दिंड्यांसाठी ६५ एकरमधील प्लॉटची जागा निश्चित करण्यासाठी भाविकांचे निवेदन !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – दिंड्यांसाठी येथील ६५ एकर मधील प्लॉट कायमस्वरूपी निश्चित करण्यात यावेत, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना दिले. आषाढी वारीच्या निमित्ताने आयोजित बैठकीसाठी मंत्री तानाजी सावंत पंढरपूर येथे आले होते. या वेळी सुधाकर इंगळे महाराज यांनी मंत्री सावंत यांची भेट घेऊन ६५ एकरविषयी चर्चा केली.
वर्षभरात चार वार्यांसाठी वारकरी भाविक ६५ एकरमधील प्लॉट घेऊन ३ ते ५ दिवस नित्यनेम करण्यासाठी मुक्कामी रहातात; मात्र ६५ एकरमधील प्लॉट घेण्यासाठी पुष्कळ समस्यांना सामोरे जावे लागते. प्रत्येक वारीला प्लॉट घेण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागतो. प्रत्येक वारीला वेगवेगळा प्लॉट देण्यात येत असल्याने मागून येणार्या भविकांना मंडप सापडणे कठीण होते. त्यामुळे ६५ एकरमधील प्लॉट हा त्या त्या दिंडीला निश्चित करण्यात येऊन नोंदणी अर्ज एकदाच घेऊन त्यांची कायमस्वरूपी नोंद करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.