झाले बहु । होतील बहु । परि यासम हा ।
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ‘झाले बहु । होतील बहु । परि यासम हा ।’ ही काव्यपंक्ती उचित ठरते. भारतात आजवर १७ पंतप्रधान होऊन गेले; परंतु एका तरी नावाचा जयघोष केला गेल्याचे आपण कधी पाहिले वा ऐकले आहे का ? नाही ना ! याउलट ‘मोदी’ हे नाव केवळ भारतातच नव्हे, तर सातासमुद्रापारही तितक्याच आवेशाने, उत्साहाने आणि अभिमानाने घेतले जाते. ‘मोदी’ नावाचा डंका आज सर्वत्र पिटला जात आहे. मोदींसारखे पंतप्रधान भारताला लाभले, हे देशाचे महद़्भाग्यच ! विश्वपटलावर त्यांनी स्वतःचे एक अत्युच्च स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे अवघे विश्व ‘मोदी’ हे नाव ऐकताच भारावून जाते. अमेरिकेतील दैनिक ‘न्यूयॉर्क टाइम्स’नेही त्यांच्या या प्रसिद्धीची नोंद घेऊन नरेंद्र मोदी हे ‘सर्वांत लोकप्रिय नेते’ असल्याचे म्हटले आहे. भारताच्या पंतप्रधानांविषयीचे हे गौरवोद़्गार ऐकताच प्रत्येकच भारतियाची छाती अभिमानाने फुलली असणार, हे निश्चित !
ज्या अमेरिकेने मोदींच्या दौर्यासाठी यंदाच्या वर्षी स्वागताच्या पायघड्या घातल्या, त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली, त्याच अमेरिकेने वर्ष २००२ मध्ये गोध्रा हत्याकांड झाल्यावर मोदींना अप्रत्यक्षरित्या आरोपी मानले होते. त्या दंगलीत मोदींचा संबंध असल्याचा आरोप करत त्यांच्यावर अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती. ‘त्यांच्या व्हिसावर बंदी कायम ठेवावी’, असा अहवालही त्या वेळी सादर करण्यात आला होता. अमेरिकेचे हे कृत्य विसरून चालणार नाही, तसेच ज्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने मोदींचे गुणगान गायले आहे, त्याचाही आतापर्यंतचा भारतद्वेष लक्षात घेऊन या कौतुक सोहळ्यात भारतियांनी वहावत जाऊ नये. मोदींचे कौतुक करणार्या अमेरिकेच्या गळ्यात गळे न घालता भारताने राष्ट्रवादी भूमिका लक्षात ठेवून वर्तन करणे श्रेयस्कर ठरेल ! अन्यथा अमेरिका याचा कधी अपलाभ घेईल, ते भारतियांना लक्षातही येणार नाही.
प्रखर राष्ट्रवादी मानसिकता !
नरेंद्र मोदी राष्ट्रोद्धारासाठी घेत असलेेली अथक मेहनत, विकासासाठीची ध्येय-धोरणे, तसेच दिशा, निसर्गानुकूल निर्णय, योगाचा अवलंब, सर्वसामान्य नागरिकांपासून सर्वच स्तरांवरील लोकांसाठी देण्यात येणार्या सोयीसुविधा अशा अनेक घटकांमुळे त्यांनी आज प्रत्येकाच्या मनात आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय घेणारे पंतप्रधान अशीही मोदींची ओळख आहे. प्रत्येक क्षेत्रात रणनीती आखून त्यांचा अवलंब करणे हे मोदींचे वैशिष्ट्य आहे. त्यासाठी गाढा अभ्यास, प्रभावी वक्तृत्व, तसेच सहज संवेदनशील व्यवहार यांमुळे ते आपली ध्येय-धोरणे राबवण्यात यशस्वी ठरत आहेत. परराष्ट्र धोरण राबवतांनाही त्या त्या राष्ट्रांच्या संदर्भात भारताला येणार्या समस्यांच्या दृष्टीनेही मोदी चर्चा करतात, उदा. चीन, पाकिस्तान यांच्या नेत्यांच्या भेटीच्या वेळी मोदींनी आतंकवादाच्या पार्श्वभूमीवर त्यांना खडे बोल सुनावले होते. संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातूनही भारत वेळोवेळी चीन आणि पाकिस्तान यांच्या आतंकवादी मानसिकतेला विरोध करत असतो. स्वित्झर्लंड दौर्याच्या वेळी मोदींनी तेथील स्वीस बँक, भारतियांकडून केली जाणारी करचुकवेगिरी यांविषयीही संबंधितांशी चर्चा केली होती. व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत अल्पसंख्यांक मुसलमानांशी संबंधित एका पत्रकाराच्या प्रश्नाला सडेतोड उत्तर देतांना मोदी म्हणाले, ‘‘लोकशाही आमच्या ‘डी.