भारताला धर्म आणि देवता यांच्यावरील श्रद्धाबळावरच हिंदु राष्ट्राचे कार्य पुढे न्यायला हवे !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केलेले समारोपीय मार्गदर्शन

१६ ते २२ जून या ७ दिवसांमध्ये ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा विचारयज्ञ पार पडला. देवता, कर्म आणि यजमान यांच्यात एकता आल्यानंतर यज्ञाचे फळ मिळत असते. याप्रमाणे सर्वशक्तीमान देवतांचे आशीर्वाद, आपल्या सर्वांकडून भावी काळात होणारे कर्मरूपी धर्मकार्य आणि यजमानत्व भूषवणारी हिंदु जनजागृती समिती यांच्या एकतेतूनच हिंदु राष्ट्राचे अमृतफळ मिळेल, याची निश्चिती बाळगा ! ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या समारोपाच्या निमित्ताने काही सूत्रे येथे देत आहे.

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

१. हिंदु संघटनांना दिशादर्शन

१ अ. हिंदु संघटनांमध्ये समन्वय स्थापित करण्यासाठी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ ! : अनेक जण हिंदु जनजागृती समितीला विचारतात, ‘हिंदुत्वाच्या अनेक संस्था आहेत; मग हिंदु जनजागृती समितीचे वेगळे अस्तित्व कशासाठी ?’ त्यांचा प्रश्न स्वाभाविक आहे. विशाल हिंदु समुदायाच्या दृष्टीने ‘हिंदु जनजागृती समितीसारख्या छोट्या छोट्या अनेक संघटना असण्यापेक्षा एकच संघटना का असू नये ?’, असे त्यांना सुचवायचे असते. हिंदु समाज जितका विशाल आहे, तितका भिन्न भिन्न प्रकृती असलेल्या समुदायांचा समूह आहे. कुणी आध्यात्मिक असेल, तर कुणी कर्मवादी; कुणी शारीरिक पातळीवर कार्य करण्यास इच्छुक असेल, तर कुणी वैचारिक पातळीवर; कुणी अर्थसाहाय्य करू इच्छित असेल, तर कुणी न्यायालयात लढण्याची इच्छा दाखवत असेल. अशा अनेक प्रकृती, क्षमता आणि गुण असलेल्यांसाठी एकच कार्यशैली असलेली संस्था असेल, तर ती खरोखर त्यांना न्याय देऊ शकेल का ? अशा सर्वांना त्यांच्या त्यांच्या कार्यशैलीप्रमाणे, प्रकृती आणि क्षमता यांनुसार कार्य उपलब्ध करणार्‍या संस्था असणे, हे हिंदुहिताचेच आहे. बाजारात गेल्यानंतर कपड्यांची अनेक दुकाने असतात. स्वतःची व्ययशक्ती, प्रतिष्ठा, रूची यांनुसार जसे आपण दुकान निवडतो, तसा हिंदू त्यांच्या स्वभावाला अनुकूल संस्था-संघटना निवडत असतो. असे असले, तरी अशा संस्थांमध्ये हिंदुहिताच्या ध्येयाने समन्वय स्थापित करणे आवश्यक आहे आणि म्हणूनच या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे प्रयोजन आहे.

१ आ. हिंदु संघटनेचे प्रयोजन, म्हणजे लक्ष्य सुनिश्चित असले पाहिजे ! : आज भारतात आणि भारताबाहेर अनेक हिंदु संघटना कार्यरत आहेत. काही लोकसंग्रह करत आहेत. काही शिक्षणक्षेत्रात आहेत. अधिवक्ता आणि उद्योगपती यांच्या संघटना आहेत. आध्यात्मिक संस्था आहेत. कला, विद्या आणि संस्कृती यांच्या संदर्भात संस्था आहेत. हिंदुत्वाचा विचार समोर ठेवून प्रसारमाध्यमे आणि प्रकाशन संस्थाही आहेत. या सर्व हिंदु धर्मासाठी कार्यरत संस्था आहेत; पण प्रत्येकाचे प्रयोजन किंवा लक्ष्य निश्चित असले पाहिजे. केवळ ‘हिंदुत्वाचा विचार प्रसारित करण्यासाठी किंवा हिंदूसंघटन करण्यासाठी संस्था’, असे त्याचे स्वरूप असू नये. लक्ष्य निर्धारित असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी समयबद्ध सुनियोजित प्रयत्न केले जातात. तात्पर्य, संस्था किंवा संघटना यांचा हिंदुत्वाचा विचार असणे, ही चांगली गोष्ट आहे; पण ‘संघटनेने लक्ष्य काय निर्धारित केले आहे’, हे त्याहून महत्त्वाचे आहे. हिंदुत्वाचा विचार पसरवण्यासाठी संघटना आवश्यक असते, असे नाही. एक सामान्य व्यक्तीही ‘हिंदुत्वाची प्रचारक’ असू शकते. जेव्हा दोन आणि दोनपेक्षा अधिक हिंदूंचा समूह एकत्र येऊन संघटना निर्माण होते, तेव्हा ती हिंदुहिताचे, म्हणजे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे लक्ष्य साध्य करणारी ध्येयप्रेरित चळवळ असली पाहिजे. त्यामुळे सर्व हिंदु संघटनांनी स्वतःचे लक्ष्य सुनिश्चित करावे !

‘हिंदु जनजागृती समिती’ने प्रारंभापासून धर्मशिक्षण, धर्मजागृती आणि हिंदूसंघटन या क्षेत्रांत कार्य करण्याचे निश्चित केले, तेव्हा ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हे लक्ष्य ठेवले. त्यानुसार सतत २० वर्षे उपक्रम आणि धोरणे राबवली. आज २० वर्षांनंतर या लक्ष्यप्राप्तीच्या जवळ जात असल्याचे एक समाधान आहे. अद्यापही पुष्कळ मोठा पल्ला गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. त्यासाठी समयबद्ध योजना आणि उपक्रम समिती राबवत आहे. एखाद्या संस्थेचे प्रयोजन पूर्ण झाल्यानंतर तिची आवश्यकता रहात नाही. तसेच ‘हिंदु जनजागृती समिती’चेही लक्ष्य पूर्ण झाल्यानंतर तिची आवश्यकता रहाणार नाही, हे मी येथे सांगू इच्छितो.

१ इ. ‘हिंदु संघटनांना हिंदु राष्ट्राचे निःस्वार्थ कार्य करून काय लाभ होतो ?’ : ‘हिंदु संघटनांना हिंदु राष्ट्राचे निःस्वार्थ कार्य करून काय लाभ होतो ?’, असा प्रश्न काही जण िवचारत असतात. त्यांचा प्रश्न व्यावहारिक असतो. ‘भविष्यात तुम्हाला पद, प्रतिष्ठा मिळेल का ?’, असे त्यांना विचारायचे असते. मी येथे स्पष्ट करू इच्छितो की, आपण सर्व जण एक निष्काम कर्मयोगी साधक आहोत, ज्यांचे ध्यान प्रभु श्रीराम आहेत आणि लक्ष्य रामराज्य, म्हणजेच हिंदु राष्ट्र आहे. आम्ही रामराज्याचे भोक्ते नाही, तर रामराज्य आणणारे भक्त आहोत. रामराज्य आल्याने आमची आध्यात्मिक साधना होऊन पारलौकिक उन्नतीचा मार्ग सुलभ होणार आहे, हाच काय तो आमचा लाभ आहे !

२. हिंदु राष्ट्राचे ध्येय साकारण्यासाठी करावयाचे प्रयत्न

२ अ. हिंदूंसाठी धर्मशिक्षणवर्ग चालू करा ! : भारताला धर्माधारित हिंदु राष्ट्र बनवण्यापूर्वी ‘हिंदु धर्म काय आहे’ आणि ‘प्राचीन काळी सनातन धर्मानुसार चालणारे राष्ट्र कसे होते ?’, हे समजून घेणे आवश्यक आहे. सध्याच्या ‘धर्मनिरपेक्ष’ राष्ट्रात समाजाला ‘धर्म म्हणजे काय ?’, हे शिकवलेच गेलेले नसल्याने प्रत्येक जण अधर्माने वागत आहे. अगदी दूधवाल्याने भेसळयुक्त दूध विकण्यापासून डॉक्टरने रुग्णांना लुबाडण्यापर्यंत आणि राजकारण्यांनी ‘सरकारी’ कर्मचार्‍यांप्रमाणे भ्रष्ट आचरण करण्याचे अनुभव प्रतिदिन येत आहेत. या अधर्माविरुद्ध जागृती करणे, अधर्म रोखण्यासाठी प्रत्यक्ष कृती करणे आणि अधर्म रोखल्यानंतर ती व्यवस्था पुनश्च धर्माला अनुकूल होण्यासाठी प्रयत्न करणे, असे कार्य सध्याच्या काळात करणे आवश्यक आहे. आजच्या आधुनिक काळात हीच धर्मसंस्थापना आहे.

धर्मसंस्थापना म्हणजे केवळ धर्मनिरपेक्ष राष्ट्राला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे नव्हे, तर धर्मग्लानी आलेले राष्ट्र आणि समाज यांतील प्रत्येक घटकाला धर्ममय बनवणे होय. यासाठी भविष्यात मोठ्या प्रमाणात धर्मशिक्षणाचा प्रसार करावा लागणार आहे. धर्मशिक्षणातून समाज धर्माचरणी झाल्याने भ्रष्टाचार, अनैतिकता, गुंडगिरी अशा सामाजिक समस्या सुटतील. धर्मशिक्षणाच्या प्रसारामुळे ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर आदी हिंदूंच्या समस्यांवर मुळापासून रोखणेही शक्य होणार आहे. ‘नास्तिकतावाद’, ‘साम्यवाद’, ‘सेक्युलरवाद’ (निधर्मीवाद) इत्यादी अधर्मी विचारधारा समूळ नष्ट होऊ शकणार आहेत. यासाठी भविष्यात, म्हणजेच हिंदु राष्ट्र येईपर्यंत आणि हिंदु राष्ट्र आल्यानंतरही हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचे कार्य आपल्यासारख्या सर्व धर्मवादी संघटनांना करावे लागणार आहे.

‘हिंदु जनजागृती समिती’कडून सध्या भारतात ५०० हून अधिक ठिकाणी निःशुल्क धर्मशिक्षणवर्ग घेतले जातात. आपणही आपल्या क्षेत्रात असे निःशुल्क धर्मशिक्षणवर्ग चालू करून हिंदु समाजाला धर्मसाक्षर बनवण्याचे कार्य करायला हवे ! यासाठी ‘हिंदु जनजागृती समिती’ आपल्यालाही साहाय्य करील !

२ आ. लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध कार्य करा ! : भारत राजकीयदृष्ट्या हिंदु राष्ट्र घोषित झाल्यानंतर लगेचच भारतात रामराज्य अवतरणार नाही. वर्तमान लोकशाहीची दुर्दशा आपण सर्व जण अनुभवत आहोतच. लोकशाहीचे चारही स्तंभ भ्रष्टाचार, अनैतिकता आणि अराजकता यांनी पोखरले आहेत. शिधावाटपाची (रेशनची) दुकाने, पोलीस ठाणे, शासकीय कार्यालये, सरकारी रुग्णालये, न्यायालये आदींमध्ये भ्रष्टासुर जिवंत आहेत. सध्याची व्यवस्थाही एक कालबाह्य व्यवस्था आहे. एक छोटेसे उदाहरण सांगतो. सध्या भ्रमणभाषवर महिनाभर ‘अनलिमिटेड कॉल’ आणि २ जीबी डेटा हवा असेल, तर ३९९ रुपयांमध्ये कोणत्याही आस्थापनाद्वारे ते उपलब्ध आहे; मात्र अद्यापही भारतातील खासदारांना प्रत्येक मासाला १५ सहस्र रुपये टेलिफोन भत्ता दिला जात आहे. सामान्यतः ८०० खासदारांचे प्रत्येकी १५ सहस्र रुपये, म्हणजे जनतेच्या करातील प्रत्येक मासाला १२ कोटी रुपये असे उधळले जात आहेत. या व्यवस्थेत परिवर्तन आणायला नको का ? म्हणूनच विद्यमान लोकशाहीत रामराज्य आणण्याचे कार्य एक मोठे शिवधनुष्य उचलण्याप्रमाणे आहे.

लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध जागृती आणि प्रत्यक्ष कार्य आतापासून करावे लागणार आहे, तरच हिंदु राष्ट्राला अभिप्रेत वैचारिक क्रांती सर्वत्र होईल.

२ इ. हिंदु राष्ट्राचे कार्य करतांना स्वभाषाशुद्धीचा आग्रह धरा ! : सध्या धर्मांतरितांची ‘घरवापसी’ म्हणजेच त्यांची शुद्धी करण्यासाठी अनेक हिंदु संस्था आग्रही आहेत. अशा प्रकारचा आग्रह स्वभाषेच्या शुद्धीकरणाच्या संदर्भातही हवा ! स्वभाषेचा अभिमान, हा एक प्रकारचा धर्माभिमान वृद्धींगत करणारा असतो. आजकाल स्वभाषेत बोलतांना आपण बरेच इंग्रजी, उर्दू, पर्शियन, अरबी असे परकीय भाषांतील शब्द उपयोगात आणतो. या परकीय भाषेतील शब्दांमुळे आपली भाषा चैतन्यहीन होते, हे लक्षात घ्यायला हवे ! भारतातील सर्व भाषा संस्कृतपासून उत्पन्न झाल्या आहेत. त्यामुळे संस्कृतनिष्ठ स्वभाषेचा प्रयोग हिंदु राष्ट्राचे कार्य करतांना अर्थात् भाषणे देणे, संभाषण करणे, लेखन करणे इत्यादी वेळी करा ! उदाहरण सांगायचे, तर बर्‍याच वक्त्यांनी या अधिवेशनात बोलतांना ‘जग’ या शब्दासाठी ‘दुनिया’ हा शब्दप्रयोग केला. ‘दुनिया’ हा टर्की शब्द आहे. ‘संसार’, ‘जगत’ असे अनेक शब्द स्वभाषेत उपलब्ध असतांना परकीय भाषेतील शब्दांचा प्रयोग आपण सर्वांनी टाळायला हवा !

हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यानंतर सर्व भारतीय भाषांच्या शुद्धीकरणाचे कार्य आपण करू !

२ ई. सर्वधर्मसमभाव हा शब्दप्रयोग टाळा ! : सध्या कपोलकल्पित तथ्ये, म्हणजे ‘नॅरेटिव्ह’ बनवून हिंदूंना मूर्ख बनवले जात आहे. ‘सर्वधर्मसमभाव’ हेसुद्धा एक ‘नॅरेटिव्ह’ आहे. लक्षात घ्या ! धर्म एकच आहे, तो म्हणजे सनातन हिंदु धर्म ! उर्वरित सर्व पंथ आहेत. सर्व पंथांची उपासना भिन्न आहे; मग ‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्दप्रयोग कशासाठी ? फार वर्षांपूर्वी तत्कालीन महात्मा-पंडितांनी ‘ईश्वर-अल्लाह एकच आहे’, हे ‘नॅरेटिव्ह’ बनवले आणि या ४ शब्दांनी हिंदू कायमचे वैचारिकदृष्ट्या मृत झाले. अद्यापही ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’च्या राष्ट्रीय अधिवेशनात सर्वधर्मसद्भावाचे प्रतीक म्हणून हिंदु साधू-संतांना जावेसे का वाटते ?’, याचे उत्तर या ‘नॅरेटिव्ह’मध्ये लपलेले आहे. सुदैवाने या वर्षी ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’च्या राष्ट्रीय अधिवेशनावर बहिष्कार घालत हिंदु धर्मगुरूंनी मंच सोडला. यापुढे हिंदु नेतृत्वाने ‘सर्वधर्मसमभावा’सारख्या लेच्यापेच्या भूमिका न घेता स्पष्टपणे आपल्या भूमिका मांडण्यास प्रारंभ केला पाहिजे.

एवढेच करून होणार नाही. इस्लाम प्रारंभी शब्दांत सांगितला जातो आणि नाही समजला, तर कृतीतून समजावून सांगितला जातो. कृतीने चर्चा करण्याइतका हिंदु प्रगल्भ झालेला नाही.

‘आजही आमच्या मिरवणुकांवर आक्रमणे का होतात ?’, हा प्रश्न त्याला पडतो. त्यासाठी प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे. ‘कृतीने चर्चा कशी करायची ?’, हे आपण शिकले पाहिजे.

२ उ. हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी सनातन ज्ञानपरंपरा आणि शौर्यपरंपरा यांची जागृती करा ! : हिंदु राष्ट्राच्या पुनरुत्थानाचे २ महत्त्वपूर्ण आधारभूत बिंदू आहेत. पहिली सनातन ज्ञानपरंपरा म्हणजे ब्राह्मतेज आणि दुसरी शौर्यपरंपरा म्हणजे क्षात्रतेज ! या दोन्ही परंपरांची जागृती येत्या काळात आपल्या सर्वांना करावी लागणार आहे. २ उ १. सनातन ज्ञानपरंपरेची जागृती : सनातन धर्मग्रंथ ही हिंदु राष्ट्राची ज्ञानशक्ती आहे. अखिल मानवजातीच्या जीवनाच्या विविध अंगांना सकारात्मक रूप देणारे सनातन धर्मग्रंथांतील ज्ञान संपूर्ण विश्वाला प्रेरित करते. ही ज्ञानपरंपराच आधुनिक जगाच्या विकृत झालेल्या सभ्यतांना आध्यात्मिक जीवनदृष्टी देईल. आपले सनातन सिद्धांत तत्त्वज्ञान, विज्ञान आणि व्यवहार या तिन्ही दृष्टीकोनांतून प्रगत आहेत. त्यांचे पालन केल्याविना व्यावहारिक आणि पारलौकिक प्रगतीही होऊ शकत नाही, तसेच ईश्वरप्राप्तीचा मार्गही मोकळा होऊ शकत नाही. म्हणूनच सनातन धर्म दर्शन, विज्ञान आणि व्यवहार यांचा समन्वय साधून कार्य करा ! हिंदु राष्ट्राच्या वैचारिक क्रांतीमध्ये तुच्यासमोर कुणीही टिकणार नाही !

भारतात आदर्श समाजव्यवस्था, राजकीय संस्था आणि धार्मिक संरचना निर्माण होण्यासाठी, तसेच ते आधुनिक भोगवादी पश्चिमी विचारांतून मुक्त करण्यासाठी सनातन ज्ञानपरंपरेची आवश्यकता आहे. याचा प्राथमिक स्तर म्हणजे सनातन ज्ञानपरंपरांची जागृती करणारी आणि शिकवण देणारी गुरुकुले अन् विद्यालये यांची उभारणी करणे होय. याचा एक प्रारंभ म्हणजे गोव्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची स्थापना झाली आहे !

