शिवणी (जिल्हा नांदेड) येथे गोरक्षकांवरील आक्रमणाचा संगमनेर येथील हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !
शासनाकडून वैद्यकीय आणि आर्थिक साहाय्याची मागणी करणारे निवेदन उपविभागीय अधिकार्यांना सादर !
पुणे – नांदेड जिल्ह्यातील शिवणी येथे धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात एका गोरक्षकाचा मृत्यू झाला, तसेच अन्य गोरक्षक गंभीर घायाळ झाले. याचा निषेध संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) येथील हिंदुत्वनिष्ठांनी करून उपविभागीय अधिकारी, संगमनेर यांना बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करून जलदगती न्यायालयापुढे खटला चालवून कठोर कारवाई करण्यात यावी. मृत गोरक्षकाच्या परिवारास शासनाच्या वतीने १० लाख रुपयांचे साहाय्य करण्यात यावे, तसेच गंभीर घायाळ असलेल्या गोरक्षकांना वैद्यकीय साहाय्यासाठी शासनाकडून आर्थिक साहाय्य मिळावे. नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांतून तेलंगाणामध्ये प्रतिदिन होणारी गोवंशाची तस्करी थांबावी, यासाठी तेलंगाणा राज्याला लागून असणार्या ‘चेक पोस्ट’वर विशेष पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा. अशा विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी, संगमनेर यांच्या माध्यमातून देण्यात आले.
या वेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री विशाल वाकचौरे आणि गोपाल राठी, विहिंप धर्मप्रसार जिल्हाप्रमुख प्रशांत बेल्हेकर, बजरंग दलाचे विभाग संयोजक सचिन कानकाटे, प्रखंड संयोजक कुलदीप ठाकूर, शहर संयोजक शुभम कपिले, ओंकार भालेराव, अनिकेत पवार, दीपक मेहत्रे, मनसे शहराध्यक्ष तुषार ठाकूर, भाजप संघटन सरचिटणीस किशोर गुप्ता, भाजप युवा मोर्चा दिपेश ताटकर, शहर उपाध्यक्ष प्रकाश दिघे, शहर उपाध्यक्ष रोशन कोथमिरे, भाजप तालुका उपाध्यक्ष महेश मांडेकर आदी उपस्थित होते.