प्रयाग येथील बुद्धेश्‍वर पिठाधीश्‍वर योगी श्री. राजकुमार महाराज यांनी सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्‍याविषयी ‘तुमचा योग पूर्ण झाला असून तुमची वाणी औषधी होऊ शकते’, असे गौरवोद़्‍गार काढणे

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

१. वाराणसी येथील हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या वेळी संतांनी सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्‍याविषयी काढलेले गौरवोद़्‍गार !

‘१२ आणि १३.११.२०२२ या दिवशी वाराणसी येथे हिंदु राष्‍ट्र अधिवेशन होते. या अधिवेशनात प्रयाग येथील बुद्धेश्‍वर पिठाधीश्‍वर आणि संत समाज उत्‍थान समितीचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष योगी श्री. राजकुमार महाराज उपस्‍थित होते. ते सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना म्‍हणाले, ‘‘तुमचा योग पूर्ण झाला आहे. तुमची वाणी औषधी होऊ शकते. एखाद्या प्रसंगालाही सकारात्‍मक करून सामावून घेऊ शकते.’’ त्‍या वेळी मी तेथेच होतो. त्‍यांचे बोलणे ऐकून माझी भावजागृती झाली.

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

२. सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची वाणी औषधी आणि सकारात्‍मक असल्‍याची प्रचीती येणे अन् भावजागृती होणे

अधिवेशन संपल्‍याच्‍या दुसर्‍या दिवशी अधिवेशनात सहभागी झालेल्‍या अमेरिकेतील महंत मां राजलक्ष्मी वाराणसी आश्रमात सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना भेटायला आल्‍या होत्‍या. त्‍यांनी आश्रमातील श्रीरामाच्‍या मूर्तीकडे पाहून विचारले, ‘‘सीताजी कुठे आहेत ?’’ प्रत्‍यक्षात आश्रमात श्रीराम, श्री गणेश आणि श्री हनुमान यांच्‍या मूर्ती आहेत; मात्र सीतेची मूर्ती नाही. त्‍या वेळी सद़्‍गुरु पिंगळेकाकांनी सांगितले, ‘‘सीताजी श्रीरामाच्‍या हृदयात आहेत. आम्‍ही सर्व जण असाच भाव ठेवतो.’’ सद़्‍गुरु पिंगळेकाकांचे बोलणे ऐकून महंत मां राजलक्ष्मी प्रसन्‍न झाल्‍या. सद़्‍गुरु पिंगळेकाकांचे बोलणे ऐकून माझी भावजागृती झाली. त्‍यांच्‍या बोलण्‍यातून ‘वाणी औषधी असते अन् एखाद्या प्रसंगाला आपली वाणी सकारात्‍मक, तसेच भावस्‍पर्शी कशी बनवू शकते ?’, हे मला शिकायला मिळाले.’

– (सद़्‍गुरु) नीलेश सिंगबाळ, वाराणसी (९.१.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक