सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी साधकांना होणार्या वाईट शक्तींच्या त्रासाविषयी केलेले एकमेवाद्वितीय संशोधन !
वर्ष २००१ पासून सनातनच्या साधकांचे आध्यात्मिक त्रास वाढले. साधकांना होणार्या वाईट शक्तींचे त्रास नष्ट होण्यासाठी वाईट शक्तींना सूक्ष्मातून हरवणे आवश्यक होते. यासाठी वाईट शक्तींविषयी अधिकाधिक माहिती मिळवणे आवश्यक होते. यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी वाईट शक्तींनाच प्रश्न विचारून अनेक उत्तरे मिळवली आणि त्यावर उपाययोजना केली. यामुळे अखिल मानवजातीसाठी सूक्ष्म जगताविषयी अद्वितीय असे ज्ञानभांडारही उपलब्ध केले.
१. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी कार्यशाळा आणि अभ्यासवर्ग यांमध्ये शिकवल्या जाणार्या विषयाइतकेच महत्त्व आध्यात्मिक त्रास अन् त्यावरील उपायांना देणे, त्यामुळे साधकांमध्ये या विषयाचे गांभीर्य वाढणे
‘गुरुदेव कार्यशाळा आणि अभ्यासवर्ग घेत असत. त्यामध्ये शिकवल्या जाणार्या विषयाइतकेच महत्त्व ते आध्यात्मिक त्रास आणि त्यावरील उपाययोजना यांना देत असत. ‘आध्यात्मिक त्रासांवर योग्य उपाय न केल्यास साधना वाया जाते’, हे सूत्र ते साधकांच्या मनावर बिंबवत असत. त्यामुळे साधकांमध्ये या विषयाचे गांभीर्य वाढले.
२. आध्यात्मिक त्रासाविषयी लिखाण आणि चित्रीकरणाच्या नोंदी अपूर्ण राहिल्यावर परात्पर गुरुदेवांनी सर्व सेवा एक दिवस थांबवून साधकांना लिखाण पूर्ण करायला सांगणे
आध्यात्मिक त्रासांविषयीचे संशोधनाचे लिखाण पूर्ण होण्यासाठी गुरुदेव स्वतः पाठपुरावा घेत असत. मध्यंतरी साधकांना होणारे त्रास पुष्कळ वाढले आणि त्यामुळे नामजपादी उपाय, प्रयोग आणि त्यांचे चित्रीकरण सातत्याने चालू होते. यामुळे आध्यात्मिक त्रासांविषयीचे लिखाण आणि चित्रीकरणाच्या नोंदी इत्यादी सेवा पूर्ण करता आल्या नाहीत. तसेच साधकांना रात्री उशिरापर्यंत जागरणेही होत असत. गुरुदेवांना हे कळल्यावर त्यांनी एक दिवस साधकांना चित्रीकरण आणि प्रयोग बंद ठेवून लिखाण अन् नोंदी पूर्ण करण्यास सांगितले. अशा प्रकारे ‘येणार्या काळात हे सर्व लिखाण मानवजातीसाठी किती महत्त्वाचे आहे’, हे साधकांच्या लक्षात आले.
३. संशोधनात्मक सूत्रे
३ अ. गुरुदेवांनी आश्रमात साधकांचे आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी यशस्वी प्रयोग करणे आणि ते सर्व साधकांपर्यंत पोचवण्याचे नियोजन करणे : आश्रमात साधकांचे आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी केलेले प्रयोग यशस्वी झाले आणि साधकांचा आध्यात्मिक त्रास न्यून होण्यास साहाय्य झाल्यावर लगेच नियतकालिकांद्वारे साधक, वाचक आणि हितचिंतक यांचे प्रबोधन करणार्या चौकटी प्रकाशित केल्या. त्याचा आढावा घेऊन लिखाण देण्यास साधकांना उद्युक्त केले.
३ आ. वाईट शक्तींनी आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना मानसिक त्रास अधिक प्रमाणात देऊन निराशा आणणे आणि त्यावर उपाय म्हणून गुरुदेवांनी मानसोपचार, नामजपादी उपाय, स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, तसेच भावजागृतीचे प्रयत्न करण्यास शिकवणे : वाईट शक्ती एखाद्या व्यक्तीच्या मनावर पटकन आक्रमण करू शकतात; कारण त्या सूक्ष्म असतात आणि मनही सूक्ष्म असते. यावर संशोधन करतांना लक्षात आले की, पीडित साधकांत ‘निराशा येणे, नकारात्मक आणि अनावश्यक विचार येणे, साधना सोडण्याचे विचार येणे’, यांचे प्रमाण पुष्कळ अधिक होते. यावर उपाय म्हणून गुरुदेवांनी सर्व स्तरांवर त्वरित उपाययोजना आखली. साधकांना त्यांनी मानसोपचार, नामजपादी उपाय, स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, तसेच भावजागृतीचे प्रयत्न या सर्वांमध्ये वाढ करण्यास सांगितले.
३ इ. साधकांना आध्यात्मिक त्रासांवरील उपाययोजना सांगून भावजागृतीसाठी प्रयत्न करायला सांगणे : सर्व साधकांच्या साधनेतील वाईट शक्तींचा अडथळा दूर व्हावा, यासाठी गुरुदेव ठिकठिकाणी जाऊन साधकांसाठी नामजपादी उपाय करत असत. त्या वेळी अत्याधिक त्रास असलेल्या साधकांना ते पुढील उपायांसाठी आश्रमात बोलावून घेत असत. त्यांच्यासाठी नामजपादी उपाय करून त्रासावर मात करण्यास सांगत आणि सक्षम करून घरी पाठवत असत. तसेच या व्यतिरिक्त सूक्ष्मातील कळणार्या साधकांनाही याविषयी जागृती करण्यास आणि भावजागृतीचे विविध पैलू शिकवण्यासाठी पाठवत असत. अशा प्रकारे ते सर्व साधकांना स्वयंपूर्ण बनवण्याचे सतत प्रयत्न करत असत.
३ ई. संशोधनाची व्याप्ती वाढल्यावर प्रत्येक केंद्रात नामजपादी उपाय करणारा साधक आणि समन्वयक सिद्ध करणे : साधकांनी विविध उपाय चालू केल्यावर वाईट शक्तींनी साधकांना त्रास देण्याचे प्रमाण वाढले. हळूहळू साधकांचे त्रास वाढू लागल्यावर गुरुदेवांनी प्रत्येक केंद्रात नामजपादी उपाय करणारा साधक, लिखाण-समन्वयक इत्यादी सेवा सांभाळणारे साधक प्रशिक्षित करण्यास आरंभ केला. असे क्षमता असलेले साधक फोंडा येथे आश्रमात येऊन सर्व शिकून आपापल्या ठिकाणी जाऊन ही सेवा करत असत.
३ उ. पुढच्या टप्प्याच्या आध्यात्मिक त्रासांवर उपाय करण्यासाठी गुरुदेवांनी मिरज येथे अनेक मास नामजपादी उपायांच्या सत्रांचे आयोजन करणे : साधकांना पुढील टप्प्याच्या वाईट शक्ती त्रास देऊ लागल्यावर गुरुदेवांनीही या सूक्ष्म युद्धातील पुढील टप्प्याचे नामजपादी उपाय चालू केले. ते काही मास सनातन आश्रम, मिरज येथे वास्तव्यास होते. तेथे त्यांनी सर्व तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना बोलावून घेतले, तसेच उपाय करणारे आणि सूक्ष्म परीक्षण करणारे, असे सर्व साधक एकत्रितपणे अहोरात्र सेवा करत होते. गुरुदेव पूर्ण रात्र वाईट शक्तींचा त्रास असलेल्या साधकांसाठी नामजपादी उपाय करत असत. गुरुदेवांना खाली बसण्यास त्रास व्हायचा, तरीही कित्येक घंटे ते साधकांसाठी अखंड नामजप करत असत.
३ ऊ. गुरुदेवांनी संशोधन करून त्याचा यंत्रांद्वारे अभ्यास करून त्याविषयी शास्त्रोक्त पद्धतीने सांगणे : वाईट शक्तींच्या या संशोधनात गुरुदेवांनी सर्व स्तरांवर अभ्यास करून विविध सूत्रे शास्त्र म्हणून स्थापित केली. एखाद्या साधकाला झालेला त्रास, त्यावर त्याची मुलाखत, सूक्ष्म परीक्षण, सूक्ष्म चित्र, उपाय करणार्या साधकाच्या अनुभूती, यंत्राद्वारे काढलेला आलेख, अशा प्रकारे गुरुदेवांनी आजच्या विज्ञानयुगात शास्त्रोक्त आणि सर्वांगानी पूर्ण असे संशोधन केले.
४. कृतज्ञता
‘हे गुरुराया, आपण केलेले एकमेवाद्वितीय संशोधन अखिल मानवजातीला कल्याणकारी आहे, याची अनुभूती मला घेता आली. मला या सेवेत सहभागी होता आले. त्याबद्दल मी अनंत कोटी कृतज्ञ आहे.’
– सौ. मंगला मराठे, खडपाबांध, फोंडा, गोवा (२१.११.२०२१)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |