अहिल्यानगर येथील भगवा मोर्चा प्रकरणी प्रक्षोभक भाषणाच्या कारणाखाली तिघांवर गुन्हे नोंद !
संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) – सकल हिंदु समाजाच्या वतीने ६ जूनला काढण्यात आलेल्या भगव्या मोर्च्याच्या वेळी जातीय तेढ निर्माण होईल, असे चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या कारणावरून मोर्च्याच्या संयोजकांसह तिघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (६ जूनला झालेल्या मोर्च्याच्या प्रकरणी आता गुन्हा नोंद होणे हे संशयास्पद नव्हे का ? हिंदूंच्या संदर्भात अशी कारवाई करणारे पोलीस जिल्ह्यात घडणार्या लव्ह जिहादच्या घटनांच्या संदर्भात स्वत:हून अशी कारवाई कधी करतात का ? – संपादक) गुन्हा नोंद झालेल्यांमध्ये ‘सुदर्शन चॅनल’चे संपादक आणि भगवा मोर्चातील प्रमुख वक्ते सुरेश चव्हाणके यांच्यासह योगेश सूर्यवंशी आणि बजरंग दलाचे विशाल वाकचौरे यांचा समावेश आहे. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सभेच्या वेळी योगेश सूर्यवंशी आणि सुरेश चव्हाणके यांनी प्रक्षोभक भाषणे केली असल्याचे तक्रारीत म्हटले असून प्रशासनाने या भाषणांचा अभ्यास करत संबंधितांवर गुन्हा नोंद केल्याचे सांगण्यात आले.
यादव यांनी तक्रारीत म्हटले आहे की,
१. भगवा मोर्चासाठी प्रशासनाकडून अटी, शर्तीवर अनुमती देण्यात आली होती. विशाल वाकचौरे यांच्यासह इतरांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या मोर्च्याचे रूपांतर शेवटी सभेत झाले होते. मोर्च्यामध्ये १८ ते २० सहस्रांचा जनसमुदाय सहभागी झाला होता.
२. जोर्वेनाका घटनेनंतर संगमनेर शहर आणि तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या घटने पाठोपाठ जोर्वे आणि समनापूर येथे या घटनेचे पडसाद उमटले होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांसह पोलीसदलातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी संगमनेर येथे ठाण मांडल्यानंतर संबंधिताच्या विरोधात गुन्हे नोंद करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.
३. मोर्च्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या घराजवळील जाणता राजा मैदानावरील रस्त्यावरही थोरात यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या सगळ्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर उशिराने यासंदर्भात गुन्हा नोंद केल्याचे बोलले जात आहे.
विघातक प्रवृत्ती आणि लव्ह जिहादच्या विरोधात संगमनेरात सकल हिंदु समाजाच्या वतीने भगवा मोर्चा काढण्यात आला होता. जोर्वे गावातील तरुणांना मारहाण झाली, त्यांची साधी विचारपूसही केली नाही; मात्र हिंदु मुलींना त्रास देणार्या प्रवृत्तीच्या विरोधात सकल हिंदु समाज बांधवानी संगमनेरात मोर्चा काढला होता. त्या हिंदूंना दंगलखोर म्हटले. त्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने शहरातील आमदार बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानाजवळ १ घंटा धरणे आंदोलन करण्यात आले होते.