‘काळा’चे उपप्रकार : ‘पूर्णकाळ’ आणि ‘रीतीकाळ’
सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !
‘संस्कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या संस्कृतोद़्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच राहिला. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत.
१६ जूनच्या लेखात आपण ‘काळ’ म्हणजे काय ? त्याचे ३ प्रमुख प्रकार आणि ‘अपूर्णकाळ’ हा उपप्रकार’, यांविषयी जाणून घेतले. आजच्या लेखात ‘काळा’च्या ‘पूर्णकाळ’ आणि ‘रीतीकाळ’ या उपप्रकारांची माहिती घेऊ.
(लेखांक १९ – भाग २)
भाग १ : https://sanatanprabhat.org/marathi/692557.html
३. काळाचे उपप्रकार
३ आ. पूर्णकाळ : हा समजून घेण्यासाठी प्रथम पुढील वाक्ये आणि त्यांचे विवरण पहाणे योग्य होईल.
३ आ १. ‘पंकजने सूर्यनमस्कार घातले आहेत.’ – या वाक्यात ‘घाल’ या धातूचे ‘घातले’ हे रूप वापरण्यात आले आहे. हे रूप ‘घालण्याची कृती पूर्ण झाल्याचे’ दर्शवते. यावरून ‘पंकजची सूर्यनमस्कार घालण्याची कृती पूर्ण झाली आहे’, हे वाचणार्याच्या लक्षात येते. त्याचसह वाक्याच्या शेवटी ‘अस’ या धातूचे ‘आहेत’ हे वर्तमानकाळ दर्शवणारे रूप वापरण्यात आले आहे. त्यामुळे पंकजची सूर्यनमस्कार घालण्याची कृती जरी पूर्ण झाली असली, तरी ‘आहेत’ या क्रियापदामुळे हे वाक्य वर्तमानकाळी झाले आहे.
३ आ २. ‘पंकजने सूर्यनमस्कार घातले होते.’ – या वाक्यातही पंकजची सूर्यनमस्कार घालण्याची कृती पूर्ण झाली आहे. त्याचसह वाक्याच्या शेवटी ‘अस’ या धातूचे ‘होते’ हे भूतकाळ दर्शवणारे क्रियापद वापरल्यामुळे ती कृती भूतकाळात जमा झाली आहे. अशा प्रकारे हे वाक्य भूतकाळी झाले आहे.
३ आ ३. ‘पंकजने सूर्यनमस्कार घातले असतील.’ – या वाक्यातील ‘अस’ या धातूपासून सिद्ध झालेल्या ‘असतील’ या क्रियापदामुळे हे वाक्य भविष्यकाळी झाले आहे. वाक्य भविष्यकाळी होऊनही त्यातील पंकजची सूर्यनमस्कार घालण्याची कृती मात्र पूर्ण झालेली आहे.
वरील तिन्ही वाक्यांत ‘घाल’ या धातूचे ‘घातले’ हे क्रिया पूर्ण झाल्याचे दर्शवणारे रूप वापरले आहे. त्या रूपाच्या पुढे ‘आहे’, ‘होते’ आणि ‘असतील’ अशी अनुक्रमे वर्तमानकाळी, भूतकाळी अन् भविष्यकाळी क्रियापदे वापरण्यात आली आहेत. या क्रियापदांमुळे ही वाक्ये वर्तमान, भूत आणि भविष्य अशा ३ प्रमुख काळांत विभागली जातात; पण त्यांतील ‘सूर्यनमस्कार घालण्या’ची कृती तिन्ही वाक्यांत पूर्ण झालेली दिसते. अशा प्रकारे ‘वाक्याचा प्रमुख काळ कोणताही असला, तरी वाक्यात सांगितलेली कृती पूर्ण झालेली असेल, तर त्याला ‘पूर्णकाळ’ असे म्हणतात.’ वरीलपैकी ‘३ आ १’ या वाक्यातील काळाला ‘पूर्ण वर्तमानकाळ’, ‘३ आ २’ या वाक्यातील काळाला ‘पूर्ण भूतकाळ’ आणि ‘३ आ ३’ या वाक्यातील काळाला ‘पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.
३ इ. रीतीकाळ : याविषयी समजून घेण्यासाठी प्रथम पुढील वाक्ये आणि त्यांचे विवरण पहाणे योग्य होईल.
