‘जी.पी.एस्.’च्या साहाय्याने ठाऊक नसलेल्या ठिकाणी नेमकेपणाने पोचू शकणे, त्याचप्रमाणे गुरु किंवा मार्गदर्शक यांचे आज्ञापालन केल्यावर साधनेतील पुढचा टप्पा गाठता येणे
१. ‘जी.पी.एस्.’मुळे ठाऊक नसलेल्या ठिकाणी नेमकेपणाने पोचू शकणे
‘हल्लीच्या ‘इंटरनेट’ किंवा ‘टेक्नॉलॉजी’च्या युगात ‘जी.पी.एस्.’ (‘ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम’, म्हणजे जागतिक स्थिती प्रणाली) हा शब्द प्रत्येकालाच ठाऊक आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या अनोळखी भागात किंवा ठिकाणी जायचे असेल, तर आपण ‘जी.पी.एस्.’चा उपयोग करून ठाऊक नसलेल्या ठिकाणी नेमकेपणाने पोचू शकतो. यासाठी आपल्याला जेव्हा गंतव्य ठिकाण शोधायचे असेल, तेव्हा २ गोष्टींची आवश्यकता असते.
अ. स्वतःचे ठिकाण, म्हणजेच ‘लोकेशन’
आ. मला कुठे जायचे आहे ? ते ठिकाण, म्हणजेच ‘डेस्टिनेशन’
या दोन गोष्टी ठाऊक असल्या, तरच ‘जी.पी.एस्.’ आपल्याला योग्य मार्ग दाखवते.
२. साधनेतील ‘जी.पी.एस्.’मुळे साधनेच्या ध्येयाच्या ठिकाणी नेमकेपणाने पोचू शकणे
साधनेतही अगदी असेच असते, साधनेतील ‘जी.पी.एस्.’ म्हणजे नेमके काय ? एक तर प्रथम मला पुढील २ गोष्टींची आवश्यकता असते.
अ. ‘माझे सध्याचे ‘लोकेशन’, म्हणजेच माझी सध्याची साधनेची स्थिती काय आहे ?’, हे मला ठाऊक असावे लागते.
आ. दुसरे म्हणजे ‘माझ्या साधनेतील पुढचे ध्येय, म्हणजेच ‘डेस्टिनेशन’ कोणते आहे ?’, हेही मला ठाऊक असायला हवे.
३. गुरु हेच साधनेतील ‘जी.पी.एस्.’ असणे
एकदा एका उच्चशिक्षित मुलाने एका महात्म्याला विचारले, ‘‘आजच्या विज्ञानाच्या युगात गुरूंची काय आवश्यकता आहे ?’’ तेव्हा त्या महात्म्याने त्या मुलाला विचारले, ‘‘एखाद्या ठाऊक नसलेल्या भागात तुला जायचे असेल, तर तू ‘जी.पी.एस्.’चा उपयोग करतोस ना ? ज्या विषयाबद्दल तुला माहिती किंवा ज्ञान हवे असेल, तेव्हा तू ‘गूगल’चे साहाय्य घेतोस ना ? आजच्या भौतिक आणि वैज्ञानिक जगात ‘इंटरनेट’ किंवा ‘गूगल’ हेच आपले व्यवहारातील गुरु आहेत. अगदी त्याचप्रमाणे साधनेतही असते. साधनेविषयी सर्वसाधारण व्यक्तीला विशेष काही ठाऊक नसते. त्याच्यासाठी ते अज्ञान असते; म्हणून अशा ठाऊक नसलेल्या विषयाची माहिती मिळवण्यासाठी त्याला साधनेतील ‘जी.पी.एस्.’ची, म्हणजेच मार्गदर्शकांची आवश्यकता असते. यासाठीच प्रत्येक साधकाला आध्यात्मिक गुरूंची आवश्यकता असते. गुरु हेच साधनेतील ‘जी.पी.एस्.’ आहेत.
४. साधनेचे पुढील ध्येय गाठण्यासाठी आढावा देणे आणि पुढचे ध्येय विचारून घ्यावे
साधना करतांना गुरूंचा वेळोवेळी लाभ करून घेण्यासाठी, त्यांचे योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी आणि साधनेतील पुढचे ध्येय किंवा लक्ष्य गाठण्यासाठी पुन्हा २ गोष्टी कराव्या लागतात.
अ. आपण करत असलेल्या साधनेचा प्रामाणिकपणे आढावा देणे, यामुळे साधनेची माझी सध्याची स्थिती कुठे आहे ? (म्हणजेच ‘जी.पी.एस्.’ मधील स्वतःचे लोकेशन) हे आपले मार्गदर्शक किंवा गुरु यांना सांगावे.
आ. मार्गदर्शक किंवा गुरूंकडून ‘माझे पुढचे ध्येय काय असावे ?’, (म्हणजेच ‘जी.पी.एस्.’मधील ‘डेस्टिनेशन’) याविषयी माहिती समजावून घ्यावी.
५. विश्वास ठेवून कृती केल्यास इच्छित ठिकाणी पोचता येणे
व्यवहारातील ‘जी.पी.एस्.’चा उपयोग करून घेतांना स्वतःचे ठिकाण (‘लोकेशन’) आणि जाण्याचे ठिकाण (‘डेस्टिनेशन’) हे दोन्ही कळल्यावर ‘जी.पी.एस्.’ आपल्याला मार्ग दाखवतो. केवळ मार्ग दाखवल्यावर झाले, असे नाही, तर त्यासाठी आपल्याला आपला प्रवास चालू करावा लागतो. प्रवास चालू केल्यावर वाटेत एखादे वळण आले की, ‘जी.पी.एस्.’च्या महिलेचा आवाज आपल्याला ‘टर्न लेफ्ट’ (डावीकडे वळा) किंवा ‘टर्न राईट’ (उजवीकडे वळा), असे सांगतो. त्यांच्या सांगण्यावर आपण १०० टक्के विश्वास ठेवतो आणि पुढे तशी वळणे घेत पुढे पुढे जातो, म्हणजेच आपण त्यावर श्रद्धा ठेवतो आणि तिने सांगितल्याप्रमाणे तसे आज्ञापालनही करतो. असे केल्याने आपल्याला ठाऊक नसलेल्या ठिकाणी पोचता येते.
६. साधनेचा आढावा देऊन गुरु किंवा मार्गदर्शक यांचे आज्ञापालन केल्यावर साधनेतील पुढचा टप्पा गाठता येणे
साधनेतही वेळोवेळी आपण करत असलेल्या साधनेचा आढावा देणे आणि मार्गदर्शक किंवा गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनानुसार कृती करणे, म्हणजेच आज्ञापालन करणे. असे करत गेलो, तर निश्चितच आपण आपले साधनेतील पुढचे पुढचे लक्ष्य, म्हणजेच ‘डेस्टिनेशन’ गाठू शकतो.’
– श्री. प्रकाश करंदीकर (वय ६५ वर्षे), ढवळी, गोवा.
(२५.१२.२०२२)