रशियातील बंडखोर ‘वॅगनर ग्रुप’ सैन्याने घेतली माघार !

  • बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनी घडवून आणला समेट !

  • प्रिगोजिन यांच्यावर कोणताही खटला चालवला जाणार नाही !

‘वॅगनर ग्रुप’ चे प्रमुख येवगेनी प्रिगोजिन व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन

मॉस्को (रशिया) – रशियातील खासगी सैन्य असलेल्या ‘वॅगनर ग्रुप’ने बंडखोरी करत रशियातील रास्तोव्हा शहर कह्यात घेऊन मॉस्कोकडे कुच केली होती. तसेच या सैन्याचे प्रमुख येवगेनी प्रिगोजिन यांनी स्वतःला राष्ट्राध्यक्षही घोषित केले होते; मात्र आता राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि प्रिगोजिन यांच्यात वाटाघाटी झाल्यानंतर प्रिगोजिन यांनी माघार घेतली असल्याचे घोषित केले आहे.

१. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार प्रिगोझिन आणि रशियाच्या बाजूने वाटाघाटी करणारे बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांड ल्युकाशेंको यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर प्रिगोझिन यांनी मॉस्कोच्या दिशेने आगेकूच करणार्‍या त्यांच्या सैन्याला थांबण्याचा आदेश दिला. या चर्चेनुसार प्रिगोझिन यांच्यावर कोणताही खटला चालवला जाणार नसून त्यांना बेलारूसला विनाअडथळा पाठवण्यास पुतिन यांनी मान्य केले आहे. तसेच ‘वॅगनर ग्रुप’ सैन्यावरही कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. ‘प्रिगोझिन बेलारूसमध्ये गेले, तरी त्यांचे सैन्य त्यांच्या आधीच्याच युक्रेनमधल्या तळावर पुन्हा तैनात होईल, अशी अटही घालण्यात आली आहे.

२. ‘रशियामध्ये रक्तपात आणि अंतर्गत लढा होऊ नये, हेच पुतिन यांचे सर्वोच्च ध्येय होते; म्हणून त्यांनी प्रिगोझिन आणि त्यांच्या सैन्याला जाऊ दिले’, असे स्पष्टीकरण पुतिन सरकारकडून देण्यात आले आहे.

३. ‘वॅगनर ग्रुप’चे सैन्य रशियाची राजधानी मॉस्को पासून अवघ्या २०० किलोमीटरहून अल्प अंतरावर पोचले होते. जर त्यांच्याशी चर्चा करून ती यशस्वी झाली नसती, तर पुढे भीषण युद्ध झाले असते.