य घाबरलेले आहे’ आणि ‘आता युक्रेनचे सैन्य पळून जाईल’, अशी अवास्तव माहिती पुतिन यांना देत असतात. नंतर कळते की, या बातम्या काही फारशा चांगल्या नाहीत. आता अशाच आघाड्यांवर रशियाच्या सैन्यासमवेत ‘वॅगनर ग्रुप’चे सैनिक अधिक चांगल्या पद्धतीने लढत आहेत, असे सर्वांचेच म्हणणे आहे. या ‘ग्रुप’चे प्रमुख म्हणतात, ‘‘ही सर्व लढाई मी आणि ‘वॅगनर ग्रुप’च करत आहे. रशियाचे मोठे अधिकारी या लढाईला घाबरत आहेत. हे युद्ध रशियाच्या सैन्यासाठी पैसे कमवण्याचा एक धंदा झालेला आहे. ते केवळ युद्ध जिंकल्याच्या खोट्या बातम्या देत आहेत. त्यांच्यात युद्ध जिंकण्याचे धाडस नाही.’’
३. ‘वॅगनर ग्रुप’ आणि रशियाचे सैन्य यांच्यात गंभीर वाद
युक्रेन युद्धामध्ये ‘वॅगनर ग्रुप’ला बर्यापैकी यश मिळाले, यात कुणाच्याही मनात शंका असू नये; परंतु २०-२५ सहस्रांचे सैन्य कधीही दोन-अडीच लाख सैन्याची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे ‘वॅगनर ग्रुप’ आणि रशियाचे सैन्य यांच्यात गंभीर वाद चालू आहे. आता ‘वॅगनर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी प्रिगोजिन यांनी ‘रशियाचे सैन्य त्यांच्यावर आक्रमण करत आहे’, असा आरोप केला. रशियाच्या सैन्याने हा आरोप फेटाळला आहे. ‘‘जेथे जेथे अर्धसैनिक दले आहेत, ते आमच्या बाजूने येत आहेत’’, असे ‘वॅगनर ग्रुप’चे म्हणणे आहे. त्यांच्या मते ते अतिशय लोकप्रिय असून लोक त्यांना सहकार्य करत आहेत. रशियाच्या सैन्याच्या मते ‘वॅगनर ग्रुप’ने बंड केले आहे. त्यांनी काळ्या समुद्रावर असलेले एक महत्त्वाचे शहर कह्यात घेतले आहे. याचा अर्थ रशियाचे सैन्य आणि ‘वॅगनर ग्रुप’ यांच्यात एक गृहयुद्ध चालू झाले आहे.
४. ‘वॅगनर ग्रुप’ आणि रशियाचे सैन्य यांच्या वादामुळे रशियाची मोठी हानी
सध्या रशियाच्या सैन्यामध्येच हिंसाचार वाढला आहे. त्यामुळे रशियाच्या सैन्याचे कि ‘वॅगनर ग्रुप’चे ऐकायचे ? या चक्रव्युहामध्ये पुतिन अडकले आहेत. यामुळे युक्रेन युद्धातील रशियाच्या सैन्याची क्षमता अतिशय न्यून होणार आहे. असे म्हटले जाते की, युक्रेनचे सैन्य प्रतिआक्रमण करण्यात गुंतलेले आहे. त्यामुळे यात युक्रेनच्या सैन्याला थोडेफार यश मिळू शकते आणि रशियाच्या सैन्याला अधिक माघार घ्यावी लागू शकते. अशा वेळी रशिया-युक्रेन युद्धाची परिस्थिती अजून गंभीर होत आहे. त्यामुळे पुढील घटनांकडे आपल्याला लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तेथे नेमके काय चालले आहे, याविषयी पाश्चात्य माध्यमे अधिक सुस्पष्ट बातमी देऊ शकतील. एक मात्र निश्चित की, या वादामुळे रशियाची फार मोठी हानी होणार आहे.’
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे. (२४.६.२०२३)