एन्.ए.’मध्ये आहे. ती आमच्या आत्म्यात आहे आणि आम्ही ती जगतो. त्यामुळे जात, पंथ किंवा धर्म यांच्या आधारावर भेदभाव करण्याचा प्रश्नच येत नाही.’’ मोदींची ही राष्ट्रवादी मानसिकता परराष्ट्र संबंधांना आणखी बळ देत आहे. याच जोडीला दुसरीकडे मोदी आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध करार संमत करून व्यापारवृद्धीचे लक्ष्यही साध्य करून घेतात. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर कामे करून त्यात यश मिळवण्याची हातोटी केवळ मोदींनाच अवगत आहे. त्यामुळेच भारत आज यशाची शिखरे पादाक्रांत करत आहे. जगही आशेने भारताकडे पहात आहे. योगदिनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी अमेरिकेत असतांना संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली योग सोहळा पार पडला. त्याला १९० देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जो योग भारतापासून चालू झाला, त्या भारतासाठी हा क्षण म्हणजे ‘विश्वगुरु’ होण्याचा प्रारंभच नव्हे का ?
नव्या पर्वाला आरंभ !
भारतीय नागरिकांच्या मनात मोदींनी स्थान निर्माण केले, त्यामागेही त्यांचे कष्टच आहेत. असे कोणतेही क्षेत्र नाही की, जेथील नागरिकांशी त्यांनी आजवर संवाद साधलेला नाही. शेतकरी असो, कामगार असो, विद्यार्थी असो, परिचारिका किंवा सैनिक असोत, अशा प्रत्येकाशी त्यांनी सहज संवाद साधून त्यांच्याशी आपली नाळ जोडली आहे. त्यामुळे त्यांचे बोलणे प्रत्येकाच्या मनाला भिडते आणि म्हणूनच प्रत्येक जण त्यांना दादही देतो. वर्ष २०१६ मध्ये अमेरिकेत मोदींनी केलेल्या ४५ मिनिटांच्या भाषणांत त्यांना ६९ वेळा टाळ्यांची दाद मिळाली होती, हे त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल. अमेरिकेतील व्हाईट हाऊसचे दरवाजे प्रथमच भारतियांसाठी उघडण्यात आल्यावरही मोदींनी ‘हा १४० कोटी भारतियांचा सन्मान आहे’, असे विधान केले. खरेतर एखादा पंतप्रधान या घटनेचे श्रेय स्वतःकडे घेऊन मोकळाही झाला असता; पण मोदी हे त्यातील नव्हेत. ‘आजचे युवक ही देशाची शक्ती आहे’, असे मोदी म्हणतात. याच्या जोरावर आणि स्वतःच्या कुशल नेतृत्वाखाली मोदींनी आज भारताला जगातील ५ व्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत आणले आहे. भारताच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवला जातो, याचे सर्वस्वी श्रेय मोदींनाच जाते. नरेंद्र मोदी हे केवळ भारताचे नव्हे, तर जगाचेच नेतृत्व करत आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारतासाठी नव्या पर्वाचा प्रारंभ झालेला आहे. हे नवे पर्व देशासाठी नवा टप्पा गाठणारे आणि विकसित देशांच्या सूचीत नाव मिळवणारे ठरो, अशी प्रत्येक भारतियाची अपेक्षा आहे.
अमेरिका आणि ‘न्यूयॉर्क टाइम्स’ यांच्या कौतुकोद़्गारांत वहावत न जाता भारताने राष्ट्रवादी भूमिकेवर ठाम रहावे ! |