तरवडी (अहिल्यानगर) येथे धर्मांधांकडून पत्रकाराच्या घरात घुसून कुटुंबावर आक्रमण !
बजरंग दलाच्या वतीने कडक कारवाईची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
अहिल्यानगर – तरवडी (तालुका नेवासा) येथे बहिरोबा देवस्थानमध्ये काही मुसलमान मुले मुद्दाम येऊन बसतात आणि वारंवार विद्युत् पुरवठा चालू-बंद करतात. याविषयी शेजारी रहाणारे श्री. चंद्रशेखर भागवत आणि त्यांची पत्नी सौ. लीला भागवत यांनी विचारणा केली असता अफसर नजीर पठाण अन् नजीर चाँदखा पठाण यांनी त्यांना लोखंडी गज, तसेच धारदार हत्याराने मारहाण करून सौ. लीला भागवत यांचा विनयभंग केला. श्री. चंद्रशेखर भागवत यांचे भाऊ आणि ‘लोकदवंडी न्यूज चॅनेल’चे संपादक विकास भागवत तेथे आले असता त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत श्री. चंद्रशेखर भागवत हे गंभीररित्या घायाळ झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार चालू आहेत.
नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथील सय्यद बाबा दर्गा खोदकामात हिंदु मंदिराचे अवशेष सापडले. याविषयीचे वृत्त विकास भागवत यांनी त्यांच्या ‘लोकदवंडी न्यूज चॅनल’वर ६ जून रोजी प्रसारित केले. दर्ग्याची पोलखोल केल्याचा राग मनात ठेवून पूर्वनियोजितपणे हे आक्रमण केल्याचा संशय आहे. दरम्यान या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून नजीर चाँदखा पठाण याला अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपी फरार आहेत. या घटनेनंतर भागवत कुटुंबास जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भागवत यांच्या कुटुंबाला संरक्षण द्यावे, तातडीने इतर आरोपींना अटक करावी, तसेच दोषींना कडक शिक्षा करावी, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयात २४ जुलै २०२३ या दिवशी ठिय्या आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी बजरंग दलाच्या वतीने उपविभागीय अधिकारी, संगमनेर यांना निवेदनाद्वारे देण्यात आली.
हिंदु मंदिरात मुसलमान मुलांनी बसण्याचे कारण काय ? असा प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला असून ‘ही मुले मंदिराचे पावित्र्य भंग करण्याचे उद्योग करतात. वारंवार दिवे चालू-बंद करून शेजार्यांना त्रास देणे, या ठिकाणी येणार्या-जाणार्या महिलांची छेडछाड करणे, मंदिर परिसरात मलमूत्र आणि कचरा टाकणे असे प्रकार केले जात आहेत’, याकडेही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. पत्रकाराच्या कुटुंबाला मारहाण करून पत्रकाराविरुद्ध महिलेला पुढे करून एक खोटी तक्रार प्रविष्ट करण्यात आली असून संबंधित महिला घटनास्थळी नव्हती. त्याचीही चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या वेळी विश्व हिंदु परिषदेचे (विहिंपचे) जिल्हा सहमंत्री विशाल वाकचौरे आणि गोपाल राठी, विहिंपचे धर्म प्रसारचे जिल्हा प्रमुख प्रशांत बेल्हेकर, बजरंग दलाचे विभाग संयोजक सचिन कानकाटे, प्रखंड संयोजक कुलदीप ठाकूर, शहर संयोजक शुभम कपिले, आेंकार भालेराव, अनिकेत पवार, दीपक मेहत्रे, मनसेचे शहराध्यक्ष तुषार ठाकूर, भाजपचे संघटन सरचिटणीस किशोर गुप्ता, भाजप युवा मोर्चाचे दीपेश ताटकर, शहर उपाध्यक्ष प्रकाश दिघे, शहर उपाध्यक्ष रोशन कोथमिरे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष महेश मांडेकर आदी उपस्थित होते.
संपादकीय भूमिका
|