समष्टीला अध्यात्मातील ज्ञान मिळावे, याची तळमळ असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. प.पू. डॉक्टरांना दैनंदिन जीवनात घडणार्या प्रत्येक गोष्टीमागील अध्यात्मशास्त्र जाणून घेण्याची तळमळ असणे आणि यातूनच समष्टीसाठी अमूल्य अशा ज्ञानभांडाराची निर्मिती होणे !
‘प्राणशक्ती बरीच अल्प असतांनाही प.पू. डॉक्टर त्यांच्याभोवती घडत असणार्या प्रत्येक गोष्टींचे निरीक्षण करत असतात आणि त्यांच्या नियमित नोंदीही ठेवत असतात. या प्रत्येक निरीक्षणाविषयी ते साधकांशी बोलून त्यातील बारकावेही जाणून घेतात आणि याबद्दल सार्यांनाच कळावे, यासाठी त्यासंदर्भातील छोट्या छोट्या चौकटी बनवून ते दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापण्यासाठीही लगेच देत असतात.
२. प.पू. डॉक्टरांच्या निरीक्षणातून आणि त्यांनी काढलेल्या प्रश्नांतून एक मोठे अध्यात्मशास्त्रीय विवेचनच रहस्याच्या रूपात जगासमोर येणे
अगदी खोलीत एखादा किडा मरून पडला, तरी ‘तो किती घंटे जिवंत होता, कधी त्याचा मृत्यू झाला, तसेच एखादी माशी भूमीवर निपचित पडली असेल आणि नंतर ती तेथून उडून गेली’, तरी त्यावर ते प्रश्न विचारतात की, ‘काही किडे लगेच मरतात, काही किडे तडफडून परत जिवंत होऊन उडून जातात, तर काही किडे त्या ठिकाणी मेलेले आढळले, तरी काही वेळाने ते तेथे नसतात’, यांमागील शास्त्र काय ?’, असे ते प्रश्न असतात. एखाद्याला वाटेल की, यांवर कसले प्रश्न विचारायचे; परंतु प.पू. डॉक्टरांच्या निरीक्षणातून आणि त्यांनी काढलेल्या प्रश्नांतून एक मोठे अध्यात्मशास्त्रीय विवेचनच रहस्याच्या रूपात एखाद्या प्रगल्भ शास्त्रायोगे जगासमोर येते आणि खरंच, प्रत्येक गोष्ट घडवण्यामागील ईश्वराचा कार्यकारणभाव किती उदात्त असतो ? याचेही ज्ञान यातून होते.
अशा अनेक प्रकारच्या निरीक्षणांतून ते प्रश्नही लिहून ठेवतात आणि या प्रश्नांची उत्तरे ते ‘सूक्ष्म-जगतातील ‘एक विद्वान’ यांना विचारण्यासाठी टंकलिखित करून घेतात. पुढच्या पिढीसाठी हे प्रश्नही एखाद्या ग्रंथाच्या रूपात मानवजातीसाठी जतन होतील, इतके ते चैतन्यमय आणि सुंदर असतात.
३. प.पू. डॉक्टरांच्या अविरत चालू असणार्या ज्ञानार्जनाच्या तळमळीतूनच सनातनकडे ४००० ग्रंथ निर्माण होतील, अशी ज्ञानरूपी माहिती जमा झालेली असणे आणि आतापर्यंतचे कार्य ग्रंथरूपात पूर्ण होण्यासाठी पुढच्या तीन-चार पिढ्या लागणे
आतापर्यंत अनेक प्रकारच्या, अनेक विषयांवर विचारलेल्या प्रश्नांची सूची त्यांनी सिद्ध करून ठेवली आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ‘सूक्ष्म जगता’कडून आल्यानंतर ते त्यावर प्रतिप्रश्न विचारतात. जोपर्यंत तो विषय समाधानकारकरित्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते प्रश्न विचारतात. सामान्य माणूस असता, तर त्याला या गोष्टींचा कधीतरी अत्यंत कंटाळा आला असता; परंतु प.पू. डॉक्टरांसारखी परात्पर गुरुमाऊली सार्या समष्टीला छोट्या छोट्या गोष्टींच्या मागील शास्त्र समजावे, यासाठी अहोरात्र धडपडत असते.
मधल्या वेळेत कधी थकव्यामुळे पलंगावर झोपावे लागले, तरी त्यांच्या हातात कुठले ना कुठलेतरी पुस्तक असते. त्यावर ते खुणा करत असतात आणि ते लिखाणही समष्टीला ज्ञान मिळावे, यासाठी टंकलेखनाला देतात. केवढी ही ज्ञानार्जनाची तळमळ. त्यांच्या या अविरत चालू असणार्या ज्ञानार्जनाच्या तळमळीतूनच सनातनकडे ४००० ग्रंथ निर्माण होतील, अशी ज्ञानरूपी माहिती जमा झाली आहे. आतापर्यंतचे कार्य ग्रंथरूपात पूर्ण होण्यासच पुढच्या तीन-चार पिढ्या लागतील.
त्यांच्या छत्रछायेखाली राहून त्यांचा आध्यात्मिक स्तरावर आपण अधिकाधिक लाभ करून घेऊया आणि ‘त्यांच्यासारखी समष्टी सेवेची धडपड आणि तळमळ देवा, आमच्यातही निर्माण होऊ दे’, अशी श्रीकृष्णचरणी प्रार्थना करूया !’
– सौ. अंजली गाडगीळ (आताच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.५.२०१४)