आषाढी एकादशीला पंढरपूर मंदिरात लोकप्रतिनिधींसाठीचे ‘व्ही.आय्.पी.’ दर्शन बंद !

शासकीय महापूजेच्या वेळीही भाविकांना श्री विठ्ठलाचे मुखदर्शन घेता येणार !

मुंबई – आषाढी एकादशीला पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजेच्या वेळी प्रतिवर्षी भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येते. यंदाच्या वर्षी मात्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा चालू असतांनाही श्री विठ्ठलाचे मुखदर्शन चालू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला. यासह मंत्री, खासदार, आमदार, तसेच अन्य लोकप्रतिनिधी यांना ‘अतीमहनीय व्यक्ती’ (व्ही.आय्.पी.) म्हणून देण्यात येणारे दर्शन बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही शासनाने घेतला आहे. यामुळे दर्शनासाठी घंटोंन्घंटे रांगेत उभ्या असलेल्या भाविकांचा वेळ वाचेल, तसेच त्यांना श्री विठ्ठलाचे दर्शन लवकर मिळेल.

२९ जूनला असलेल्या आषाढी एकादशीच्या दिवशी उत्तररात्री अडीच ते पहाटे ५ या कालावधीत शासकीय करण्यात येते महापूजा होते. तेव्हा दर्शन बंद ठेवल्यामुळे भाविकांची मोठी असुविधा होत होती. ती आता टळणार आहे. शासनाच्या निर्णयानुसार शासकीय महापूजेनंतर मानाच्या दिंड्यांच्या व्यतिरिक्त कुणालाही ‘अतीमहनीय व्यक्ती’ म्हणून दर्शन घेता येणार नाही. अतीमहनीय व्यक्तींच्या प्रवेशाची सर्व व्यवस्था पोलीस पहाणार आहेत. त्यामध्ये मंदिर प्रशासनालाही हस्तक्षेप करता येणार नाही. समस्त वारकर्‍यांकडून शासनाच्या या निर्णयांचे स्वागत करण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

‘अतीमहनीय असणे’ हा देवाच्या दर्शनासाठीचा निकष नको, तर ‘भक्त असणे’, हा निकष हवा !