‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये अडचणी येऊ नयेत, यासाठी महोत्सवाच्या आधीच आरंभ केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय आणि त्यांची मिळालेली फलनिष्पत्ती
१. हिंदुत्वनिष्ठांचे आश्रमदर्शन आणि सत्संग निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी केलेला जप
या जपामुळे १५ ते २२ जूनपर्यंत हे दोन्ही सुनियोजित वेळी आणि ठरल्याप्रमाणे निर्विघ्नपणे पार पडले. हिंदुत्वनिष्ठांना आश्रमदर्शन घडवणारे साधक, आश्रमदर्शनाच्या वेळी त्यांची छायाचित्रे काढणारे साधक, तसेच हिंदुत्वनिष्ठांच्या सत्संगांचे नियोजन करणारे साधक यांनाही कोणतीही अडचण आली नाही.
२. वक्त्यांच्या भाषणांमुळे कोणत्याही अडचणी येऊ नये, यासाठी केलेला जप
कधी कधी वक्ते बोलण्याच्या ओघामध्ये आक्रमक असे वक्तव्य करतात. हे न होण्यासाठी जप केल्यामुळे तशी कोणतीही अडचण आली नाही.
३. ‘ महोत्सवा’च्या कालावधीत निसर्गाची कृपा होऊन तो अनुकूल असावा, यासाठी केलेला जप
१६ ते २२ जून २०२३ या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या कालावधीत सर्व साधकांनी निसर्ग आणि वरुणदेव यांची कृपा अनुभवली. या कालावधीत रात्री पाऊस पडत होता. त्यामुळे दिवसा वातावरणात फारसा उकाडा जाणवत नव्हता. तसेच दिवसा अगदी तुरळक पाऊस पडत होता. त्यामुळे अधिवेशनाला येणारे संत, हिंदुत्वनिष्ठ आणि साधक यांना यायला-जायला कोणतीही अडचण आली नाही.
४. संत आणि साधक वक्ते यांनी महोत्सवामध्ये मांडलेले विषय आध्यात्मिकदृष्ट्या परिणामकारक व्हावेत आणि त्या विषयांचे सर्वांना सहजतेने आकलन व्हावे, यासाठी केलेला जप
वक्त्यांनी मांडलेले विषय सर्वांना हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी उत्साहवर्धक आणि परिणामकारक होतांना जाणवले. सभागृहातील वातावरणावरून ते जाणवत होते. तेथील वातावरणात मरगळ किंवा त्रासदायक स्पंदने जाणवत नव्हती.
५. या महोत्सवात सहभागी असलेले संत, साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण व्हावे, यासाठी केलेला जप
१६ ते २२ जून २०२३ या महोत्सवाच्या कालावधीत हिंदु जनजागृती समितीचे संत आणि कार्यकर्ते यांनी भाषणे केली; पण २ संत सोडल्यास भाषण करतांना अन्य कुणाला काहीही त्रास जाणवला नाही. या २ जणांपैकी एका संतांचा आवाज घोगरा येत होता. त्यामुळे त्यांचे भाषण चालू असतांना त्यांच्यासाठी नामजप करावा लागला. दुसर्या संतांना भाषण करण्यापूर्वी चेहर्यावर दाब जाणवत होता. त्यामुळे त्यांच्यावर आधीच उपाय केल्यामुळे भाषण करतांना त्यांना कोणताही त्रास झाला नाही. हिंदुत्वनिष्ठांना कोणताही त्रास होतांना जाणवत नव्हता.
६. महोत्सवामध्ये विद्युत् यंत्रणा, ध्वनीयंत्रणा, चित्रीकरण यंत्रणा, दृकश्राव्य यंत्रणा आणि प्रसार यंत्रणा अन् त्यांची सर्व उपकरणे यांमध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत आणि त्यांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण व्हावे, यासाठी केलेला जप
हे अडथळे न येण्यासाठी जप शोधल्यावर ‘ॐ’ हा सर्वोच्च जप करण्यासाठी मिळाला होता. (शून्य, महाशून्य, निर्गुण आणि ॐ या क्रमामध्ये जप अधिकाधिक उच्च स्तराचे, म्हणजे अधिकाधिक परिणामकारक होत जातात. त्यांमध्ये ‘ॐ’ हा नामजप सर्वोच्च आहे.) ‘मिळालेल्या ‘ॐ’ या सर्वोच्च जपावरून हे अडथळे किती अधिक होते’, हे लक्षात येते. महोत्सवाला आरंभ होण्याच्या २ दिवस आधीपासूनच हा जप करणे चालू केले. त्यामुळे कोणतेही अडथळे आले नाहीत. विद्युत् यंत्रणा किंवा ध्वनीयंत्रणा बंद पडली, तर ती यंत्रणा पूर्ववत् होईपर्यंत महोत्सवातील वक्त्यांची भाषणे थांबवावी लागतात आणि त्यामुळे वेळ वाया जातो; पण या वेळी तसे काहीही झाले नाही. तसेच मागील वर्षी झालेल्या या अधिवेशनात यू ट्यूब, फेसबुक इत्यादींद्वारे करण्यात येणार्या प्रसार यंत्रणेमध्ये पुष्कळ वेळा अडथळे आले होते; पण यावर्षी मात्र देवाच्या कृपेने असे कोणतेही अडथळे आले नाहीत. हीच नामजप करण्याची फलनिष्पत्ती होती !
७. महोत्सवाची ईश्वराला अपेक्षित अशी फलनिष्पत्ती लाभावी आणि त्या कार्यक्रमातून अपेक्षित अशी स्पंदने प्रक्षेपित व्हावीत, यासाठी केलेला जप
या महोत्सवाची फलनिष्पत्ती आता पुढील वर्षीच्या महोत्सवापर्यंत वर्षभरात हिंदुत्वासाठीचे कार्य कसे जोमाने वाढेल, यावरून दिसून येईल. आपण साधनेद्वारे हिंदुत्वासाठीचे कार्य केले आणि ते पूर्ण तळमळीने, तसेच निरपेक्षपणे केले, तर त्याची फलनिष्पत्ती ईश्वर देणारच आहे, अशी साधकांची श्रद्धा आहे ! तसे होवो, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना आहे !
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ योग्य रितीने आणि निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी गुरुकृपेनेच नामजपांचे उपाय शोधून ते करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनीच हे नामजप आमच्याकडून करवून घेतले. या नामजपांमुळे तशी फलनिष्पत्तीही मिळाली, यासाठी आम्ही सर्व साधक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत !’
– (सद़्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२२.६.२०२३)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |