समर्थ रामदासस्वामींनी दासबोधात केलेले सद़्गुरुस्तवन आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्यातून उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
गुरुस्तवन पुष्पांजली
गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष सदर !
‘३.७.२०२३ या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुभक्त साधकांसाठी कृतज्ञतेचे आनंददायी पर्व ! गुरुपौर्णिमा जवळ येऊ लागली की, साधकांच्या अंतरातील गुरूंप्रतीचा कृतज्ञताभाव जागृत होऊ लागतो. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साधकांच्या नेत्रांतील कृतज्ञतामय अश्रूंची फुले गुरुचरणांवर भक्तीअभिषेक घालण्याची प्रतीक्षा करत असतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या रूपात लाभलेल्या अवतारी गुरूंची गुरुपौर्णिमा साजरी करणे, म्हणजे परब्रह्मस्वरूप भगवंताशी अद्वैत असलेल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणे होय !
राष्ट्रपुरुष समर्थ रामदासस्वामी यांनी ग्रंथराज दासबोधाच्या पहिल्या दशकामध्ये सद़्गुरुस्तवन केले आहे. महान गुरूंना उपमा देण्यायोग्य कोणतीही गोष्ट किंवा वस्तू या नश्वर जगतात नाही. यासंबंधी विश्लेषण करत त्यांनी अत्यंत सुंदर शब्दांत गुरूंची महती वर्णिली आहे.
या दिव्य पर्वात साधकांचा श्री गुरूंप्रती असलेला कृतज्ञताभाव आणखी जागृत होण्यासाठी एक अनुपमेय संधी लाभत आहे. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ‘गुरुस्तवन पुष्पांजली’ हे विशेष सदर २५.६.२०२३ पासून ‘दैनिक सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध करत आहोत. या सदरातून ‘समर्थ रामदासस्वामी यांनी आपल्या अलौकिक शब्दसामर्थ्याने दासबोधात केलेले सद़्गुरुस्तवन आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्यातून उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !’ आपल्याला अवगत होणार आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या गुरुभक्तीपूर्ण शब्दांमुळे साधकांमधील गुरूंप्रतीचा कृतज्ञताभाव वृद्धींगत होण्यास साहाय्य होईल.
सांप्रत काळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासारखे अवतारी गुरु या भूतलावर कार्यरत आहेत. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या काळात गुरुतत्त्वासहित गुरुदेवांमधील अवतारी तत्त्वाची स्पंदनेही पृथ्वीतलावर अधिकाधिक प्रमाणात कार्यरत होत आहेत. साधकांनो, हे गुरुतत्त्व अन् अवतारीतत्त्व ग्रहण करण्यासाठी आपला शरणागतभाव वाढवूया ! अत्यंत कृतज्ञताभावाने हे बोधामृत आचरणात आणून त्यातील भक्तीमधुर रस चाखूया आणि गुरुपौर्णिमेचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेऊया !