महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत १ सहस्र ९०० रोगांवर उपचार होणार !

मुंबई – ‘महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत १ सहस्र ९०० रोगांवर उपचार करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला. त्यासाठी केंद्रशासनाची ‘आयुष्यमान भारत आरोग्य’ योजना आणि महाराष्ट्र शासनाची ‘महात्मा फुले आरोग्य’ योजना या दोन्ही योजना एकत्रित करण्यात आल्या आहेत. यासह उपचारांच्या खर्चाची मर्यादा दीड लाख रुपयांवरून ५ लाख रुपये इतकी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही राज्यशासनाने घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस्. गोपालकृष्णन् आणि उपसंचालक रोहित झा यांच्यासमवेत राज्याच्या आरोग्य विभागाची बैठक झाली. या बैठकीमध्ये याविषयी अंतिम निर्णय घेण्यात आला. याविषयी अधिक माहिती देतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘या एकत्रित आरोग्य योजनेच्या एक कोटी आरोग्यकार्डाचे वाटप ऑगस्टपर्यंत, तर १० कोटी आरोग्यकार्डचे वाटप पुढील ६ मासांत केले जाणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाची योजना एकत्रित केल्याने केंद्रशासनाचा मोठा निधी राज्याला मिळेल आणि राज्य सरकारचा आर्थिकभारही न्यून होईल.’’

औषध खरेदीसाठी महामंडळाची स्थापना होणार !

शासनाच्या विविध विभागांकडून औषधांची खरेदी वेगवेगळ्या दराने केली जाते. यामध्ये वेळ आणि पैसा यांचा अपव्ययही होतो. हे टाळण्यासाठी औषधांच्या खरेदीसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. यावर लवकरच कार्यवाही होण्याची शक्यता आहे.