२ उ २. शौर्यपरंपरेची जागृती : ज्ञानपरंपरेसह शौर्यपरंपरेची जागृती करणे, ही काळाची आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहेत. भारताच्या पराधीन झालेल्या भागाला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी प्रामुख्याने २ संघर्ष झाले. एक राजनैतिक आणि दुसरा क्रांतीकारी ! ‘सेक्युलर’ इतिहासकारांनी राजनैतिक संघर्षाचे श्रेय महात्मा-पंडितांना देणारे विकृत लेखन केले. याविषयी मी विस्ताराने बोलणार नाही. दुसरा संघर्ष होता, राजपुरुष आणि क्रांतीकारक यांच्या पराक्रमाचा अन् देशभक्तीपर समर्पणाचा ! राजस्थानातील महाराणांनी १ सहस्र वर्षे सतत परकीय जिहादी आक्रमकांशी धर्मयुद्ध केले. राणा कुंभा असो, राणा हमीर असो, महाराणा प्रताप असो कि बाप्पा रावल असो, त्यांचे हे धर्मयुद्ध केवळ हिंदु राष्ट्राचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी होते. दक्षिणचे विजयनगरचे ‘हिंदु साम्राज्य’ असो, छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य’ असो, मराठ्यांचे ‘हिंदु साम्राज्य’ असो कि पंजाब शीखगुरूंचे खालसा दल असो, या सर्वांनीही धर्मयुद्ध केले आणि ते केवळ हिंदु राष्ट्राच्या प्राप्तीसाठी होते. आपले राजपुरुष आणि धर्मपुरुष यांची ही हिंदु राष्ट्र भावना स्वातंत्र्यवीर सावरकरांसम क्रांतीपुरुषांनीही जीवित ठेवली होती.

आज शौर्यपरंपरा विलुप्त होण्याच्या स्थितीत आहे. म्हणूनच हिंदु समाजामध्ये शौर्यपरंपरेची जागृती करण्यासाठी ‘हिंदु जनजागृती समिती’ निःशुल्क शौर्यजागृती शिबिरे सर्वत्र आयोजित करत आहे. अशी शिबिरे आपण सर्व जणही आपल्या क्षेत्रात आयोजित करू शकता !

कालप्रवाह समजून घ्या !  

आता भविष्यकाळाच्या संदर्भात काही संकेत येथे देत आहे.

१. सध्या हिंदु समाजासाठी अनुकूल आणि प्रतिकूल असे दोन्ही काळ आहेत. राजकीय जागृतीच्या दृष्टीने काळ अनुकूल असला, तरी हिंदूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने सध्याचा काळ प्रतिकूल आहे आणि भविष्यातही पुढील काही वर्षे असणार आहे.

२. यापुढील काळात पुष्कळ काही होणार आहे. युद्धही होणार हे. भारताच्या सीमांचा विस्तारही होणार आहे. भयंकर संग्रामही होणार आहे. यासाठी भगवंताने ज्यांना निमित्त बनवून ठेवले आहे, ते निमित्त होणारच आहेत.

३. सावध व्हा ! समोर युद्धाची भयंकर दरी आहे. या काळात होणार्‍या प्रचंड नरसंहारानंतर ‘कोण जिवंत राहील?’, हे सांगता येत नाही. अतिशय अराजकमय वातावरण होणार आहे.

४. अशा भीषण काळात स्वधर्मबंधूंचे रक्षण करणे आवश्यक आहे. हिंदु म्हणून जन्माला आलेले; परंतु कर्माने अनैतिक, भ्रष्ट आणि दुष्ट प्रवृत्तीचे असलेले त्यांच्या जिवाचे रक्षण करण्यायोग्य नसतात; कारण अशांचे रक्षण करण्याचे दायित्व धर्म घेत नाही. हिंदु धर्मासाठी काही न करणार्‍याला संकटकाळात वाचवावे, असे अन्य हिंदूंना किंवा देवाला तरी का वाटेल ?

५. या भीषण काळात हिंदु समाज आणि परिवार यांचे रक्षण करण्यासाठी आजपासूनच स्वसंरक्षणाच्या वस्तू गोळा करा ! दडपलेली मुंगीसुद्धा योग्य वेळी सूड घेत असते, हे लक्षात ठेवा !

६. या भीषण काळातील एक अपरिहार्य घटना म्हणजे धर्मयुद्ध ! धर्मयुद्धाचे आमंत्रण पाठवले जात नसते. जे शूर आहेत, ते स्वतः मैदानात येतात, हेही लक्षात ठेवा !

७. लक्षात ठेवा, मंत्र आणि काळ गुप्त ठेवला जातो. त्यामुळे ‘भीषण काळ किंवा धर्मयुद्धाचा काळ कधी येईल ?’, हे विचारणार्‍यांनो, धैर्य ठेवा ! तो लवकरच येईल !

८. धर्मयुद्धात देवतांच्या साहाय्याविना कार्य सिद्ध होत नाही. अर्जुनालाही भगवंताचे साहाय्य मागावे लागले होते. म्हणूनच राम, कृष्ण, शिव, नारायण इत्यादींपैकी कुणाच्याही नावाचे नित्य स्मरण करत रहा !

९. या भीषण काळात जगता येण्यासाठी हिंदु समाजाच्या संघटनेच्या बळासह देवतांच्या आशीर्वादाचे बळ आणि स्वतःमध्ये धर्माचरणाचे अन् साधनेचे आत्मबळ निर्माण करा !

१०. या भीषण काळात निसर्ग, विशेषतः पंचमहाभूतांचेही विशेष योगदान असणार आहे. जे कुणी भारताला हिंदु राष्ट्र होण्यात अडथळे आणतील, ते सुरक्षित रहाणार नाहीत. देवाची शक्ती असलेला निसर्ग आपत्तींद्वारे त्यांना संपवील ! ‘हिंदु म्हणजे काय ?’, हे हिंदुविरोधकांना काळच सांगील.‘हिंदु’ म्हणजे ‘हीनान् गुणान् दूषयति..।’ म्हणजे हीन गुण-कर्मांचा (रज-तमाचा) त्याग करणारे हिंदु आहेत. हेच गुण असलेली पृथ्वी हिंदु आहे. पाणी, सूर्य, वायु, आकाश सर्व हिंदु आहेत. आज हिंदूंचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करणार्‍यांना ‘आपण स्वतःचे अस्तित्व धोक्यात घालत आहोत’, हेच कळत नाही. एकूणच निसर्ग हा हिंदु राष्ट्राचा मार्ग प्रशस्त करणार आहे. या नैसर्गिक आपत्तींमध्ये भगवंताच्या नामजपाचे बळ आपले रक्षण करण्यास समर्थ असेल !

३. समारोप

शेवटी एवढेच सांगेन की, तुमच्यासह सरकार आहे कि नाही ? व्यापारप्रणाली तुमचे समर्थन करते कि नाही ? प्रसारमाध्यमे तुमची साथ देतात कि नाही ? याची काळजी करू नका ! संकल्प करा, ‘मला भारताला हिंदु राष्ट्र करायचे आहे आणि धर्म अन् देवता यांच्यावरील श्रद्धाबळावर हिंदु राष्ट्राचे कार्य पुढे न्यायचे आहे !’ स्वतः सर्वशक्तीमान देवता कालमाहात्म्यानुसार वर्ष २०२५ नंतर हिंदु राष्ट्राचा मार्ग प्रशस्त करणारच आहेत. या महान धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा !

आपल्या सर्वांकडून धर्मसंस्थापनेचे भव्यदिव्य आणि ऐतिहासिक कार्य व्हावे, अशी श्रीमन्नारायणाच्या चरणी प्रार्थना !

– (सद्गुरु) नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती