गोरक्षकांमुळे वैराग (सोलापूर) येथे ४३ गोवंशियांना कत्तलीपासून जीवदान !
वैराग (जिल्हा सोलापूर) – गोरक्षा दल महाराष्ट्राचे पुणे संयोजक ऋषि कामथे यांना २१ जून या दिवशी माहिती मिळाली की, वैराग येथून काही गाड्यांमधून जनावरे धाराशिवकडे कत्तलीसाठी जाणार आहेत. त्यानुसार त्यांनी अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर भाऊ बहिरवाडे यांच्याशी संपर्क केला. अखिल भारत कृषी गोसेवा संघ आणि गोरक्षा दलाने वैराग येथे जाऊन पोलिसांच्या साहाय्याने सापळा रचला. त्यामध्ये पहिली गाडी सुधीर भाऊ बहिरवाडे यांनी पकडली, त्यात ३८ लहान जर्सी वासरे मिळाली. दुसर्या ठिकाणी मोहोळ रस्त्यावर ऋषि कामथे यांना ५ जर्सी गायी एका गाडीत कोंबून कत्तलीसाठी घेऊन जातांना आढळून आल्या. तेथे बजरंग दल वैरागचे सहकारी उपस्थित होते. लगेच ती गाडी वैराग पोलीस ठाण्यात नेण्यात आली. त्या वेळी पोलीस ठाण्यामध्ये ५० ते ६० कसाई उपस्थित झाले. तेथील हिंदूंनी आपली एकी दाखवल्यामुळे कसाई निघून गेले. वैरागच्या बुधवारच्या बाजारातून कसायांनी जनावरे खरेदी केलीच नाही, हे सगळे हिंदूऐक्यामुळे शक्य झाले. (प्रसंगावधान राखून हिंदूऐक्य दाखवणार्या हिंदूंचे अभिनंदन ! – संपादक)
सगळा गोवंश अहिंसा गोशाळेत उतरवण्यात आला. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनय बहिर, तसेच सुधीर भाऊ बहिरवाडे, हृषिकेश कामथे, अक्षय कांचन, राहुल कदम, अखिल भारत कृषी गोसेवा संघ सोलापूरचे शहर संघटक प्रसाद झेंडगे, अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे धाराशिव प्रमुख रोहित बागल, तुळजापूरचे गोरक्षक अर्जुन देशमुख आदींचे सहकार्य लाभले.