३ इ १. ‘मंदार गिर्यारोहणाला जात असतो.’ : या वाक्याचे विवरण पहाण्यापूर्वी ‘संयुक्त क्रियापद’ म्हणजे काय ?’, हे समजून घेऊ.
वरील वाक्यात ‘जा’ आणि ‘अस’ हे दोन धातू आहेत. यांपैकी ‘जा’ या धातूपासून ‘जात’ हा शब्द सिद्ध झाला आहे. या शब्दाला ‘धातूसाधित (धातूपासून सिद्ध झालेला शब्द)’, असे म्हणतात. दुसर्या ‘अस’ या धातूपासून ‘असतो’ हे क्रियापद सिद्ध झाले आहे. वाक्यात ‘जात असतो’ अशी संपूर्ण शब्दरचना वापरली, तरच त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. केवळ ‘जात’ किंवा ‘असतो’ यांपैकी एकच शब्द वापरला, तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. यावरून हे लक्षात येते की, ‘ही शब्दरचना धातूसाधित आणि क्रियापद यांच्या संयोगाने बनलेली आहे.’ अशा शब्दरचनेला ‘संयुक्त क्रियापद’ असे म्हणतात.
आता ‘मंदार गिर्यारोहणाला जात असतो’, वाक्याचे विवरण पाहू. या वाक्यातील ‘जात असतो’ या संयुक्त क्रियापदावरून ‘गिर्यारोहणाला जाणे’, ही मंदारची सवय किंवा रीत आहे, हे लक्षात येते. याला ‘रीतीकाळ’ असे म्हणतात. मंदारची ही रीत सध्या चालू आहे; म्हणून याला ‘रीती वर्तमानकाळ’ असे म्हणतात.
३ इ २. ‘मंदार गिर्यारोहणाला जात असे.’ – या वाक्यातील ‘जात असे’ या संयुक्त क्रियापदावरून ‘पूर्वी मंदारला गिर्यारोहणाला जाण्याची सवय होती किंवा तेव्हा ती त्याची रीत होती’, हे लक्षात येते. यावरून ‘हे वाक्य भूतकाळी आहे’, हेही समजते. या वाक्यात मंदारच्या भूतकाळातील रीतीचा उल्लेख असल्यामुळे त्याला ‘रीती भूतकाळ’ असे म्हणतात.
३ इ ३. ‘मंदार गिर्यारोहणाला जात राहील.’ – या वाक्यातील ‘जात राहील’ या संयुक्त क्रियापदावरून ‘मंदारची गिर्यारोहणाला जाण्याची रीत पुढेही, म्हणजे भविष्यातही चालूच रहाणार आहे’, हे समजते. या वाक्याला ‘रीती भविष्यकाळ’ असे म्हणतात.
४. विविध काळांत वापरली जाणारी क्रियापदांची रूपे
आतापर्यंत आपण काळाचे वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे तीन प्रमुख प्रकार, तसेच अपूर्णकाळ, पूर्णकाळ अन् रीतीकाळ हे तीन उपप्रकार पाहिले. काळाच्या तीन प्रमुख प्रकारांमध्ये क्रियापदांची प्राथमिक स्वरूपाची रूपे वापरली जातात, उदा. खातो, खाल्ले, खाईल इत्यादी. त्यामुळे या काळांचा उल्लेख ‘साधे काळ’ असाही केला जातो. यानुसार त्यांना ‘साधा वर्तमानकाळ’, ‘साधा भूतकाळ’ आणि ‘साधा भविष्यकाळ’ असेही म्हणतात. काळाच्या उपप्रकारांमध्ये वापरली जाणारी क्रियापदांची रूपे मात्र थोडी वेगळ्या प्रकारची असतात. ‘एकच क्रियापद वेगवेगळ्या काळांमध्ये कशा प्रकारे पालटत जाते ?’, हे दर्शवणारी सारणी पुढे दिली आहे. तिच्यावरून सर्व काळांची एकत्रित ओळख होण्यास साहाय्य होईल. या सारणीमध्ये ‘शिव’ या धातूची सर्व काळांतील रूपे दिली आहेत.
(क्रमशः पुढील शुक्रवारी)
– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.६.२०२३)